बीडला बजरंगाची कमाल होणार?

बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात भारी राजकारण. बीडमधले माणसं राजकारणावर प्रेम करतात. राजकारण्यावर नाही. राजकारण हा सगळ्यांच्या गप्पांमधला आवडीचा विषय. जातीपातीचे गणितं, कारखान्याचे डावपेच आणि घराण्यांचा वारसा हे आहे बीडचं राजकारण.

नेत्यांचा आणी विचारसरणीचा काही संबंध नाही. कोण कुठल्या पक्षात जाणार काही सांगू शकत नाही. बीडचे राजकारणी माळ्यावर सगळ्या पक्षाचे झेंडे ठेवून असतात. कधी कमळ, कधी घड्याळ, कधी धनुष्य.

आता जयदत्तअण्णा क्षीरसागर राष्ट्रवादीतून बाहेर पडले. भाजपच्या प्रीतम मुंडेंचा प्रचार करणार. पण हे करण्यासाठी त्यांनी पक्ष का सोडला हे बीडच्या लोकांना कळल नाही. कारण बीडमध्ये क्षीरसागरानी लोकसभेला मुंडेना मदत करायची आणि विधानसभेत मुंडेनी क्षीरसागराना मदत करायची असच चित्र लोकांना दिसत आलंय. जे काम आतून पण करता येतं ते बाहेर येऊन करायची गरज काय?

पण जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत हे जगजाहीर आहे. बरं ही नाराजी पक्षाने घराबाहेर कुणाला पाठबळ दिलंय म्हणून नाही. तर पवारांनी क्षीरसागर यांच्या पुतण्याला पुढे आण्याला सुरुवात केली म्हणून ही नाराजी आहे. अशाप्रकारची महाराष्ट्रातली ही पहिलीच नाराजी असावी.

बीडचं वेगळेपण हे आहे की बीडमध्ये एकदाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली नाही. नेहमी भावनिक राजकारण, घराण्याचे प्रश्न, जातीचा मुद्दा किंवा राजकीय लाट प्रभावी ठरली. कुठल्याच निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रभावी ठरत नाही. खरतर विकासाच्या मुद्द्यावर कुठलाच नेतासुद्धा बोलत नाही.

बोलणार कसे? पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हापरिषद सगळीकडे हे मिळून मिसळून कारभार करतात. थोडं तुमचं थोडं आमचं असा कारभार. विकास होणार कसा? आणि नाही झाला तर बोलणार कोण? खरकट्या हातानी स्वच्छ कारभारावर बोलायचं कसं?

तरी बीडच्या निवडणुका रंगतदार होतात.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची कामगिरी फार समाधानकारक नाही. पंकजा मुंडे यांच्यासोबत कधी कधी होर्डिंगवर फोटो असतो त्या प्रीतम मुंडे एवढी त्यांची ओळख. बाकी जिल्ह्यात फार फिरायचे कष्ट त्यांनी घेतले नाही. किंवा आपल्याला फिरायची गरज नाही असा त्यांचा समज असावा. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असण हे प्रीतम मुंडे यांचं आजही सगळ्यात मोठं भांडवल आहे. खरंतर एवढ्या कालावधीत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला हवी होती. पण सतत पंकजा मुंडेंच्या सावलीत राहण्याचं त्यांनी ठरवलेल असावं.

प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडीत यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं. पण ऐनवेळी नवखे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तिकीट मिळालं. पंडीत समर्थक सुतक पडल्यासारखे निराश झाले. पण अमरसिंह पंडीत स्वतः बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात भाग घेताना दिसले आणि वादळ शांत झालं.

बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असले तरी जिल्ह्यात त्यांची ओळख नाही. ते धनंजय मुंडे यांचे उमेदवार मानले जातात. त्यांची जागा खरंतर धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे नावाला उभे आहेत. खरी लढाई पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी आहे. दोघांसाठी ही विधानसभेची शक्तीपरीक्षा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जास्त जोर लावलाय. भाजपच्या बाजूने जयदत्त क्षीरसागर यांचा पाठिंबा ही जमेची बाजू आहे. विनायक मेंटे नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे कधीच कळत नाही. पण मराठा मतदारांची नाराजी मुंडेना त्रासदायक ठरू शकते.

बजरंग सोनवणे नवखे उमेदवार असले तरी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनावर घेतल तर चमत्कार शक्य आहे. बजरंग सोनवणे यांच्यासाठी चिंतेची बाब ही आहे की त्यांना आपल्या बाजूने नेमकं कोण आहे याचा आताच अंदाज येणार नाही.

बीडच्या राजकारणाची ही खरी गंमत आहे. केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव करण्यासाठी सगळे एकत्र यायचे. पण ऐन मतदानाच्या वेळी काय गोंधळ व्हायचा माहित नाही. केशरकाकू निवडून यायच्या. बीडमधली मराठा घराणी आपसातल्या वादात व्यस्त राहिल्याने या मतदारसंघात नेहमी क्षीरसागर आणि मुंडे घराण्यांचं वर्चस्व राहिलंय. पण आता घरगुती भांडणाने सगळ्यांना घेरलाय. पंडीत घराण्यात पूर्वीपासून वाद आहेत. मुंडेंच्या घरात वाद निर्माण झाले. आणि आता क्षीरसागर घराण्यात पण उघड उघड स्पर्धा सुरु झालीय.

बीडच्या नेत्यांना राजकारणामुळे खूप काही मिळालं. पण त्यांच्या घरातली मनःशांती मात्र राजकारणाने हिरावून नेली हे सत्य आहे.

प्रीतम मुंडे यांचं पारड जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठींब्याने जड वाटत असलं तरी धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडीत, अक्षय मुंदडा ही तरुण पिढी चमत्कार करू शकते हे विसरून चालणार नाही. बीड जिल्ह्याचं पुढचं राजकारण या नेत्यांच्या हातात आहे. सध्या हे सगळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात एकत्र आलेत. इथून पुढच राजकारण पंकजा मुंडे यांना सोपं असणार नाही. आता त्यांना सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल.

सध्यातरी बजरंग सोनवणे यांच्यासाठी विरोधक एकत्र आल्याचं दिसतंय. पण सोनवणे बजरंगाची कमाल दाखवणार का हे सांगता येत नाही. त्यासाठी धनंजय मुंडे यांना मात्र ताकद लावावी लागतेय. कारण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड येण्यासाठी ही महत्वाची संधी आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठीपण ही लढत महत्वाची आहे. बीडचा पराभव दोघा बहिण भावांना राज्याच्या राजकारणात खूप मागे नेऊ शकतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.