भारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका हत्तीला देखील दिलं जातं…

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कधी काय घडेल काही सांगता यायचं नाही. कधी एखादी टीम हरते असं वाटतं तोच ती टीम कधी सामना अंतिम क्षणाला जिंकून आणेल काही सांगता येत नाही. आपल्या भारतीय टीमचा बाबतीत तर असं कित्येक वेळेस घडलं आहे. खेळ जरी वाईट चालू असला तरी कोणत्या टीमच्या बाजूने शेवटचं पारडं झुकेल याचा नेमका अंदाज कोणी सांगू शकत नाही.

भारतीय टीमने १९७१ साली इंग्लंड टीमविरुद्ध जिंकलेला पहिला सामना असाच काहीसा होता. पण तो सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला एका हत्तीणीकडून प्रेरणा मिळाली होती. 

हो, तुम्ही वाचलंत ते अगदी बरोबर आहे. आत्ता हत्तीण आणि भारतीय टीम यांचा संबंध नेमका काय?

तर झालं असं,

१९७१ साली भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. तो काळ असा होता की नवाब मन्सूर अली खान पतौडी यांची दृष्टी काहीशी कमजोर झाली होती. त्यामुळे त्यांचा फॉर्म उतरला होता. या सर्व कारणांमुळे भारतीय संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी अजित वाडेकर यांच्यावर सोपवली गेली होती. 

इंग्लंडला जाण्याआधी भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध सीरिज १-० ने जिंकली होती. परंतु भारतीय टीमची अवस्था इतकी बिकट होती की, ‘ही सीरिज भारताने योगायोगाने जिंकली असंच सर्वजण म्हणत होते.’ या सिरिजच्या वेळेस सुद्धा अजित वाडेकर कॅप्टन होते. 

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरून भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली.

१९७१ साली इंग्लंड संघ हा क्रिकेट जगतातला अव्वल संघ म्हणून ओळखला जात होता. इंग्लंड आणि भारतीय टीमच्या सिरिजला सुरुवात झाली. पहिल्या दोन्ही मॅच इतक्या अटीतटीच्या झाल्या की भारतीय टीमने शर्थीचे प्रयत्न करून मॅच ड्रॉ केल्या. त्यामुळे  सीरिजमध्ये भारतीय संघाने स्वतःचं आव्हान जिवंत ठेवलं होतं. 

लवकरच सीरिजमध्ये तिसरा सामना सुरू होणार झाला. इंग्लंडने पहिली फलंदाजी करत ३५५ धावा केल्या. भारताने सुद्धा फारुख इंजिनियर आणि दिलीप सरदेसाई यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला प्रत्युत्तर दिले.

परंतु झालं असं होतं की, तीन दिवस झाले तरी भारताची पहिली इनिंग संपली नव्हती. त्यामुळे तिसरी मॅच सुद्धा ड्रॉ होणार अशीच सर्वांची अपेक्षा होती. 

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी भारतीय टीममधील सर्व खेळाडू मैदानावर सराव करत होते. आणि अचानक एका महिलेसोबत एक हत्तीण मैदानामध्ये आली. भारत आणि इंग्लंडचा सामना ज्या ओव्हल मैदानावर सुरू होता त्याच्या बाजूला रशियन सर्कसचा तंबू लागला होता. त्या सर्कस मधली ती ‘बेला’ हत्तीण होती.

ती हत्तीण संपूर्ण मैदानात फेरफटका मारायला लागली. सर्व खेळाडू तिच्याकडे पाहत राहिले. टीमचे मॅनेजर अजित वाडेकरांजवळ आले आणि म्हणाले,

“अजित ही संधी चांगली आहे. गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि गणेशाच्या रूपाने हत्ती मैदानावर आला आहे. या शुभसंकेतामुळे आपण आजचा सामना नक्कीच जिंकू.”

हाडाचे मुंबईकर असलेल्या अजित वाडेकर यांना या वाक्यामुळे प्रेरणा मिळाली. योगायोग म्हणा की आणखी काही, चौथ्या दिवशी २८४ रन्सवर भारतीय संघाची इनिंग संपली. ७१ धावांनी भारतीय संघ पिछाडीवर होता. परंतु याच दिवशी भारतीय संघाने धमाकेदार पुनरागमन केलं. भगवत चंद्रशेखर यांनी स्वतःच्या गोलंदाजीच्या जाळ्यात इंग्लंडच्या संघाला फसवले. चंद्रशेखर यांनी घेतलेले सहा विकेट आणि त्यांना इतर गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे,  इंग्लंडचा डाव १०१ धावांवर आटोपला.

भारताला जिंकण्यासाठी १७३ धावा हव्या होत्या. 

आपला देश १५० वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली पारतंत्र्यात होता. देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी क्रिकेटमध्ये भारताने इंग्लंडला हरवलं नव्हतं. हीच संधी होती. भारताने बॅटिंगला सुरुवात केली. दिलीप सरदेसाई यांच्या जोडीने अजित वाडेकर यांनी विजयाच्या दिशेने कुच केली. ४५ रन्स झाल्यावर अजित वाडेकर आऊट झाले. आऊट झाल्यानंतर निराश होऊन अजित वाडेकर ड्रेसिंग रूममध्ये येऊन चक्क झोपून गेले. 

भारताला जिंकायला अजूनही ९७ धावांची गरज होती. परंतु गुंडप्पा विश्वनाथ (३३) आणि फारुख इंजिनियर (२८) यांनी संयमी खेळी करून भारताला ही मॅच जिंकून दिली. भारतीय संघाच्या या अनपेक्षित विजयाने इंग्लंडचे मॅनेजर केन बॅरिंग्टन यांनी अजित वाडेकर यांना झोपेतून उठवले आणि म्हणाले,

“अजित उठा! तुमच्या संघ पहिल्यांदा जिंकला आहे.”

या विजयामुळे भारताने इंग्लंड विरोधातल्या गुलामीच्या बेड्या कायमच्या तोडून टाकल्या. या विजयामुळे जेव्हा भारतीय संघ मुंबईमध्ये आला, तेव्हा सांताक्रूझ एअरपोर्ट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान संपूर्ण रस्ता भारतीय संघाच्या चाहत्यांनी खचाखच भरला होता. भारतीय टीमने जणूकाही वर्ल्डकप जिंकला, इतका आनंद भारतीयांनी साजरा केला.  

आपल्या प्रत्येकाला खडतर काळात काहीतरी मोटिवेशन ची गरज असते. भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध सामना जिंकण्याचं मोटिवेशन एक हत्तीण पाहून मिळालं. श्रद्धा – अंधश्रद्धेचा भाग दूर, पण भारताने त्यावेळी पहिल्यांदा जिंकलेला इंग्लंड विरुद्धचा सामना फार महत्वाचा होता. 

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.