मारवाडी मिठाईवाल्याची रेसिपी गंडली त्यातून बेळगावचा कुंदा जन्मला
जगात जी काही सुंदर शहरे असतील तर त्यात बेळगावचा समावेश नक्की होईल. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचं आटोपशीर गाव. शांत आल्हाददायक वातावरण, लाल मातीचे रस्ते, गर्द झाडी. कानडी झाक असलेल्या मराठीत बोलणारी गोड माणसं.
बेळगावच्या मातीत असलेला गोडवा इथल्या एका रेसिपीमध्ये उतरलाय.
बेळगावचा कुंदा
बेळगावची ओळख म्हणजे इथला गोड कुंदा. पुलं देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बेळगावला जाऊन कुंदा न घेता आलं तर फाऊल मानलं जावं इतकं कुंद्याचं बेळगावशी नाते जोडलेलं आहे.
पण या कुंद्याची जन्मकथा सुद्धा खूप गंमतीशीर आहे.
गोष्ट आहे सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची. ब्रिटिशांच राज्य सुरू होतं. जहां न जाये गाडी वहा पे जाये मारवाडी अस म्हणतात. मारवाडी समाज दुष्काळी राजस्थानमधून व्यवसायाच्या निमित्ताने राज्याबाहेर पडला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला, अगदी दुधात साखर मिसळावी असा विरघळून गेला.
अशाच मारवाडी समाजातील काही कुटूंब बेळगाव जवळच्या शहापूर येथे वसले होते. यातील गंगाराम नावाच्या व्यक्तीच गजानन मिठाईचं दुकान होतं. या दुकानात जक्कु महाराज नावाचा एक आचारी होता. गंगाराम यांनी त्याला राजस्थान वरून आपल्या मदतीसाठी बोलवून घेतलं होतं.
जक्कु मारवाडी मिठाई बनवण्याच्या कामात तरबेज होता.
त्याच्या हाताला चव होती. पण जक्कु थोडासा आळशी होता. पण डोकं प्रचंड हुशार होतं.
एकदा तो कशासाठी लागेल म्हणून दूध तापवत होता. तो जमाना स्टोव्हचा होता. जक्कू महाराज स्टोव्ह वर दूध ठेवून दुकानातल्या कामासाठी बाहेर गेले, परतल्यावर पाहतात तर काय दूध आटून घट्ट बनलं होतं.
स्टोव्हचं बटन बंद करायलाच तो विसरला होता.
जक्कू घाबरला. स्वतःच्या निष्काळजीपणाला त्याने खंडीभर शिव्या घातल्या. गंगाराम शेटजीला कळल्यावर दंगा होणार हे ओळखून या आटलेल्या दुधाचं काही तरी विल्हेवाट लावायचं त्यांनी ठरवलं.
आधीच सांगितल्याप्रमाणे जक्कु महाराज हुशार होते.
त्यांनी गंडलेल्या दुधाची टेस्ट पाहिली. ते दूध गोड लागत होतं. याच दुधात त्याने खवा मिक्स केला. आणखी काही तास ते मिश्रण ढवळलं.
एवढी सगळी उसाभर केल्यावर तयार झाली एक गोड खास चवीची मिठाई. जक्कुने दूध आटवलं म्हणून त्याला रागवायला आलेल्या गंगाराम शेटजी यांनी जेव्हा त्याने बनवलेली मिठाई चाखली तेव्हा त्यांना ती प्रचंड आवडली.
जक्कूवर ते प्रचंड खुश झाले.
ही नवी मिठाई त्यांनी आपल्या दुकानात विकायला ठेवायचं ठरवलं. पण त्यापूर्वी मिठाईला नाव दिलं पाहिजे.
जक्कू मारवाड्याने आपल्या लाडक्या लेकीचं या मिठाईला दिलं.
हाच तो जगप्रसिद्ध कुंदा.
साजूक पौष्टिक कुंदा अगदी थोड्याच दिवसात फेमस झाला. मारवाडी पुरोहित मिठाई दुकानात तो हमखास मिळू लागला. त्यात अनेक प्रयोग करून त्याची चव वाढवली.
काजू बदाम घातलेला खमंग कुंदा बेळगाव बाहेरच्या लोकांना देखील भयानक आवडला. कित्येकांनी तो बनवण्याचा प्रयत्न देखील केला पण सुपीक बेळगावच्या गाईम्हैशींच्या दुधाला चव आहे की काय माहीत. तिथे बनणारा कुंदा बाहेर कुठेही तसा बनत नाही.
गेली अनेक वर्षे शहापूरमधलं ते गजानन मिठाईचं दुकान आजही तितकंच फेमस आहे.
जवळपास २०० दुकानात कुंदा मिळतो. एका दुकानात रोज शेकडो लिटर दुधापासून ६०० किलो कुंदा बनतो. म्हणजे थोडं गणित घातलं तर कित्येक टन कुंदा बेळगाव मध्ये तयार होतो आणि खपतो.
बेळगावच्या स्टेशनवर शिरणाऱ्या रेल्वेच्या डब्ब्यात पहिल्यांदा कुंदयाचा घमघमाट पसरतो. प्रत्येक प्रवासी कुंदयाचा एखादं पाकीट घेतल्याशिवाय बेळगावच्या बाहेर पाऊल टाकत नाही.
आता तर कुंदा सातासमुद्रापार पोहचलाय. बेळगावला त्याने कुंदानगरी अशी ओळख बनवून दिलीय. गरमागरम कुंदा त्याची जिभेवर रेंगाळणारी चव बेळगावच्या खाद्यसंस्कृतीचं तिथल्या हौशी लोकांच्या रसिकतेचं प्रतीक बनली आहे हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे हे नाव इंग्रजांमुळे नाही तर छत्रपतींमुळे मिळालं.
- मगनलाल चिक्की बंद करणं, हा पुण्यासोबत मुंबईचा देखील राष्ट्रीय मुद्दा आहे..
- ताजमहल बांधणाऱ्या कामगारांसाठी आग्र्याच्या पेठ्याचा शोध लागला.