इस्त्रायलमध्ये मराठी भाषा बोलणारे हजारों लोक आहेत.

इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालतात. इथल्या लोकांना मराठी शिकवण्याची सोय मुंबई विद्यापीठाने केली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अभिमान वाटतो आणि आश्चर्य देखील. प्रश्न पडतो की इस्त्रायलमधल्या लोकांना मराठी शिकण्याची काय गरज. तर याच कारण इतिहासाच्या पानांवर आहे..

ही गोष्ट आहे खूप खूप वर्षांपूर्वीची…

खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी. इसवी सनाच्या पहिल्या व दूसऱ्या शतकातली ही गोष्ट. त्या काळात ज्यू लोकांनी अन्याय अत्याचाराला कंटाळून आपला देश सोडला. जगाच्या वेगवेगळ्या भागात ज्यू लोकं स्थलांतरीत झाली. त्यातीलच एक जहाज अलिबागच्या किनाऱ्यावर असताना फुटलं. काही जोडप्यांनी पोहत पोहत किनारा गाठला. ही जोडपी होती सात. म्हणजे एकूण १४ लोकं. मरणाऱ्या ज्यू लोकांची संख्या होती १५०.

जिवंत राहिलेल्या ज्यू लोकांनी आपल्या बांधवाचे दफन केलं. भारताच्या भूमिवर असणारी ही ज्यू लोकांची पहिली दफनभूमी. 

काळ गेला. ही ज्यू लोकं भारताच्या मातीत मिसळून गेली.

अलिबाग जवळच्या भागात ज्यू लोक विस्तारत गेले. सुरवातीला त्यांनी तेल विकण्याच काम केलं. त्यांचीच श्रद्धा होती की शनिवारी तेल विकायचं नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीत शनिवारी तेल विकत न घेण्याची प्रथा रुजली.

बेने इस्रायली लोकं म्हणून त्यांना ओळखलं जावू लागलं.

सुतारकामापासून ते तेलाचे घाणे चालवण्याचे व्यवसाय ते करु लागले. कालांतराने पुणे, मुंबई, ठाणे, पालघर अशा भागात ते विस्तारले. अलिबाग ही त्याची मातृभूमी झालीच पण ते जिथे जिथे गेले ते तिथले झाले. ते जेव्हा पुण्याच्या कट्टर अशा पेठेमध्ये आले तेव्हा त्यांच्या आळीला इस्त्रायल आळी म्हणून ओळखलं जावू लागलं. आजही पुण्याच्या रास्ता पेठेत ही इस्त्रायल आळी आहे.

त्यांच्या भाषेवर मराठी भाषेचे संस्कार झाले आणि जुदाव मराठी ही नवीन भाषा निर्माण झाली.

त्यांच्या बोलीभाषेतले शब्द मराठीत रुळले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी खाद्यपदार्थ हे त्यांनी आत्मसात करुन घेतले. आजही बेने इस्त्रायली लोकांच्या लग्नात मुलीला चुडा भरला जातो. लग्नात गळ्यात मंगळसुत्र घातलं जातं. मंगलप्रसंगी पुरणपोळी केली जाते.

भारतात जे इस्त्रायल ज्यू आले त्यापैकी ८० टक्के लोक हे महाराष्ट्रात राहिले आणि खऱ्या अर्थाने मराठी झाले.

त्यानंतर इस्त्रायल देशाची पुर्नबांधणी सुरू झाली. जगभर विस्थापित झालेले ज्यू लोक पुन्हा आपल्या मातृभूमीच्या दिशेने जावू लागले. जगभरात विस्थारलेले लोकं मोठ्या प्रमाणात इस्त्रायलला परत गेले मात्र महाराष्ट्रात असणाऱ्या ज्यू लोकांना सहजासहजी ही भूमी सोडता येत नव्हती.

ज्या मातीने आपणाला इतका काळ जगवलं ती सोडून जाणं अशक्य झालं होतं. त्यामुळेच काहीजण इथेच राहिली. मात्र काहींनी मातृभूमीच्या ओढीने इस्त्राइल गाठलं. 

इतक्या वर्षात मराठी सोबत जोडलेली नाळ सोडणं अशक्य होतं. बेणे इस्त्रायली हे एका अर्थाने मराठीच झाले होते. अखेर इस्त्रायलमध्ये स्थलांतरीत झालेल्या लोकांच्या विनंतीनुसार तिथे मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्यात आले. मुंबई विद्यापीठाकडे ही जबाबदारी देण्यात आली.

आजही ज्यू लोकं मराठी शिकतात, मराठी बोलतात व स्वत:ला अभिमानाने बेणे इस्त्रायली म्हणवून घेतात. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.