बेजान दारूवाला ज्योतिष्यांमधले अमिताभ बच्चन होते.

आपलं भविष्य काय हे जाण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. काही जण गंमत म्हणून भविष्य बघतात तर काहीजण रोज भविष्य बघितल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत.

रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसलेल्या कुडमुड्या पासून ते वर्ल्डकपच भविष्य सांगणाऱ्या पॉल ऑकटोप्सपर्यंत अनेक प्रकारचे ज्योतिषी आहेत. नोकरी कधी लागणार, लग्नाचा योग कधी आहे, बाळ कधी होणार असे प्रश्न आपण ज्योतिषाला विचारतो.

पण भारतात एक ज्योतिषी असे होते जे पंतप्रधान कोण होणार याची भविष्यवाणी करायचे आणि ती खरी व्हायची.

बेजान दारुवाला.

भारत ही ज्योतिषांची भूमी आहे हे जर मान्य केलं तर बेजान दारुवाला ज्योतिषामधले अमिताभ बच्चन होते. पारसी असूनही गणपतीवर त्यांची श्रद्धा होती. टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून येणारे गणेशा स्पिक्स हे सदर प्रचंड पॉप्युलर होते.

ते मूळचे अहमदाबादचे. पण मुंबई त्यांची कर्मभूमी होती. इथेच HA आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयात ते इंग्रजी विषय शिकवायचे. ज्योतिषविज्ञानाची त्यांना आवड होती.

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूची त्यांनी आधीच भविष्यवाणी केली होती.

ही भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर बेजान दारुवाला हे नाव रातोरात फेमस झाले. अनेक पुढारी, फिल्मस्टार, चित्रपट निर्माते, क्रिकेटपटू आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर रांगा लावू लागले.

सर्वसामान्य लोकांमध्येही या गूढ नाव असलेल्या ज्योतिषाच वलय निर्माण झालं होतं.

बेजान दारुवाला यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या होत्या. ज्यात राजीव गांधींचा मृत्यू, अटलबिहारी वाजपेयी यांची पंतप्रधानपदी निवड, गुजरातमधील भूकंप, मनमोहन सिंग यांना अचानक मिळणारे पंतप्रधानपद असे अनेक आश्चर्यकारक भविष्य त्यांनी सांगितलं होतं.

मोदी यांचे युग भारतीय राजकारणात सुरू होईल हे भविष्य सांगणारे बेजान दारुवाला हे पहिले भविष्यवेत्ते होते.

तिबेटचे महागुरू दलाई लामा यांनी देखील एकदा बेजान दारुवालांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेतला होता.

दारुवाला सांगायचे की ,

ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे का याच्याशी माझे कोणतेही देणेघेणे नाही. पण या गोष्टीला हजारो वर्षांची परंपरा आहे.

ज्योतिष हे फक्त राशींवर आधारभूत नाही तर त्याच्या मागे कित्येक गोष्टी असतात. मी या सर्वाचा अभ्यास करतो आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मनाचा कौल घेतो आणि भविष्य सांगतो.

याचा अर्थ असा नाही की त्यांची प्रत्येक भविष्यवाणी खरीच ठरत होती.

2003 चा क्रिकेट वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका जिंकेल आणि 2007 चा वर्ल्ड कप भारत जिंकेल हे त्यांचे अनुमान साफ खोटे ठरले होते. मात्र तरीही त्यांच्या दाव्यानुसार जवळपास 77% भविष्य खरं ठरत होतं.

गेल्या काही दिवसांपासून अख्ख्या जगाला लॉकडाऊन करून छळत असलेला रोग म्हणजे कोरोना.

तो कधी संपेल हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. बेजान दारुवाला यांनी भविष्यवाणी केली होती की 21 मे 2020 रोजी हा रपज नष्ट होणार आहे पण तसं घडलं नाही.

काल बेजान दारुवाला यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्याना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सर्वत्र होती.

त्यांना न्यूमोनिया व फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास होत होता. शिवाय ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे त्याना अहमदाबादमधल्या अपोलो रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

त्यांच्या मुलाने नस्तुर दारुवालाने बेजान यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे वृत्त फेटाळले आहे मात्र गुजरात सरकारच्या कोरोना बधितांच्या यादीत बेजान दारुवाला हे नाव समाविष्ट आहे.

बेजान दारुवाला आपलं आयुष्य पुरेपूर जगले. जगभरातील ज्योतिष्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. अनेक देशातून लोक त्यांचे मार्गदर्शन घेत होते. भारतीय ज्योतिषशास्त्राला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या बेजान दारुवालांच नाव सहजासहजी कोणी विसरणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.