अमुलच्या आधी आख्या देशात ‘पॉलसन’चा बोलबाला होता.

‘अमूल’ असं म्हंटलं की आपल्याला आठवतं ती दूधाची क्रांती आणि त्यांच्या दूधापासुन बनलेली बटर, चीज, आईस्क्रीम, चॉकोलेट्स यासारखी अनेक उत्पादन. त्यातही अमूलचं बटर म्हणजे लाजलाबच. अगदी क्रिमी… आणि त्यांच्या जोडीला आठवतं ती म्हणजे मागच्या ५५ वर्षापासून अमूलची ओळख बनलेली ठिपक्यांचा पोलका ड्रेस घातलेली एक मुलगी.

एकूणच काय तर देशभर पसरलेल्या अमूल बद्दल आपल्याला बरच आकर्षण आहे आणि आवडता ब्रँड पण आहै. पण तुम्हाला माहित आहे का? याच अमूलच्या आधी आसेतु हिमाचल अख्ख्या देशात बोलबाला होता तो,

पॉलसन बटरचा

काही जुन्या लोकांना विचारलं तर आजही या बटर बद्दलच्या आठवणी जाग्या होतात. मात्र पुढे जावून एक प्रकारे याच ब्रँड मधून अमूल सारखा ब्रँड उभा राहू शकला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

१९८८ सालची गोष्ट. पॉलसन नावानं मुंबईत एक कॉफीचं दुकान होतं. जे १३ वर्षाच्या पेस्तोनजी इडुलजी दलाल यांनी आपल्या बहिनीकडून १०० रुपये उसने घेत चालू केलं होतं. दुकानचं भाडं होतं महिना ८ रुपये. आता इथं काय काम चालायचं तर एका हातानं चालणाऱ्या मशिनमध्ये कॉफी दळायची आणि ती ब्राउन पेपरमध्ये पॅक करुन घरोघरी विकायची.

इडुलजी यांचे मित्र त्यांना लाडानं ‘पॉली’ म्हणायचे. मग या नावात थोडासा इंग्रजी टच असल्यामुळे त्यांनी ब्रँडचं नाव पॉलसन ठेवलं. त्यांच्या दुकानातील जास्तीत जास्त ग्राहक हे इंग्रज आणि उच्च वर्गातील लोक होते. जसं जसा व्यापार वाढत होता तसं तसं इडुलजींनी १९०५ आणि १९०७ या काळात दुकान पण वाढवलं. सोबतचं चिकरी/चकोरीची पूड मिसळून त्यांनी ती कॉफी ‘पॉलसन यांची फ्रेंच कॉफी’ या नावानं विकायला सुरुवात केली.

इंग्रज लोक त्यांच्या दुकानाचे नियमीत ग्राहक होते. १९१० च्या काळापर्यंत पॉलसन अगदी व्यवस्थित प्रस्थापित झालेला ब्रँड बनला होता. त्यामुळे ते आता नवीन संधी शोधायला लागले होते. नेमकं त्याचं वेळी त्यांना पोलिसांकडून माहिती मिळाली की सैन्यामध्ये बटरची कमतरता भासायला सुरुवात झाली आहे. हे म्हणजे संधीनं आपणहून दार ठोठावल्या सारखं झालं होतं.

त्यांनी वेळ वाया न घालवता लगेचचं दुधाचं जास्त प्रमाण असलेल्या खेडा मध्ये एक डेअरी सुरु केली. आणि बटरचं उत्पादन सुरु केलं. हे विकत घेण्यासाठी रेल्वे आणि सैन्यातील अधिकाऱ्यांना संपर्क केला. योगायोगानं त्याच दरम्यान जगात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती.

तेव्हा इडूलजींनी इंग्रज आणि अमेरिका दोघांना पण बटरचा पुरवठा केला. पुढे १९३० पर्यंत मुंबई प्रांत (गुजरातच्या) आणंदमध्ये पॉलसनची एक अत्याधुनिक फॅक्टरी उभी राहिली होती.

एव्हाना कॉफी सोबतच पॉलसन बटर हे नाव देखील गृहिनींच्या तोंडात बसलं होतं. इडूलजींनी इथं पण एक आयडिया केली. या बटरसोबतच ते एक कुपन पण द्यायचे. ती सगळी कुपन एकत्रित केली की गृहिनींना काहितरी मोठी वस्तु भेट म्हणून मिळायची. पॉलसन बटरसाठी हे आता अगदी समानार्थी शब्द वाटायला लागलं होते. असं देखील सांगितलं जात की काश्मिरमध्ये गोड बोलणाऱ्या पॉलसन लावणं असं म्हंटलं जायचं.

१९४५ साल उजाडताना पॉलसन बटरची वार्षिक उलाढाल साधारण तीस लाख पौंड पर्यंत पोहचली होती.

ब्रिटिश सरकारनं तो पर्यंत पॉलसनला आणंद गावातुन दुध गोळा करण्याचा एकाधिकार दिला होता. त्यामुळे संपुर्ण बाजारावर त्यांची हुकूमत होती. पण यामुळे या कंपनी मार्फत ठरवले जाणारे गाय आणी म्हशीच्या दूधाचे दर, दुरवरच्या खेड्यापाड्यातुन आणंदमधे दुध पोचवण्यासाठी करावी लागणारी पायपीट, उन्हाळ्यात त्यामुळे खराब होण्यार्‍या दुधाचं सोसावं लागणार नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता.

ज्या चढ्या दराचा फायदा पॉलसनला मिळत होता तो फायदा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. पोलसनच्या याच कारभारातुन १९४६ साली अमुल अस्तित्वात आलं. सरदार वल्लभाई पटेल, मोरारजी देसाई यांसारखी मोठी नाव या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहिली. पॉलसन कंपनीला दुध न पुरवण्याचा आणि फक्त नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी दुध संस्थेमार्फतच दुध वितरण करण्याचा निर्णय झाला.

पण बाजारात आल्यानंतर देखील बऱ्याच काळापर्यंत अमुल पॉलसनची बरोबरी करु शकला नव्हता. पॉलसन कडून दूधाच्या क्रिमला बऱ्याच दिवसांपर्यंत घट्ट येण्यासाठी वेगळ ठेवून दिलं जायचं. ज्यातुन बटरला एक वेगळीचं टेस्ट यायची. त्यानंतर यात मीठ टाकलं जायचं.

याच्या बरोबर उलट काम अमुलचं होतं. दूध घेण्यापासून ते त्याचं लोणी बनवण्यापर्यंतची सगळी प्रोसेस एकाच दिवसात व्हायची. त्यामुळे पॉलसनच्या जुन्या ग्राहकांना अमुलचा हा स्वाद काहीसा फिका वाटायचा. हळू हळू वर्गीस कुरीयन यांनी देखील बटरमध्ते काही बदल करत थोडसं मीठ टाकायला सुरुवात केली, आणि बटरचा रंग किंचतसा पिवळा केला. हा बदल ग्राहकांना चांगलाच आवडला.

६० च्या दशकपर्यंत अमुलनं बाजारात उभं राहायला जागा मिळवली होती. पॉलसन बटरचा बोलबाला कमी झाला होता. इडूलजींच्या एकाधिकारशाहीनं पॉलसनच वर्चस्वचं कमी केलं. ७० च्या दशकापर्यंत इडूलजींची मुलं पण परदेशी निघून गेली, त्यामुळे व्यवसाय पुढे संभाळण्यासाठी कोणीच नसल्यानं कंपनी विकावी लागली.

त्यानंतर पॉलसन यांनी चमड्याच्या व्यवसायात हात पाय मारायला सुरुवात केली.

२०१२ – २०१३ च्या दयम्यान एक बातमी आली होती की पॉलसन बाजारात परत येत आहे. मुंबईच्या कुलाब्यामध्ये सगळ्यात जुन्या एका फार्मा प्रोडक्टच्या दुकानात हा ब्रँड दिसून आला होता. इडूलजींचा नातेवाईक असं सांगणाऱ्या व्यक्तीकडून हे प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. पण कुटुंबातील इतर सदस्य या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे काही दिवसातचं ब्रँड पुन्हा गायब झाला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.