५० हून अधिक खून करणारा मुंबईचा बियरमॅन हाच व्यक्ती होता का, हे कोडं आजही तसच आहे.
मुंबईच मरिन लाईन्स स्टेशन. साल होत २००६ चं. ऑक्टोंबर महिना. एक दिवस सकाळी पोलीसांना स्टेशन परिसरात एक बॉडी मिळाली. व्यक्तींच्या अंगावर २० वेळा चाकू हल्ला केला होता. अर्धनग्न असणाऱ्या त्या व्यक्तींचे यौनशोषण करण्यात आले होते. सोबत पुरावा म्हणून एक किंगफिशर बियरची बाटली.
स्टेशन परिसरात असणारे गर्दुले, भिकारी, टॅक्सी ड्रायव्हर, भिकारी अशा प्रत्येकावर संशय होता. पोलीसांनी चौकशी केली आणि काही काळाने प्रकरण शांत झाले. चौदा डिसेंबर २००६. चर्चगेट स्टेशन परिसरात दूसऱ्या व्यक्तींची बॉडी मिळाली. त्या व्यक्तिसोबत देखील यौनशोषण झाले होते. मृतदेहाशेजारी एक बियरची बाटली. याच दरम्यान मरिन लाईन्स ते चर्चगेट परिसरात एकूण सात खून झाले होते. पैकी दोन मृतदेहांशेजारी बियरची बाटली होती. बाकी सात खून करण्यांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे ते सर्व मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होते आणि त्यांच्यावर यौनशोषण झालं होतं.
पोलीसांनी या सर्व हत्यांमागे एकच व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आणि मिडीयाने त्या सिरियल किलरला “बियर मॅनची” उपाधी देवून टाकली.
मिडीया ट्रायल सुरू झाल्या. गर्दुल्यांवर संशय व्यक्त केला जावू लागला, पोलिसांच्या खबऱ्यांकडून माग काढला जावू लागला. याकामी पोलीसांनी स्पेशल टिम नियुक्त केली. चौकशी चालू झाल्या आणि धोबी घाट वरुन पोलीसांच्याच एका टिपरला अटक करण्यात आली.
रविंद्र कंट्रोल. वय वर्ष पस्तीस. व्यवसाय वडापावची गाडी. अंजली नावाची पत्नी आणि दिपा नावाची मुलगी.
रविद्र कंट्रोलेवर पोलीस दप्तरी गुन्हे नोंद होते. तो सुरवातीच्या काळात दशरथ राणे गॅंगसाठी काम करत असायचा. कालांतराने त्यांने गॅंग सोडली आणि वडापावची गाडी टाकली. पोलीसांचा टिपर म्हणून तो काम करु लागला.
पोलीसांनी रविंद्र कंट्रोलेची चौकशी सुरु केली. तेव्हा समजलं की रविंद्र कंट्रोल हा यापुर्वी जेलमध्ये होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला. स्वत:च नाव त्याने अब्दुल रहिम अस ठेवलं. डोक्यावर टोपी आणि दाढी या वेशात तो राहू लागला. धर्मांतर केल्याच्या सामान्य माहितीशिवाय रविंद्र कंट्रोलेकडून विशेष अशी काहीच माहिती मिळत नव्हती.
अखेर पोलीसांनी रविंद्र कंट्रोलेची नार्को टेस्ट घेण्याची मागणी केली.
फेब्रुवारी महिन्यात रविंद्र कंट्रोलेची नार्को टेस्ट करण्यात आली. एकूण सात खूनांचा त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. पण नार्को टेस्ट मध्ये त्याने २० हून अधिक खून केल्याचं सांगितलं. खूनांच कारण स्पष्ट होतं नव्हतं पण पोलीसांच्या चौकशीतून आणि मिडीयामधून वेगवेगळी माहिती समोर येत गेली.
काहीजणांच अस म्हणणं होतं की,
रविंद्र कंट्रोले माणसांना मारायचा आणि मरिन्स लाईन्स शेजारी असणाऱ्या कबरस्तानमध्ये घेवून जायचा. तिथे एक मांत्रिक अघोरी विद्या करायचा. त्यांनंतर ते शव समुद्रामध्ये फेकून देत. ज्या मृतदेहांना रविंद्र घेवून जावू शकला नाही असे सातच शव पोलीसांना मिळाले आहे. तर काहीजणांच म्हणणं होतं की, रविंद्र विक्षिप्त होता. त्याने मुस्लीम धर्म स्वीकारल्यापासून तो इस्लामला निषिद्ध असणाऱ्या गोष्टी करणाऱ्यांना मारून टाकत होता.
जे लोकं समलैंगिक आहेत किंवा रात्रीच्या अंधारात रविंद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहमान ला ज्याच्यांवर संशय यायचा अशा व्यक्तींना तो मारून टाकायचा. पण या सर्व गोष्टी ऐकीव. याच्या कानातून त्यांच्या कानात येवून अखेर मिडीयात छापून आलेल्या.
अशा सांगण्याच्या गोष्टीत त्याने खून केलेल्या लोकांची यादी तब्बल ५० हून अधिक झाली होती.
पण, रविंद्र कंट्रोलेची चौकशी केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर फक्त तीन खूनांसाठी चार्जशिट दाखल करू शकले. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू झाली.
कोर्टाने नार्को टेस्टला परवानगी दिली असली तरी फक्त नार्को टेस्टचा पुरावा ग्राह्य धरला गेला नाही. जुलै २००७ च्या दरम्यान कोर्टाने तीन पैकी फक्त एका केसमध्ये रविंद्र कंट्रोलेला दोषी मानलं. ४० ते ५० खूनांचा सिरीयल किलर असणाऱ्या रविंद्रचा फक्त एकच गुन्हा पोलीस कोर्टात सिद्ध करु शकले. त्या कामी देखील एकाच व्यक्तिची साक्ष उपयोगी पडली होती. साक्षीदाराने रविंद्र कंट्रोलेला ओळखलं होतं. पण दूसरीकडे त्या साक्षिदाराने फक्त एकादाच काही वेळासाठी रविंद्र कंट्रोलेला पाहिलं होतं त्यानंतर थेट चार महिन्यांनी त्यांनी आपण या व्यक्तिला गुन्ह्याच्या ठिकाणी पाहिल्याच सांगितलं होतं.
एकमेव गुन्ह्याबद्दल रविद्र कंट्रोलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१७ डिसेंबर २००९ ला हि केस उच्च न्यायालयात गेली. उच्च न्यायालयात रविंद्र कंट्रोलेला झालेल्या एका गुन्ह्याच्या शिक्षेतून देखील निर्दोष सोडलं. ४० ते ५० गुन्ह्यांचा आरोप असणारा बियर मॅन रविंद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहमान निर्दोष सुटला होता.
रविंद्र कंट्रोल हा बेघर होता. सुरवातीच्या काळात तो दशरथ राणेच्या गॅंगमध्ये होता. आई वडिलांच्या सोडून जाण्यानं ऐन तारुण्यात घरात रहायचं नाही असा निर्णय त्याने घेतला त्यानंतर तो रस्त्यावरच राहू लागला. काही काळाने तो कामाठीपुऱ्यातल्या एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. २५ हजार रुपये देवून त्यांने त्या महिलेला वेश्याव्यवसायातून सोडवलं होतं. त्यांनतर तो घर घेवून राहू लागला. त्याने वडापावची गाडी टाकली. त्याला एक मुलगी झाली. एक चांगल आयुष्य तो जगत होता.
त्यावेळी दशरथ राणे गॅंगमधील जून्या गुन्ह्यावरुन त्याला अटक करण्यात आली. बाहेर पडल्यानंतर त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला. अब्दुल रहमान या नव्या नावाने तो राहू लागला. सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला सिरीयल मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली. कोर्टात कोणतेच पुरावे सादर करता न आल्याने तो सुटला. पण बियर मॅनचा शिक्का तसाच राहिला. त्याने नंतर वाढलेली दाढी काढून टाकली. आपल्या मुलीवर आणि पत्नीवर आपल्या आरोपांचा परिणाम होवू नये म्हणून त्याने दोघांना मध्यप्रदेशात पाठवले. आज तो काय करतो तर बियर मॅन म्हणून त्याच्याकडे बघणाऱ्या नजरा चोरून तो सर्वसामान्यांसारखा जगण्याचा प्रयत्न करतो.
तो खरच बियर मॅन होता की नाही हे कोडं मात्र अजूनही सुटलेलं नाही.
हे ही वाच भिडू.
- या पाच जणांच्या दहशतीने तुळशीबाग देखील ७ वाजताच बंद व्हायची !
- अवघ्या सहा महिन्यात त्याने मद्रासचं स्मशान करुन टाकलं होतं.
- म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती.
- माझं नाव जावेद इक्बाल, मी १०० मुलांचा खून केला आहे आणि मी माफी मागणार नाही..