सव्वाचारशे वर्षांआधी बांधलेल्या खजाना बावडीच्या पाण्यावर आजही बीडचे शेतकरी सोनं पिकवतायत…

बीड शहराला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 

पूर्वी चंपावती नगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराच नाव नंतर बीड असं पडलं. या शहरावर अनेकांनी राज्य केलं आणि त्यापैकीच एक असलेल्या बीडचा सरदार सलाबत खान याने वास्तू शास्त्रज्ञ राजा भास्कर याच्या मदतीने सव्वा चारशे वर्षांपूर्वी जल व्यवस्थापनाचा एक अद्भुत चमत्कार करून दाखवला आणि बीडमध्ये खजाना बावडी बांधली.

निजाम राजवटीमध्ये अहमदनगरचा निजाम हुसेनशहा हा दक्षिणेच्या मोहिमेवरून परतल्यानंतर त्याचा अहमदनगर मध्ये आल्यावर काही दिवसातच मृत्यू झाला, कारण दक्षिणेत झालेल्या एका लढाईत तो जखमी झाला होता.

निजाम हसेनशहा यांच्या मृत्यूनंतर त्याच्या जागेवर त्याचा मुलगा मुर्तुजाशाह निजाम हा गादीवर बसला आणि त्याने आपल्या विश्वासातील काही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणची जहागिरी बहाल केली.

त्यात बीडची जहागिरी सरदार सलाबत खान यांच्याकडे देण्यात आली.

मूळचा इराणचा असणारा सलाबत खान हा मुर्तुजाच्या अत्यंत विश्वासातला मंत्री म्हणून त्याची ओळख होती. एवढंच नाही तर सलाबत खान याने प्रजेच्या हिताची अनेक चांगली काम केल्याने त्याला विकासप्रिय मंत्री म्हणून देखील संबोधलं जायचं. सलाबत खान याने बीडची सूत्र हाती घेतल्यानंतर बीडच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक नियोजन केलं.

त्याची सुरुवात झाली ती बीडच्या खजाना बावडी पासून.

बीडचा भौगोलिक अभ्यास केल्यानंतर सलाबत खान याने शेतकऱ्यांच्या हितासाठी १५८२ साली बीडमध्ये एक विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. याच काळात मुर्तुजाशहा याच्याकडून विकास कामासाठी सलाबत याला भरपूर खजिना मिळत होता आणि याच खजिन्यातून ही विहीर बांधण्याच काम त्या काळी वास्तू व भूजल शास्त्रज्ञ असलेल्या राजा भास्कर यांना देण्यात आलं.

उत्तम वास्तू शास्त्र आणि जल व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर बांधण्यासाठी राजा भास्कराने मुर्तुजाशहा याच्याकडून आलेला सर्व खजिना विहीर बांधण्यासाठी खर्च केला त्यामुळे या विहिरीला खजिना बावडी किंवा खजाना बावडी असं नाव पडल्याच इतिहासकार सांगतात.

सोळाव्या शतकात बांधण्यात आलेल्या या खजाना बावडीची रचना अप्रतिम आणि अद्भुत आहे.

जमिनीपासून २३.५ फूट खोल असलेल्या या विहिरीचा व्यास १०.६० फूट एवढा असून चौकोनी दगड आणि चुन्याचा वापर करून खजाना बावडी बांधण्यात आली आहे. या विहिरीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून पाच फूट उंच आणि अडीच फुट रुंद असे दोन इंनलेट अडीच किलोमीटरपर्येंत जमिनीच्या मधून खोदण्यात आलेले आहेत आणि यातूनच या विहिरीत पाणी येत.

तर शेतीला पाणी जावं म्हणून साडेचार किलोमीटरची एक नहर विहिरीच्या उत्तरेस जमिनीतून खोदण्यात आलेली आहे. वास्तू शास्त्राचा अद्भुत चमत्कार असलेल्या खजाना बावडीने सव्वा चारशे वर्षात कित्येक दुष्काळ पाहिले पण ती कधी आटली नाही आणि ओसंडून वाहिलीही नाही खजाना बावडीत चार फुटापर्येंत कायम पाणी पाहायला मिळतं.

या विहिरीच सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन नहरीतून विहिरीत येणारं पाणी कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना आणि यंत्राशिवाय विहिरीत जमा होतं आणि विहिरीतून बाहेर जाणारं पाणी देखील आपोआप शेतापर्यंत पोहोचत.

दोन इंनलेट असलेल्या या विहिरीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा असा सलाबतखान याचा मुख्य उद्देश होता. म्हणून विहिरीच्या उत्तरेस एक आऊटलेट नहर काढण्यात आलेली आहे. या नहरीच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खजाना बावडीतून निघालेली ही नहर.

 बिंदुसरा नदीपत्राच्या अगदी वीस फूट खालून म्हणजे भूगर्भातून साडे चार किलोमीटर पर्येंत जाते आणि याच नहरीतुन वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बावन्न ठिकाणी हुसासे बनवण्यात आले असून आज ही या हुसास्यातून वाहणाऱ्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पाहता येत. 

आत्तापर्येंत बिंदुसरा नदीला अनेकदा महापूर आले मात्र नदीपत्राखालून गेलेली नहर आजही शेतीला सुरक्षित पणे पाणी पुरवठा करत आहे. साडेचार किलोमीटरवर जिथे ही नहर संपते त्या ठिकाणी जमिनीवर पाणी बाहेर येतं आणि याच ठिकाणाला बिडचे लोक फुटका नळ या नावाने ओळखतात.

त्या काळात खजाना बावडीच्या पाण्यावर बलगुजाराची पाचशे हेक्टर शेती ओलिताखाली येत होती तर बीड शहरात असलेला खासबाग हा बगीचा याच पाण्यावर फुलवण्यात आला होता. आता तो नामशेष झाला असला तरी खजाना बावडीच्या शेजारी आणि बिंदुसरा नदीच्या काठावर आजही शेकडो एकर शेतीला याच खजाना बावडीचं पाणी मिळत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून याच पाण्यावर बीडचे शेतकरी आपल्या शेतीतून सोनं पिकवत आहेत.

बीडच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू बीड शहरात आजही पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक ही खजाना बावडी मात्र बीड शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे खजाना बावडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं पर्यावरण प्रेमी आणि इतिहासकार सांगतात त्यामुळे तिचं संरक्षण व्हावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.