एका महिलेला मंदिराबाहेर दान म्हणून अडीच लाख रुपये मिळाले पण तिने मंदिरातच दान केले.
तुम्ही कोणत्याही मंदिरात देवाच्या दर्शनाला जा तिथे गेलात तर तुम्हाला दानपेटीत देणगी देण्याची प्रक्रिया रोज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरू असते, पण फार कमी लोकं असतात, ज्यांच्या दान केलेल्या देणग्यांकडे मीडियाने लक्ष दिलेले असते…असो
अलीकडेच, म्हैसूरमधील वोंटीकोप्पल येथील प्रसन्ना अंजनेय स्वामी मंदिरात एका ८५ वर्षीय महिलेने अडीच लाख रुपये दान केले आहेत. तुम्ही म्हणाल असेल कुणी श्रीमंत बाई जिला दानधर्म करायचा आहे म्हणून अडीच लाख रुपये दान केलेही असतील त्यात काय कौतुक …पण थांबा या महिलेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण, हि महिला ज्या मंदिराला तिने दान केले त्याच मंदिराच्या बाहेर ती गेल्या दहा वर्षांपासून भिक मागते.
एम.व्ही सीतालक्ष्मी नावाची ही महिला आहे जिची आपण आत्ता चर्चा करतोय.
सीतालक्ष्मी या याच प्रसन्ना अंजनेय स्वामी मंदिराच्या गेटवर गेल्या दहा वर्षांपासून भिक मागतात. त्यांना जेंव्हा विचारलं कि एवढी मोठी रक्कम तुम्ही मंदिराला का बरं दान दिली? तर त्यांनी माध्यमांना सांगितले कि, मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा आणि प्रसाद मिळावा यासाठी त्यांनी ही रक्कम दान केली आहे.
याची माहिती भाविकांना समजताच त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिचे अभिनंदन करून आशीर्वाद घेतले. पण त्यांना अशी भिक मागायची वेळ का बरं आली अशा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं कि,यादवगिरी येथे भाऊ आणि मेहुण्यासोबत राहणाऱ्या या महिलेला कोणावरही अवलंबून राहायचे नव्हते. त्यासाठी ती दिवसा मंदिरात बसायची, तिथे मंदिर प्रशासन तिची काळजी घेत असायचं.
काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यानही या महिलेने मंदिराला सुमारे ३० हजार रुपयांची देणगी दिली होती. यावेळेस तिने दान करण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांसोबत बँकेत गेली, जिथे तिने मंदिराच्या नावावर २ लाख रुपये दिले. एकूण या महिलेने अडीच लाखांहून अधिक रक्कम दिली आहे.
सीतालक्ष्मी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत देखील दिली, या मुलाखतीत सीतालक्ष्मी म्हणतात कि, ‘लोकं मला जे काही पैसे द्यायचे ते मी बँकेत जमा करायचे. लोकांनी मदतीसाठी मला पैसे दान दिले. माझी देवावर खूप श्रद्धा आहे, मला माहिती आहे कि माझा देव मला कधीही उपाशी झोपू देणार नाही. माझ्यासाठी माझा देवच सर्वस्व आहे, म्हणून मी हे पैसे मंदिराला दान करण्याचा निर्णय घेतला ज्याने दिवसभर माझी काळजी घेतली. दर दिवशी मंदिर प्रशासन सर्व लोकांना प्रसाद देत रहावेत.’
मंदिराचे अध्यक्ष बसवराज म्हणतात की ‘ती महिला इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यांनी कधीही कोणाकडून काही मागितले नाही. मंदिराच्या एका कार्यक्रमात आमदारांनी देखील त्यांचा गौरव केला आहे”
थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच आहे कि, तुमच्याजवळ किती संपत्ती आहे यावरून तुम्ही किती दानधर्म करता हे महत्वाचं नाही तर, तुमच्याजवळ जे काही मुबलक प्रमाणात असे ते निस्वार्थ मनाने आणि कोणत्याही परतफेडीच्या अपेक्षेशिवाय देण्यात खरा दानधर्म असतो असं आपले संत सांगून गेले ते खरंच आहे.
हे हि वाच भिडू :
- किनवट सारख्या दुर्गम भागात आदिवास्यांचे आरोग्य सांभाळणारा देवमाणूस!
- या संत एक हग देऊन डिप्रेशन घालवतात म्हणे !
- रस्त्यावर भिक मागणाऱ्या ४५० अनाथ पोरांसाठी या पोलीसाने शाळा सुरू केलेय.