बीडच्या राजकारणाचे तीन फंडे ! पंडीत, क्षीरसागर आणि मुंडे !
बीडला लोकसभा निवडणूक म्हणजे फार उत्सुकता वाटायचं कारण नाही. गेली कित्येक वर्षं बीड लोकसभेवर क्षीरसागर आणि मुंडे घराण्यातला कुणीतरी निवडून जातो. यावर्षी पंडीत घराण्यातले अमरसिंह पंडीत मैदानात उतरणार आहेत अशी बातमी आहे. पण बीडचं राजकारण म्हणजे पंडीत, क्षीरसागर आणि मुंडे हे ठरलेलं आहे. बाकी लोकांनी कुणाच्या गटात राहायचं हेच फक्त ठरवायचं असतं.
सत्ता नेहमी या तीन घराण्यात असणार म्हणजे असणार. एका घरात खासदारकी, एका घरात आमदारकी आणि पुन्हा जिल्हा परिषद वाटून वाटून. बरं एवढ सगळं असूनही विकासाच्या नावाने बोंबाबोंब. गटारं, खराब रस्ते, पाणी टंचाई, उद्योगधंदे नाहीत. बीडच्या समस्यांची यादी प्रचंड आहे. आणि ती पूर्वीपासून जशीच्या तशी आहे.
केशरकाकू क्षीरसागर यांच्यापासून क्षीरसागर घराण्याची राजकीय सुरुवात झाली. त्यांनी खूप काळ आमदारकी, खासदारकी मिळवली. नंतर त्यांचा मुलगा जयदत्त शिरसागर यांनी धुरा ताब्यात घेतली. आमदारकी, मंत्रीपद मिळवलं. त्यांचे बंधू भारतभूषण नगरपालिका ताब्यात ठेवून आहेत. आता यांचा पुतण्या मैदानात उतरलाय. यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीकडून पुतण्या उभा राहणार का काका जयदत्त क्षीरसागर उभे राहणार हा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा क्षीरसागर घराण्यात बंडखोरीने शिरकाव केलेला आहे.
पुतण्याने काकासमोर आव्हान उभं करायची ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा या घरात देखील चालू आहे. काका पुतण्या असे वाद पंडीत घराण्याला नवीन नाहीत. किंवा काका पुतण्या हा वाद राजकारणातला सगळ्यात जुना पंडीत घराण्यातला. शिवाजीराव पंडीत आणि बदामराव पंडीत यांच्यातलं राजकीय वैर सगळ्यांना माहित आहे. आता शिवाजीराव सक्रीय नाहीत. बदामराव पंडीत आणि अमरसिंह पंडीत आता राजकीय विरोधक. खरंतर पंडितांच राजकारण गेवराईपुरतंच. जिल्हापरिषद ताब्यात असली तरी पंडीत घराण्याला बीडमध्ये फार पंख पसरता आले नाहीत. एका कारखान्याभोवती त्यांचं राजकारण जास्त केंद्रित राहिलं. मागच्या वेळी पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालं की दोन्ही पंडितांपैकी कुणीच गेवराईचा आमदार निवडून आला नाही. कारण गमतीशीर होतं. अमरसिंह राष्ट्रवादीत तर बदामराव बिजेपीत किंवा बदामराव राष्ट्रवादीत तर अमरसिंह बिजेपीत अशी व्यवस्था असायची. पण मागच्या वेळी अमरसिंह आणि बदामराव दोघेही राष्ट्रवादीतच आले. मग तिकीट बदामराव पंडितांनी मिळवलं. पण गेवराईने नवा चेहरा द्यायचं ठरवलं होतं. लक्षण पवार आमदार म्हणून निवडून आले. अर्थात लक्ष्मण पवार सुद्धा पंडितांचे नातेवाईकच आहेत. विधानसभेत अमरसिंह पंडीत यांचे बंधू विजयसिंह पंडीत उभे राहतील अशी चर्चा आहे. विजयसिंह जिल्हापरिषद सांभाळत होते. बदामराव पंडीत यांचा मुलगा युद्धाजित पंचायत समिती ताब्यात ठेवून आहे.
अशा रीतीने पंडीत घराण्याभोवती गेवराईची आमदारकी आणि सत्ता सतत राहिली आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करत उपमुख्यमंत्रीपदी मजल मारली. केंद्रीय मंत्रीपद मिळवलं. आपला पुतण्या धनंजय मुंडे यांना सतत बळ दिलं. पण अचानक पंकजा मुंडे राजकारणात आल्या आणी मुंडे घराण्यात सुद्धा काका पुतण्या वैर सुरु झालं. एका अर्थान बघायला गेलं तर पंडीत, क्षीरसागर आणि मुंडे या तिन्ही घरात काका पुतण्या वैर आहे. म्हणजे एकमेकांशी लढणारे हे लोक घरात सुद्धा एकाच प्रकारच्या लढाईला तोंड देताहेत. हा केवढा मोठा योगायोग आहे.
बीड एवढी काका पुतण्याची लढाई महाराष्ट्रात कुठे नाही. अर्थात यातल्या तिन्ही काका पुतण्याच्या लढाईला पवार कुठे न कुठे जवाबदार आहेत. कारण त्यांनी ठरवलं असतं तर या तिन्ही घरातली भांडणं ते मिटवू शकले असते. किंवा या भांडणांना निदान प्रोत्साहन तरी दिलं नसतं. पण या तिन्ही घरातल्या एकाला आपल्या पक्षात प्रवेश देऊन बळ देण्याचं काम पवारांनी केलंय. एका अर्थाने बीड जिल्ह्यच्या तणावाला पवार पण जवाबदार आहेत. पण सगळा दोष पवारांचा आहे असं म्हणून चालणार नाही. भांडण मिटवायच हाच त्यांचा उद्योग नाही. ते उद्योगपतींचे भांडण मिटवतात म्हणून आपली एक आशा वाटत होती. कारण उद्योगपती म्हणावेत अशी ही तीनच महत्वाची घराणी बीडमध्ये आहेत. यांचेच उद्योग आहेत. कारखाने आहेत.
येता जाता लोकांना दाखवण्यासारख्या गोष्टी बीडमध्ये काय आहेत तर यांचे बंगले आहेत. बाकी बीडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना दाखवण्यासारखं काय उभारलं गेलंय? अजूनही काही बघायचं म्हणजे कंकालेश्वर, कपिलधार, खजाना बावडी अशी स्थळ दाखवावी लागतात. नवीन काही निर्माण झालं नाही. आहेत त्या शिक्षणसंस्था किंवा कारखाने यांच्याच ताब्यात आहेत.
मग बीडमधली इतर माणसं करतात काय?
प्रामाणिकपणे कष्ट करतात. शेतीत आयुष्य पणाला लावतात. कुणी शिक्षण घेऊन पुण्या मुंबईला जातात. कुणी उस तोडायला पश्चिम महाराष्ट्रात जातात. पण राजकीय बदलासाठी लोक काहीच का करत नाहीत? लोकांनी प्रयत्न केले. पण प्रत्येकवेळी लोक तोंडावर पडले. बीडच्या जनतेने या तीन घराण्यांना पर्यायी नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. सुरेश नवले यांच्या रूपाने बीडने शिवसेनेला सत्ता दिली. पण मंत्रीपद मिळूनही नवले काही चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. पर्यायी नेतृत्व जाउ द्या त्यांना निवडून येण्याची पण अडचण होतेय.
याच बीडमधून भाई जनार्दन तुपे यांना चक्क जयदत्त क्षीरसागर यांना पाडून निवडून दिलं. पण जनार्दन तुपे यांनी निराशा केली. बीडमध्ये रजनी पाटील या कॉंग्रेसकडून एक महत्वाच्या नेत्या आहेत. पण त्यांचं राजकारण दिल्लीच्या ओळखीवर आहे. जनतेत नाही. बीडमध्ये या तीन घराण्यांना पर्याय उभा राहू शकला नाही. विनायक मेटे सतत पक्ष बदलत राहिले. विनायक मेटे आणि सुरेश धस आपली आपली आमदारकी टिकवून ठेवण्यात यशस्वी आहेत. पण ही काही राजकीय कारकीर्द नसते. मराठा आरक्षणासारखा विषय मेटेंना स्वतःच्या नेतृत्वाखाली ठेवता आला नाही. सोळुंके, आडसकर घराणी आपल्या भागात मर्यादित राहिली. विमल मुंदडा एक प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकल्या असत्या. पण काळाने घात केला. अमोल गलधर नावाचं तरुण नेतृत्व उभं राहू पहात होतं. पण तिथेही नियतीने दगा दिला. बीडमध्ये पर्यायी नेतृत्व उभं राहू शकलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की उभं राहूच शकत नाही. एकमेकांच्या नेत्यांना कुणी काही बोललं किंवा लिहिलं तर ज्या तडफेने कार्यकर्ते जाब विचारतात त्याच तोऱ्यात एकदा आपापल्या नेत्यांना जाब विचारायचं ठरवलं तर बीडला सक्षम नेतृत्व नक्कीच मिळेल.
आहेत तेच नेते असोत किंवा नवीन नेते असोत. त्यांना जाब विचारणारे लोक जिल्ह्यात पाहिजेत. तरच जिल्ह्याचा विकास होतो. सध्या तरी या तीन घराण्यांच्या जीवावरच बीड विकासाची स्वप्नं बघतंय. खरंतर प्रत्येक घर सक्षम असलं की विकास होतो. सत्तेत मिळेल का नाही माहित नाही पण निदान पाण्याच्या बाबतीत तरी बीडच्या जनतेला समान वाटा मिळाला पाहिजे.
हे ही वाचा.
- बीडच्या काकू
- तो मुंडेंचा नाही मराठवाड्याचा राजकीय अपघात होता.
- आबाजी सानपचे झाले भगवान बाबा, धोम्या डोंगराचा केला भगवान गड !