मोदींच्या गाडीवर टीका करण्याआधी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचं महत्व जाणून घ्या…

भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा हा गंभीर विषय असतो. पंतप्रधानांवर हल्ले करण्याची आणि त्यात पंतप्रधानांचा जीव जाण्याची वेळ ही भारताच्या दोन पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घडलेली आहे. इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी ज्याप्रकारे हल्ल्यांना बळी पडले ते संपूर्ण भारत देश कधीच विसरू शकत नाही. 

फक्त गांधी कुटुंबीयच नाहीत तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सुद्धा बऱ्याचदा जीवघेणा हल्ले झाले होते. पण नेहरु त्यातून बचावले होते. या घटना खरंतर त्यांच्या धीरोदात्त स्वभावाची ओळख करून देतात.

माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा सुरक्षेविना फिरण्याचा आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी पंतप्रधान होण्याआधीच नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते. 

सुरक्षाव्यवस्थेबद्दल पंतप्रधान नेहरूंनी जेवढी आदळआपट केली, तेवढी आदळआपट जगातील दुसऱ्या कुठल्या राजकारण्याने केली नसावी. सबळ कारण असूनही त्यांच्याइतका निर्धास्तपणा दुसऱ्या कुणाला वाटला नसेल. अगदी कमीत कमी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासही ते सातत्याने नकार देत असत. बंद टपाच्या गाडीतून प्रवास करायला त्यांचा नकार असायचा, तशा प्रकारच्या गाडीला ते ‘पिंजरा’ म्हणायचे आणि उघड्या टपाच्या गाडीतून मिरवायचे. जमावात धावत जायचे, सुरक्षा व्यवस्था मुद्दाम धुडकावून लावायचे.

असंच नागपुरात मार्च १९५५ मध्ये विमानतळावरून नेहरूंचा एका उघड्या गाडीतून प्रवास सुरू होता. पंतप्रधान गाडीत पाठच्या सीटवर मधोमध बसले होते. त्यांच्या उजवीकडे मध्य प्रांताचे राज्यपाल आणि डावीकडे मध्य प्रांताचे मुख्यमंत्री होते. पुढल्या सीटवर नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी केएफ रुस्तमजी बसले होते. आणि त्यांच्या बाजूला राज्यपालांचे लष्करी सचिव पी. आर. राजगोपाल बसले होते.

तुरुंगाच्या जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांचे छोटेछोटे जमाव गोळा झालेले होते. ते जयजयकार करीत होते. अचानक एक रिक्षा समोरच्या बाजूनं नेहरूंच्या गाडीच्या पुढ्यात आली. चालकानं कचकन ब्रेक मारला. त्यासरशी नेहरू गाडीत मागे उभे होते ते पुढे बसलेल्या लष्करी सचिवांच्या आणि रुस्तमजी यांच्या अंगावर फेकले गेले.

पुढल्याच क्षणी एक माणूस धावत आला आणि गाडीच्या फुटबोर्डावर चालकाच्या जवळ चढून उभा राहिला. नेहरूंनी त्याला विचारलं,

“क्या चाहते हो भाई?”

रिक्षा रस्त्यावर मध्येच आडवी आल्याचं पाहताच रुस्तमजी आणि लष्करी सचिव उभे राहिले. घुसखोर जेव्हा फुटबोर्डावर चढला तेव्हा राजगोपालांनी पाहिलं की त्याच्या हातात चाकू आहे.

चाकू पाहून त्यांनी चालकाच्या बाजून गाडीबाहेर उडी घेतली आणि ते त्याच्याशी झटापट करू लागले. त्याच क्षणी पोलीस सार्जंट टेरन्स क्वीन मोटर सायकलवरून तिथून चालले होते. त्यांनी मोटारसायकल त्या माणसावर घातली.

त्याशिवाय त्या रस्त्यावर ज्यांची ड्यूटी होती त्या इन्स्पेक्टर दुब्यांनाही राजगोपालाप्रमाणेच धरलं. त्या माणसावर ताबा मिळवण्यापूर्वी ते तिघंही एक मिनिट जमिनीवर लोळले असतील. मग राजगोपाल गाडीकडे वळले. दुसराही कुणी माणूस त्या कटात सामील असेल आणि लक्ष दुसरीकडे नेण्यासाठीच त्यानं पहिला प्रसंग घडवून आणला असेल तर असं वाटून रुस्तमजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी त्यांच्या अगदी जवळच उभा राहिले.

गाडी पुढे जाऊ लागली तेव्हा जमाव आरडाओरडा करू लागला,

“मारो, मारो, मार दो साले को”

मग रुस्तमजी पंतप्रधानांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्या हल्लेखोराला मागून येणाऱ्या एस्कॉर्ट कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतका वेळ ढिम्म बसून राहिलेले त्यातले अधिकारी त्या माणसाला आत घ्यायला तयार होईनात. सरतेशेवटी डि. आय. जी. बी. एम. शुक्ल आणि रुस्तमजी दोघांनी मिळून त्याला एका काळ्या मारियात म्हणजे कैद्यांना न्यायच्या व्हॅनमध्ये टाकलं आणि त्यानंतरच ते पुन्हा सुरक्षाकोडाळ्यात सामील झाले.

व्हॅनमध्ये नेताना त्या हल्लेखोराकडे रुस्तमजींनी पाहिलं होतं. हिरवा शर्ट आणि तांबड्या रंगाची पँट घातलेला तो एक फाटका इसम होता. त्याचं कपाळ अरुंद होतं, डोळे खोल गेलेले आणि कावेबाज दिसत होते. त्याच्या वागण्यात उन्माद दिसत होता. “तुझा हेतू तरी काय होता असं करण्यात?” असं त्याला विचारलं तेव्हा तो असंबद्धपणे बडबडला,

“सरकार माझ्याविरुद्ध आहे. पोलीस मला सतावतात. लोक मला षंढ म्हणतात. रिक्षा चालवण्यामुळे माझी तब्येत खालावली, रसातळाला गेली.”

त्या घटनेनंतर गुप्तहेर खात्यानं नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक विस्तृत प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावाला दिलेल्या दीड पानी टंकलिखित उत्तरात नेहरूंनी सुरक्षा व्यवस्थेच्या गैरवाजवी प्रदर्शनाला त्यांची हरकत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.