सांगून खोटं वाटेल, पण वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करणारा प्लेअर सचिन तेंडुलकर नाहीये…

२४ फेब्रुवारी २०१०. भारताची साऊथ आफ्रिकेसोबत वनडे मॅच होती. आम्ही पोरं शाळेत होतो. मॅचचं काय झालं हे कळायचा एकच मार्ग होता, शाळेतल्या शिपाई मामांचं घर आणि तिथला टीव्ही. दर १५-२० मिनिटांनी आमच्या गॅंगमधला एक तरी भिडू वर्गाबाहेर जायचा आणि शिपाई मामांच्या घरी चक्कर टाकून यायचा. तो वर्गात आला की, सगळ्यांचा एकच प्रश्न असायचा…

“कितीवर खेळतोय ?”

त्यादिवशी सचिन जबरदस्त बॅटिंग करत होता, सेंच्युरी पार झालेली तरी आकडे पळत होते. त्या दिवशी सचिनचंही नशीब फॉर्मात होतं आणि आमचंही, कारण पीटीचा तास आपण घ्यावा असं कुठल्याच विषयाच्या मास्तरांना वाटलं नाही आणि आम्ही उंडारायला मोकळे झालो. त्यादिवशी पीटीच्या सरांसकट सगळे जण शिपाई मामांच्या घरी होतो. सचिन खेळतच होता. नेमकी त्याची गाडी १९९ वर अडकली. त्यात धोनी स्ट्राईक फिरवायची सोडून हाणामारी करायला लागला, त्यामुळं टेन्शन जास्त वाढलं होतं.

५० व्या ओव्हरचा तिसरा बॉल, सचिननं सिंगल काढली आणि २०० ही मॅजिक फिगर गाठली. शिपाईमामांच्या घरात पोरं उभं राहून टाळ्या वाजवू लागली आणि या सगळ्यात रवी शास्त्रीचं एक वाक्य कानावर पडलं…

“Gets it. The first man on the planet to reach 200 and it’s the superman from India – Sachin Tendulkar 200 from 147. Take a bow master.”

आता आपलं इंग्लिश तेव्हा लय बेसिक होतं, त्यात शास्त्री प्लॅनेट वैगेरे म्हणला त्यामुळं असं वाटलं की सचिननं जगात पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये दोनशे रन्स मारलेत. 

मग लय वर्षांनी समजलं सचिन वनडे क्रिकेटमध्ये दोनशे मारणारा पहिला पुरुष क्रिकेटर आहे आणि त्यानं दोनशे मारायच्या १३ वर्ष आधी वनडे क्रिकेटमध्ये दोनशे मारले गेले होते आणि ती खतरनाक इनिंग खेळणाऱ्या प्लेअरचं नाव होतं,

बेलिंडा क्लार्क.

तिचं नाव सांगण्याआधी एवढं पुराण सांगितलं याचं कारण म्हणजे, सचिननंच वनडेत २०० मारायची सुरुवात केली हे आपल्या डोक्यात तेवढं फिट्ट बसलं होतं. पण बेलिंडाची गोष्टही सचिन इतकीच भारी आहे.

१६ डिसेंबर १९९७, भारतात महिलांचा वर्ल्डकप सुरू होता. ऑस्ट्रेलियाची टीम फॉर्मात होती. बेलिंडा त्यांची कॅप्टन.

ऑस्ट्रेलियाची मॅच डेन्मार्कसोबत होती, तेही आपल्या मुंबईत. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली, बेलिंडा ओपनिंगला आली. टुकूटुकू खेळण्याचा प्रश्नच नव्हता, तिनं आल्याआल्या हाणामारी करायला सुरुवात केली.

त्यादिवशी तिनं डेन्मार्कच्या बॉलर्सचा अक्षरश: घाम काढला. तिनं पहिल्या विकेटसाठी लिसा केटलेसोबत १६८ रन्सची पार्टनरशिप केली. त्यानंतर कॅरेन रोल्टनसोबत १३६ आणि मेल जोन्ससोबत ७१ रन्स जोडले. एका एन्डनं ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूनं बेलिंडाचं बाजार उठवणं सुरूच होतं. तिनं १५५ बॉलमध्ये २२९ रन्स चोपले, या इनिंगमध्ये तिनं २२ फोर मारल्या. म्हणजे फक्त ८८ रन्स बाउंड्रीमधून आले, उरलेले १४१ रन्स तिनं पळून काढले होते. याच गोष्टीवरून तिच्या खतरनाक स्टॅमिनाचा अंदाज येतो.

ओपनिंगला आलेली बेलिंडा शेवटच्या बॉलपर्यंत नॉटआऊट होती, तिनं वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिली डबल सेंच्युरी मारत इतिहास रचला होता…

पण बेलिंडाची ओळख इतक्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाही. तिनं १९९७ च्याच वर्ल्डकप फायनलमध्ये मॅच विनिंग ५२ रन्स केले होते. तिनं ऑस्ट्रेलियाला १९९७ आणि २००५ असे दोन्ही वर्ल्डकप जिंकवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

आपल्याला ऑस्ट्रेलियन टीम आणि कॅप्टन हे दोन शब्द एकत्र घेतल्यावर रिकी पॉन्टिंग आठवतो…

रिकी पॉन्टिंगनं पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जसं आपल्या टीमला बादशहा बनवलं होतं, अगदी तसंच महिलांच्या क्रिकेटमध्ये बेलिंडानं केलं. १९९१ मध्ये तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि १९९४ मध्ये तिच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशिपची जबाबदारी आली आणि रिटायर होईपर्यंत बेलिंडा ऑस्ट्रेलियन वुमन्स टीमची कॅप्टन होती.

तिनं फक्त वनडे क्रिकेटच नाही, तर टेस्ट क्रिकेटही गाजवलं. पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्येच तिनं सेंच्युरी केली होती. सलग १५ टेस्ट मॅचेस खेळण्याचा विक्रमही तिनं केला. पण सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे तिनं वुमन्स क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाहीये, हे दाखवून दिलं.

तिनं ऑस्ट्रेलियन टीमला जिंकायची सवय लावली, वनडेमध्ये दोनशे रन्स करता येतात हे पहिल्यांदा दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुला-मुलींच्या कित्येक पिढ्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. आज तिच्या नावानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मेडल दिलं जातं, तिचं नाव हॉल ऑफ फेममध्ये आहे, पण सचिनच्या दोनशेची न थकता चर्चा करणारे आपण बेलिंडाला मात्र विसरुन जातो, एवढं खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.