या रणरागिणीच्या क्रांतीचे पुरावे आजही लखनौ मधल्या रेजिडेंसीच्या भिंतीवर पाहायला मिळतात….

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक शूरवीरांनी इंग्रजांविरुद्ध दंड थोपटलं, त्यात १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. १८५७ चा हा उठाव फक्त इंग्रजांना पळवून लावण्यासाठी लक्षात राहत नाही तर या उठावामध्ये भारतीय महिलांनीसुद्धा शौर्य गाजवलं होतं. हा तो काळ होता जेव्हा राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने इंग्रज सरकार घाबरून जात असे, पण राणी लक्ष्मीबाई यांच्या व्यतिरिक्त अजून एक क्रांतिकारी रणरागिणी होती ज्यांनी इंग्रज सत्तेची झोप उडवली होती.

बेगम हजरत महल

इतिहासाच्या पानांमध्ये हे नाव विलुप्त होऊन गेलं खरं पण त्यांचा इतिहास हा फार मोठा आणि महत्वाचा आहे. ज्या काळात महिलांचं जीवन हे पडद्याच्या आत असायचं, फक्त चूल आणि मूल एवढीच कामगिरी यांच्यावर लादलेली असायची त्या काळात नवाब वाजिद अली शाह यांची बेगम हजरत महल या इंग्रजांविरोधात अवध प्रांताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचं प्रतीक बनल्या  होत्या.

मोहम्मदी खातून या बेगम हजरत महल कशा बनल्या यामागेही एक गोष्ट आहे. बेगम हजरत महल यांचा जन्म अवध प्रांताच्या फैसाबाद झाला. त्यांच लहानपणीचं नाव मोहम्मदी खातून होतं. त्यांचे आईवडील गरीब  होते, घरात खायचे वांदे होते म्हणून आईवडिलांनी त्यांना एका दलालाला विकून टाकलं. पुढे त्यांना नाचकाम शिकवण्यात आलं आणि त्या एक प्रसिद्ध गणिका म्हणून ओळखल्या लागल्या. इथून त्या शाही हरममध्ये खवासीन [ राजाचे कपडे वैगरे बदलून देणे आणि इतर गोष्टी ]  म्हणून आल्या. 

इथून पुन्हा एकदा मोहम्मदी खातून यांना विकण्यात आलं. यावेळी शाही दलालांनी त्यांना विकत घेतलं आणि नाव दिलं परी. अवधचा नवाबाची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांना शाही हरममध्ये सामील  करण्यात आलं.पुढे नवाबाने त्यांच्याशी विवाह केला. बिरीजस कादर नावाचा मुलगा त्यांना झाल्यानतंर बेगम हजरत महल हि उपाधी त्यांना देण्यात आली.

इंग्रजांनी राज्यकारभार चालवता येत  नाही म्हणून १८५६ मध्ये नवाब वाजिद अली यांची राजगादीवरून हकालपट्टी केली. नवाबाला कोलकातामध्ये पाठवण्यात आलं आणि मागे बेगम हजरत महल आणि मुलगा बिरीजस कादर राहिले. पण बेगम हजरत महल या महत्वकांक्षी होत्या, त्यांनी आपल्या मुलाला राजगादीवर बसवलं आणि इंग्रजांविरुद्ध मोहीम उघडली. 

याच काळात राणी व्हिक्टोरियाने अवध प्रांत हा लवकरात लवकर ईस्ट इंडियाच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. पण बेगम हजरत महलने इंग्रजांचा हा आदेश धुडकावून लावत इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी योजना आखायला सुरवात केली. हे करत असताना बेगम हजरत महल यांनी अवधच्या जनतेला विश्वासात घेतलं आणि एकजुटीने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं.

सैनिकांचा आत्मविश्वास जराही ढळू नये म्हणून त्या स्वतः मैदानात जाऊन सैनिकांचा विश्वास वाढवत असे. बेगम हजरत महल यांच्या क्रांतीचे पुरावे आजही लखनौ मधल्या रेजिडेंसीच्या भिंतीवर पाहायला मिळतात.

बेगम हजरत महल पूर्ण ताकदीने इंग्रजांशी लढल्या पण इंग्रज सेनेच्या बळापुढे त्यांना काहीच करता आलं नाही, इंग्रजांनी हळूहळू अवध प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

शेवटी बेगम हजरत महल यांना अवध प्रांत सोडून नेपाळमध्ये शरणागती स्वीकारावी लागली. आपल्या आयुष्याचे शेवटचे दोन दशकं बेगम हजरत महल यांनी शरणार्थी सारखे काढले. इंग्रजांनी मोठ्या रकमेची लालच दाखवून त्यांना माघारी बोलावलं होतं पण बेगम हजरत महल यांनी अगोदरच सांगितलं होतं कि स्वतंत्र अवध सोडून आम्ह्लाला काहीच नकोय. अवधच्या या वीरांगनेने १८७९ मध्ये नेपाळमध्येच शेवटचा श्वास घेतला. काठमांडूमध्ये आजही बेगम हजरत महल यांचा मकबरा पाहायला मिळतो. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.