बेनझीर भुट्टोला पंतप्रधान बनवणारं गाणं आजही आपल्या बेंजोवर दणका उडवतंय..

गेले दोन तीन महिने पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे पब्लिक लक्ष ठेऊन आहे. दोन्ही मोठ्या पक्षांनी आपापली फुल्ल हवा केलीय. एकमेकांवर आरोप वगैरे केलेत. कोण किती कट्टर हिंदू वगैरे पर्यंत चर्चा गेलीय. दीदी स्कुटर वरून पडून झाल्यात. अशातच एक बंगाली प्रचारगीत सोशल मीडियावर जलवा करतंय. बंगाली फिल्मवाल्या लोकांनी एक गाणं केलं जे तुफान चाललंय.

ते गाणं म्हणजे तृणमूल काँग्रेसचं खेला होबे.

फक्त बंगालच नाही तर संपूर्ण देशात हे गाणं व्हायरल झालंय. तर त्याला उत्तर द्यायला भाजपने देखील बदलाव गीत प्रचारात आणलं  आहे.प्रचार गीतांची मारामारी तिथं बघायला मिळत आहे.

आपल्याला प्रचारगीत प्रकार काय नवीन नाही. महाराष्ट्रात तर प्रचारगीते आपण लै आधीपासून ऐकत आलोय. प्रचार गीतांवर पब्लिक धिंगाणा पण घालत असते. शिवसेनेचं शिवसेनागीत, मनसेचं अजय-अतुलने बनवलेलं फुल्ल ऑन राडा करणारं गाणं , राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी पुन्हा वगैरे गाणी आपल्याकडे प्रचारात धुडगूस घालत असतातच की. त्याशिवाय आमदार खासदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी  डिजेवर दणकवायला स्वतःची गाणी बनवतात ती वेगळी.

पण हे काय आजचं नाही. 80 -90 च्या दशकात बेंजोवर, बुलबुल तरंगवर एक गाणं हमखास वाजयचं. ती धून लै भारी होती. पब्लिक जबरी थिरकायची. पण ती धून पाकिस्तानच्या पीपीपी या पक्षाचं प्रचारगीत होतं. चायला पाकिस्तानच्या पक्षाचं प्रचारगीतावर आपल्याकडची पब्लिक धिंगाणा घालतेय हे आज ऐकायला कसंतरीच वाटत असेल.म्हणून मूळ गाण्याची लिंक देतो.

धून ऐकली?

हे बेनझीर भुट्टो साठी केलेलं प्रचारगीत होतं. शब्द कळत नसले तरी म्युझिक दणका हाय. या गाण्याचा इतिहास देखील मोठा हाय. बेनझीर भुट्टोला पंतप्रधान बनवणारं गाणं म्हणून याला ओळखलं जातं.

ऐंशीच्या दशकातली गोष्ट. एव्हाना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी देण्यात आली होती. या फाशीवरून जगभरात प्रचंड खळबळ उडाली होती. झुल्फिकार भुट्टो सारख्या लोकप्रिय नेत्याला थेट फासावर चढवल्यामुळे पाकिस्तानी जनता देखील लष्करशहा झिया उल हक यांच्यावर नाराज होती.

झुल्फिकार भुट्टो यांचा राजकीय वारसा आला त्यांच्या लेकी कडे

बेनझीर भुट्टो

वडिलांच्या फाशी नंतर बेनझीर देखील सात वर्षे जेल मध्ये होती. ऑक्सफर्ड मध्ये शिकून आलेल्या बेनझीरने राजकारणाचे धडे तुरुंगातच गिरवले. तिथून सुटका झाल्यावर देखील पुढची तीन चार वर्षे ती लंडनला अज्ञातवासात राहिली. याच काळात तिचे असिफ अली झरदारी यांच्याशी लग्न देखील झालं.

लंडनमधल्या तिच्या फ्लॅटमध्येच पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचे अनधिकृत हेड क्वार्टर बनले. झुल्फिकार अली भुट्टोच्या दोन मुलांना मागे टाकून बेनझीरने पक्षाच्या राजकारणावर आपली पकड बनवली. अशातच तिच्या भावाचा शाहनवाजचा फ्रान्समध्ये खून झाला.

शाहनवाज च्या मृतदेहाला घेऊनच बेनझीर पाकिस्तानला परत आली. त्याच्या अंत्ययात्रेची सभा म्हणजे बेनझीर भुट्टोच्या राजकीय ताकदीचं प्रतीक होती. झुल्फिकार भुट्टोना फासावर चढवणारे झिया उल हक मात्र आपली पकड कमी करायला तयार नव्हते.

१९८८ साली विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा लोकशाही आली.

झिया उल हक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकाची तारीख ठरली १६ नोव्हेम्बर १९८८. हीच तारीख निवडण्यामागे देखील विरोधकांच राजकारण होतं. झालं असं होतं कि बेनझीर त्या काळात गरोदर होती. तिला प्रचारात येणार नाही अशीच तारीख विरोधकांनी निवडणुकीसाठी निवडण्यात आली. पाकिस्तानी आयएसआयची सुद्धा इच्छा होती की बेनझीर भुट्टो आणि पीपीपी पार्टी निवडणुकीत पडावी.

पण बेनझीरचे इरादे बुलंद होते. सुरवातीच्या काळात ती प्रचारात उतरली नाही पण त्या ऐवजी तिच्या पक्षाने एक खास गाणं बनवलं होतं. हेच ते बेनझीरचं प्रचार गीत,

दिला तीर बिजा, ईहयां दुश्मन अथी’ 

पाकिस्तानी पीपल्स पार्टीच निवडणुकीतलं चिन्ह होतं बाण. या बाणाला धरून जहूर खान जेबी याने हे गाणं बनवलं होतं. या पूर्वी पीपीपी तलवार चिन्हावर निवडणूक लढायची पण त्यांना त्यात पराभूत व्हावं लागलं होतं पण बेनझीर मुळे यावेळी बाण चिन्ह घेतलं. हा बाण खरच वर्मी लागला.

पाकिस्तान मध्ये हे प्रचार गीत प्रचंड गाजलं. त्यातल्या बोला प्रमाणे बाण जनतेच्या हृदयात उतरत होता. बेनझीरची संघर्ष यात्रा या गाण्यात सांगितली होती. वडिलांच्या मृत्यू नंतर ती कशी उभी राहिली वगैरे वगैरे ची कहाणी ऐकून पाकिस्तानी जनता इमोशनल झाली होती.  एका गाण्यामुळं निवडणुकीचं वारं तिच्या बाजूने वाहू लागलं.

प्रचार सुरु असतानाच बिलावल भुट्टोचा जन्म झाला. नुकतंच जन्मलेल्या बाळाला घरात ठेवून बेनझीर निवडणुकीच्या सभांना जाऊ लागली. तिच्या जिद्दीला पाकिस्तानी जनतेने सलाम केला.

१९८८ साली बेनझीरने ती निवडणूक जिंकली आणि पाकिस्तानला पहिली महिला पंतप्रधान मिळाली.

या गाण्यामुळे बेनझीर आणि तिच्या पार्टीला निवडणूक जिंकण्यात कितपत फायदा झाला ते माहीत नाही पण आपल्याकडच्या बेंजो ग्रुप्स ने या गाण्यावर बेफाम कमाई केली आणि नंतर भट साहेबांनी पाकिस्तानी गायक वगैरे इकडे आणून बक्कळ छापले तो भाग वेगळा.

आता आपल्याकडच्या गणपती मिरवणुकीत नाशिक बजावर हीच धून वाजवतानाची लिंक बघा.

एक टाईम असा होता की सण समारंभ कोणताही असुदेत बेंजो मागवला तर बेंजोवर हे गाणं वाजणार म्हणजे वाजनारच. आजही मुंबईत कट्टर बेंजो किंवा बुलबुल तरंग प्रेमी ही धून वाजवतातच. हैदराबादला मारफा डान्स करताना पण या गाण्यावर धुमाकूळ सुरूच असतो.

एवढंच नाही तर या पाकिस्तानी प्रचार गीताची धून थेट अमिताभ बच्चनच्या इंद्रजित या सिनेमात वापरण्यात आलीय. संगीतकार आहेत खुद्द आर.डी.बर्मन. अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं.

बंगाली प्रचारगीत ऐकता ऐकता हे गाणं आठवलं आणि कळलं की प्रचारगीत हा प्रकार लै जुनाय. आपल्या कार्यकर्त्यांना माहीत असावं म्हणून एवढं रान हाणाव लागलंय.

  • प्रथमेश पाटील

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.