ज्यू लोकांनी मराठी कीर्तन मंडळ स्थापन केलं होत आणि ते पार कराची पर्यंत फेमस होतं

स्वच्छ पांढरा धोतरसदरा, डोकीवर खास टोपी, गळ्यात वीणा. टाळ मृदूंगाच्या साथीने ह.भ.प महाराज आपल्या खड्या आवाजात भजन कीर्तन हरिभक्तीच पारायण रंगवू लागले की भक्त तल्लीन होऊन जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या गावात नेहमी दिसणारं हे चित्र. वारकरी संप्रदायाने ही कीर्तनाची प्रथा सर्वत्र रुजवली.

नुकतंच असच एक कीर्तन मुंबईमध्ये झालं. या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मराठीत झालेलं कीर्तन ज्यू लोकांचं होतं.

ऐकून धक्का बसला ना? मराठी बेणे इस्रायली लोकांच्यातही कीर्तनाची परंपरा आहे आणि ती जवळपास १०० हुन अधिक वर्षे जुनी आहे.

इसवी सनाच्या पहिल्या व दूसऱ्या शतकात इस्रायलच्या ज्यू लोकांनी अन्याय अत्याचाराला कंटाळून आपला देश सोडला. त्यातीलच एक जहाज अलिबागच्या किनाऱ्यावर असताना फुटलं. काही जोडप्यांनी पोहत पोहत किनारा गाठला. ही जोडपी होती सात. म्हणजे एकूण १४ लोकं. हेच ते मराठी मातीत आलेले पहिले बेणे इस्रायली लोक.

अलिबाग जवळच्या भागात ज्यू लोक विस्तारत गेले. सुरवातीला त्यांनी तेल विकण्याच काम केलं. कालांतराने पुणे, मुंबई, ठाणे, पालघर अशा भागात ते विस्तारले. आजही पुण्याच्या रास्ता पेठेत ही इस्त्रायल आळी आहे.

हजारो वर्षे महाराष्ट्रात राहिल्यावर त्यांच्या भाषेवर मराठी भाषेचे संस्कार झाले आणि जुदाव मराठी ही नवीन भाषा निर्माण झाली.

त्यांच्या बोलीभाषेतले शब्द मराठीत रुळले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी खाद्यपदार्थ हे त्यांनी आत्मसात करुन घेतले. आजही बेने इस्त्रायली लोकांच्या लग्नात मुलीला चुडा भरला जातो. लग्नात गळ्यात मंगळसुत्र घातलं जातं. मंगलप्रसंगी पुरणपोळी केली जाते.

भारतात जे इस्त्रायल ज्यू आले त्यापैकी ८० टक्के लोक हे महाराष्ट्रात राहिले आणि खऱ्या अर्थाने मराठी झाले.

इंग्रज आणि पोर्तुगीज या परकीय सत्तांनी भारतात आपली सत्ता मजबूत केली तेव्हा ख्रिश्चन मिशनरी लोकांचा धर्मप्रसार वाढला. बेणे इस्रायली लोकांच्यात आपल्या धर्माच्या सुरक्षितता व जागरूकता निर्माण करणे धार्मिक परंपरा, रीतिरिवाज समाजापर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांचा अर्थ व पालनाच्या काटेकोर पद्धतीची माहिती करून देणे जरुरीचे ठरू लागले. मिशनर्‍यांच्या आक्रमक धर्मप्रसाराला आळा घालणेही बेणे इस्रायली लोकांना गरजेचे वाटत होते.

या जनजागृतीसाठी तत्कालीन वृत्तपत्रानी महत्वाचा वाटा उचलला. लेख, अग्रलेखाच्या माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न ज्यू समाजाचे सुरु होते. पण यासाठी मर्यादा होत्या. अशिक्षित समाजापर्यंत पोहचायचं झालं तर वेगळा मार्ग वापरावा लागेल हे काही ज्यू विचारवंतांच्या लक्षात आलं.

कोकणात बऱ्याच गावात हिंदू मंदिरांमध्ये सुरु असलेल्या भजन कीर्तनातून समाजप्रबोधन सुरु असते हे त्यांनी पाहिलेलं. अगदी अडाणी लोकांपासून ते उच्चशिक्षित नोकरदार वर्गापर्यंत सर्वाना बांधून ठेवण्याची क्षमता कीर्तनामध्ये होती.  हाच प्रयोग ज्यू समाजात देखील करून पाहायचं ठरलं.

ते साल होतं १८८०.

समाजात कीर्तने करून धर्मनिष्ठा वाढवण्यासाठी दाविद हाईम दिवेकर, बिनयामिन शिमशोन अष्टमकर, राहमिम शलोम तळकर अशा व्यक्तींनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘कीर्तनोत्तेजक मंडल’ ही संस्था स्थापन केली.

यासाठी आधी त्यांनी हिंदू किर्तनाचा आणि भजनांचा सखोल अभ्यास केला. हिंदू कीर्तनकारांनी त्यांना प्रचंड मदत केली. ज्यू समाजासाठी कीर्तने करताना काही नियम पाळले जावेत, असेही ठरले. या कीर्तनांसाठी स्वतंत्र कथा व पदरचना केल्या गेल्या.

८ ऑगस्ट १८८० रोजी मुंबईतील निशाणपाड्यात एका वखारीत ज्यूंचं पहिलं कीर्तन झालं. या कीर्तनात परमेश्वराचा लाडका भक्त व बेने इस्रायलींचा मूळ पुरुष अब्राहम परमेश्वराच्या आज्ञेवरून आपला लाडका पुत्र ‘इसहाक’ याला अर्पण करण्यास तयार होतो; पण परमेश्वर त्याची सुटका करतो. ही कथा सादर झाली.

हे कीर्तन ‘बिनयामिन शिमशोन अष्टमकर’ यांनी केल होतं. ज्यू समाजासाठी हा नाविन्यपूर्ण प्रयोग होता. मात्र समाजातील कर्मठांनी ही कीर्तनाची परंपरा हिंदू आहे; किर्तनोत्तेजक मंडळी ज्यू समाजाला हिंदू बनवू पाहत आहात, असा अपप्रचार सुरु केला. त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली.

त्यामुळे ज्यू कीर्तनकारांनी ही परंपरा आपल्या धर्मात नवीन नाही, राजा दावीदच्या काळात वाद्यांच्या तालासुरावर परमेश्वराची स्तुती केली जात असे याचे धर्मशास्त्रातील पुरावे गोळा केले. आणि कीर्तन हे त्या पेक्षा काही वेगळे नाही, हे लोकांना पटवून दिल. याचा परिणाम पुढच्या दोन वर्षात ज्यूंची कीर्तने समाजमान्य झाली.

या काळात सुमारे ३४ कीर्तन पदावल्या रचल्या गेल्या, तर २५-२६ व्यक्तींनी हरिदास म्हणून कीर्तने केली. नोव्हाचा भक्तिभाव, एलिशा आख्यान,कविताबद्ध मोशे चरित्र  ही कीर्तने मराठी आणि हिब्रू या दोन्ही भाषेत होती. सर्वसामान्य ज्यू व्यक्तीपर्यन्त पोहचण्यास या मराठी कीर्तनाचा सिंहाचा वाटा राहिला. त्या काळात या ज्यू हरिदासांनी मोठी कीर्ती मिळवली.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या सर्व भागात जिथे जिथे बेने इस्रायली वसाहती होत्या त्या ठिकाणी, थेट कराचीपर्यंत कीर्तने झाल्याचे उल्लेख त्या वेळच्या इस्रायली वर्तमानपत्रांतून आले आहेत. जवळपास १९५० सालापर्यंत ही कीर्तन परंपरा ज्यूंमध्ये चालत राहिली.

मधल्या काळात मात्र त्याला खंड पडला. इस्रायल देशाची पुनर्बांधणी सुरु झाल्यावर अनेक जणांनी आपल्या मातृभूमीकडे प्रयाण केले. पण महाराष्ट्राच्या मातीशी जोडले गेलेले कित्येकजण मात्र इथेच राहिले. त्यांच्यापैकीच एक असलेल्या  फ्लोरा सॅम्युएल यांनी साठच्या दशकात कीर्तन परंपरा पुन्हा सुरु केली. त्यांच्या नंतर हा वारसा रेचेल गडकर यांनी सांभाळला.

अजूनही दक्षिण मुंबईच्या ज्युईश सिनेगॉगमध्ये तबलापेटीच्या साथीत किर्तनाचा कार्यक्रम होतो.

49425744

हाना आणि सोशना कोलेट या नेरळच्या भगिनी तिथे कीर्तने सादर करतात. यात ईस्टर राणीची कथा हि गोड ओवी देखील त्या सुरात म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी इस्रायलमधून महाराष्ट्रात आलेला हा ज्यू समाज इथल्या मातीशी किती घट्ट बांधला गेलाय याचे उदाहरण म्हणजे या मराठी ओव्या आणि कीर्तने. हा वारसा जपण्याचा ज्यू समाजाचा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.