बॉम्ब बनवणारा शाळा मास्तर बीडचा पहिला खासदार बनला

बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात. इथं लहान बाळ सुद्धा पाळण्यातच कार्यकर्ता बनून राजकारणात येतो असं म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि बीडच्या निवडणुका एकीकडं. इतरांनी ऐकले देखील नसेल अशा गोष्टी या निवडणुकामध्ये होत असतात. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत कोट्यवधीचा चुराडा होत असतो.

पण याच बीडच्या इतिहासात एक खासदार असे  निवडून आले होते ज्याची संपत्ती दोन धोतर जोडी इतकी होती.

नाव रामचंद्र गोविंदराव तथा बाबासाहेब परांजपे

बाबासाहेब परांजपे मूळचे कोकणातले. मात्र त्यांचे वडिल रेल्वे मध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांच आयुष्य पश्चिम महाराष्ट्रात गेले. बाबासाहेब दहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. सोलापूरच्या हरिभाऊ देवकरण प्रशालेत ते मॅट्रिक झाले. स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ. सोलापुरातील वातावरण तेव्हा राष्ट्रभक्तीने भारावलेले होते. तरुण बाबासाहेब परांजपे यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याची उर्मी येत असे. पण वडिलांच्या इच्छे खातर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

परिस्थिती हालाखीची असूनही वडिलांनी आपल्याला मोठ्या कॉलेज मध्ये पाठवलं आहे याची त्यांना जाणीव होती. फर्ग्युसन मध्ये त्यांनी बीएस्सीची डिग्री पूर्ण केली.

याकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हिप्परगा येथे एक राष्ट्रीय शाळा सुरू होती. ही शाळा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यासाठी लढणारी पुढची पिढी घडवण्यासाठी ध्येयवादी तरुणांनी केलेला प्रयोग. व्यंकटराव आणि अनंतराव कुलकर्णी या दोघं भावांनी हि शाळा सुरु केली होती. बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचे मित्र व्यंकटेश भगवान खेडगीकर हे या आडवळणाच्या गावातल्या शाळेचे  मुख्याध्यापक होते.

देशासाठी काही तरी करायचं म्हणून निघालेले बाबासाहेब परांजपे देखील या शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून दाखल झाले.

तिथूनच त्यांच्या सार्वजनिक, राष्ट्रीय जीवनाला एकप्रकारे सुरूवात झाली. देखणे व्यक्तिमत्व, प्रचंड वाचन, ओजस्वी वक्तृत्व, देशप्रेम, सेवाभाव, जातीयता निर्मूलनाची कृतिशील तळमळ यामुळे  बाबासाहेब सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे वाटू लागले. सर्वजण त्यांना युवराज म्हणायचे. या संबोधनात आत्यंतिक प्रेम होते, तसाच धाकही.

मराठवाडा त्याकाळी इंग्रजांबरोबर निजामशाहीच्या जोखडात अडकलेला होता. हे दुहेरी पारतंत्र्य इथल्या मागसलेपणाचे प्रमुख कारण होते. शिकून सावरलेले गांधीवादी चळवळीतले कार्यकर्ते निजामशाहीच्या जुलुमाविरुद्ध जनजागृती करू लागले. हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा याचे प्रमुख केंद्र बनली. हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या महायज्ञाची हि सुरवात होती. या शाळेच्या मुख्याद्यापकांनी म्हणजेच व्यंकटेश भगवान खेडगीकर यांनी संन्यास घेऊन स्वामी रामानंद तीर्थ हे नाव धारण केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामीजींकडे सोपवण्यात आले.

पुढे इ.स. १९३५ मध्ये हिप्परग्याची शाळा सोलापूरला स्थलांतरित झाल्यावर स्वामीजींसमवेत बाबासाहेब अंबेजोगाईला आले. तिथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

स्वामीजींच्या नेतृत्वाखाली योगेश्वरी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. योगेश्‍वरी विद्यालयाशी त्यांचा शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक अशा विविध  नात्यांनी संबंध आला. शालेय शिक्षणाला जीवनाचा अर्थ प्राप्त करून देताना त्यांनी शाळेच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचाही विचार केला.  आपल्या अत्यल्प  मानधनाचा हिस्सासुद्धा  ते गरजू शिक्षकांना, गरीब विद्यार्थ्यांना वाटून देत. काटकसर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.

सार्वजनिक पैसा सार्वजनिक कामासाठीच उपयोगात आणला पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामीजींकडे होते. बाबासाहेब परांजपे संग्रामात खेचले जाणे स्वाभाविक होते. त्यांचा पिंड संघर्षाचा होता. देशातली असहकारितेची, स्वदेशीची चळवळ त्यांनी योगेश्‍वरी विद्यालयाच्या प्रांगणात आणली. परदेशी कपड्यांची होळी, महात्मा गांधींजींच्या उपोषणाला पाठिंबा देणारे शिक्षक विद्यार्थ्यांचे उपोषण अशा देशभक्तीने भारलेल्या बाबी या प्रांगणाने अनुभवल्या.

१९४२ मध्ये निजामाने सुरू केलेल्या अटकसत्रात बाबासाहेबांना अटक होणे अपरिहार्य होते.

१० ऑगस्ट रोजी ते शाळेत शिकवत असताना निजामाचे पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले. बाबासाहेबांना त्यांनी अटक वॉरंट दिलं व आपले साहित्य गोळा करण्यासाठी एका तासाचा वेळ दिला. बाबासाहेब म्हणाले,

“लगेच निघू माझ्या जवळ काही सामान नाही. “

पोलीस अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं. मुलांनी त्यांचे धोतर शर्ट व टोपी आणून दिली. बाबासाहेबांना हैद्राबादच्या जेल मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तिथे देखगील इतर कैद्यांच्यात जागृती करण्याचे त्यांना वैचारीक परिवर्तन घडवून आणण्याचे काम त्यांनी जोमाने केले.

दोन वर्षांनी त्यांची सुटका झाली.

स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. मात्र हैद्राबादचा निजाम मात्र भारतात विलीन होण्यास उत्सुक नव्हता.त्याची पाकिस्तानशी बोलणी सुरु होती. अशातच कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली रझाकारांच्या संघटनेने मराठवाड्यात उच्छाद घालण्यास सुरवात केली. त्यांनी अत्याचाराची परिसीमा गाठल्यावर हैदराबाद मुक्तिसंग्रामच्या नेत्यांनी जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले.

बाबासाहेब परांजपे यांचा मूळ पिंड गांधीवादाचा असला तरी त्यांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली. पुण्याला जाऊन शिरूभाऊ लिमये यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान शिकून घेतले. मराठवाडा व सोलापूरच्या तरुणांना ते शिकवले. हैद्राबादचाय सरहद्दीवर असणाऱ्या सर्व क्रांतिकारी संघटनांना हत्यारे पोहचवली.

गांधी टोपी घालणारा मृदू मनाचा मास्तर हातबॉम्ब बनवतोय हे कोणाला सांगून देखील पटत नव्हतं.

या सर्वांच्या लढ्याला यश आले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला.

स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे या लढ्याचे खरे ठरले. पुढे वैचारिक मतभेदामुळे या दोघांनी आपल्या कार्यकर्यांसह काँग्रेसला रामराम ठोकला. १९५१२ साली जेव्हा देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणूका आल्या तेव्हा त्यांनी डाव्या विचारांच्या पीडीएफकडून तिकीट दाखल केले.

बाबासाहेब परांजपे बीडमधून उभे राहिले तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे श्रीधर नाईक हे उभे होते.  त्या काळात नेतेमंडळींचा प्रचारात प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर असे. पक्षाची राजकीय भूमिका, उमेदवाराचे चारित्र्य, अभ्यास व नेतृत्व करण्याची या बाबींना मोठेच महत्त्व होते. किंबहुना पक्षही अशाच व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देत. पैशांचे महत्व गौण होते.

तर बीड लोकसभेसाठी तेव्हा आजच्या तुलनेत केवळ दहा टक्के म्हणजेच तीन लाख ५० हजार ४५२ मतदार कौल देणार होते. प्रत्यक्षात मतदानाचा टक्का हा केवळ ४० टक्के इतकाच राहिला. या निवडणुकीत पीडीएफच्या रामचंद्र परांजपे यांनी काँग्रेसच्या श्रीधर नाईक यांना ९ हजार ३५१ मतांनी धूळ चारली. यात परांजपेंना ६७ हजार ६५२ तर नाईक यांना ५८ हजार ५०१ मते मिळाली. देशातील ४८९ जागांपैकी ३६४ इतके जोरदार बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला बीडमध्ये मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले.

नेहरूंच्या नेतृत्वाखाली अफाट लोकप्रियता असणाऱ्या काँग्रेसला बीड मध्ये एका साध्या  शाळा मास्तरने धूळ चारली होती.

बीडच्या निवडणुकीतल्या स्वातंत्रलढ्याच्या त्यागाची परंपरा अनेक वर्षे चालली. सातारच्या प्रतिसरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील बीड मधून निवडून आले. पुढच्या कालौघात मात्र राजकारणाची दिशा बदलत गेली. राजकारणाचे रूप पालटले आणि आज इथल्या निवडणूक म्हणजे जातीपाती, पैशांचा पाऊस या साठीच ओळखल्या जातात.

  हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.