शहाजी महाराज नसते तर “बंगळूर” हे एक छोटसं खेडेगाव राहिलं असतं.

कर्नाटकची राजधानी बंगळूर. दक्षिण भारतातील सर्वाधिक आधुनिक शहर. अख्ख्या भारताची संगणक क्षेत्राची राजधानी असा ही काही जन बंगळूरचा उल्लेख करतात. पण अनेकांना माहित नसते की या शहराला पहिली ओळख मिळवून दिली ती शहाजी महाराजांनी.

बंगळूरच्या इतिहासाचा शोध घेतला तर तो  होयसळ, विजयनगर साम्राज्यापर्यंत जातो.

त्याकाळात हे एक अगदी छोटेसे खेडं होतं. विजयनगर साम्राज्याचा एक नायक (सरदार) केंपेगौडा याने १५३७ साली या गावाची स्थापना केली अस मानलं जातं. पहिला केंपेगौडा याने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधली. एक मातीचा किल्ला बांधला.

दुसर्‍या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. या केपेगौडांनी विजयनगर साम्राज्याच्या विघटनानंतर बंगळूरमध्ये स्वतःच शासन सुरु केल. विजयनगरच्या अनेक नायकांनी आपआपली छोटी ठाणी निर्माण केली होती.

 इ.स. १६३७ साली आदिलशाही साम्राज्याच लक्ष या विजयनगरच्या नायकांकडे गेले.

त्याने रुस्तुम ए जमान रणदुल्लाखानाला ही मोहीम सोपवली. नुकताच निजामशाहीतून आदिलशाहीत आलेले शहाजीराजे भोसले यांना त्याच्या सोबतीस दिलं. या दोन्ही पराक्रमी सरदारांनी कृष्णा तुगभद्रेच्या पलीकडे आदिलशाही सैन्याला पोहचवल. अनेक छोट्या मोठ्या नायकांचा पराभव केला. म्हैसूर ताब्यात घेतलं.

याच मोहिमेदरम्यान डिसेंबर १६३८मध्ये शहाजी महाराजांनी बंगळूरच्या तिसऱ्या केंपेगौडाचा पराभव केला.

शहाजीराजांच्या पराक्रमामुळे कर्नाटकातला एक मोठा भाग आदिलशाहीला जोडला गेला. रणदुल्ला खानाने आदिलशहाच्या सांगण्यावरून हा भाग शहाजीराजांना जहागीर म्हणून दिला. यात बंगळूर,कोलार, होसकट, दोड्डबल्लापुरा आणि सिरा ही गावे येत होती.

शहाजी महाराजांनी बंगळूरला आपल्या जहागीरीची राजधानी बनवलं. 

शहाजीराजांनी बंगळूरच आपल्या राजधानीसाठी निवडण्यामागे एक कारण होतं. एक तर हे गाव छोटं असल तरी तिथे एक किल्ला होता. इथल वातावरण आल्हाददायक होतं. शिवाय हे गाव विजापूरपासून लांब अंतरावर होतं. आदिलशाहने तिकडची सगळी जबाबदारी शहाजी महाराजांवर सोपवली.

याचाच परिणाम असा झाला की बंगळूर व आसपासच्या भागावर शहाजी महाराजांच स्वतंत्र राज्य सुरु झाल.

इ.स. १६४२ नंतर आदिलशाहीच्या नायकांविरुद्धच्या मोहिमा थंडावल्या. शहाजी महाराजांच्या आयुष्यात स्थैर्य आलं. ते बंगळूरच्या चिकपेठ येथील गौरीमहालात राहू लागले. पुण्याहून आपली पत्नी जिजाबाई व मुलगा शिवबा यांना बोलवून घेतल. बाल शिवाजी महाराजांची आपल्या पित्याशी भेट झाली. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीव धाकटे सावत्र बंधू व्यंकोजी हे बंगळूरमध्ये शहाजी राजांच्या सोबत राहायचे. त्यांचाही सहवास मिळाला.

 अवघ भोसले कुटुंब एकत्र आलं होतं. बंगळूरमध्ये शिवरायांचा विवाह धुमधडाक्यात लावून देण्यात आला.

शहाजी महाराजांनी बंगळूरचा खरा विकास घडवला. तिथे अनेक बागा उभारल्या. गावाची तटबंदी मजबूत केली. अनेक व्यापाऱ्यांना आणून वसवलं. मंदिरांचा जिर्णोध्दार केला. त्याच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्रातून ब्राम्हण मंडळींना बोलावून घेतलं. जागोजागी विहिरी बांधल्या. बंगळूरला एका राजधानीच स्वरूप आलं. अनेक मराठी कुटुंबे बंगळूरला स्थलांतरीत झाली.

शहाजी राजांनी अनेक विद्वानांना आपल्या दरबारात स्थान दिले होते. ते स्वतः अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांच्या दरबारातील यातील जयराम या कवीने त्यांचे राधा विलास चंपू हे चरित्र लिहिले. बंगळूरूला पार दिल्लीपर्यंत शहाजी महाराजांची जहागीर म्हणून ओळखू लागले.

शहाजी महाराजांमुळे बंगळूर या छोट्या गावाचे रुपांतर गजबलेल्या व्यापारी शहरामध्ये झालं. 

१६४५ साली जिजाऊ व शिवबा पुण्याच्या जहागिरीची देखभाल करण्यासाठी परतले. पण पुढच्या काळात शहाजी राजांचे विजापूरच्या आदिलशहाशी नाते बिघडायला सुरवात झाली.

अनेक मुस्लीम सरदाराना आदिलशहाचा शहाजी महाराजांवर असलेला विश्वास सहन होत नसे. शहाजी महाराज आपल्या स्वतंत्र संस्थानाप्रमाणे बंगळूरवर राज्य करतात याचाही राग मनात असायचा. यातूनच सुलतानाचे कान भरण्यास सुरवात झाली. यात आघाडीवर होता अफझल खान.

जेव्हा शिवाजी महाराजांनी तोरणा व इतर गड ताब्यात घेऊन स्वराज्याची स्थापना केली तेव्हा तर शहाजी महाराजांवरील दबाव वाढला. 

याच अफझल खानाच्या  दगाबाजीमुळे शिवरायांचे मोठे बंधू संभाजी राजे यांचा मृत्यू झाला. याच अफझल खानाने  शहाजी महाराजांना जेरबंद करून विजापूरला आणले. मात्र काही काळाने त्यांचा शिवरायांच्या बंडखोरीमध्ये कोणताही हात नाही याची खात्री झाल्यावर आदिलशहाने त्यांची सुटका केली. यासाठी शिवरायांनी मुघलांना लढवलेली

शहाजी महाराजांचा विजापूरच्या दरबारातला दबदबा कमी झाला. मात्र बंगळूरची जहागीर मात्र शाबूत राहिली.

पुढे शहाजी राजांचा शिकारीला गेला असता होदेगिरीच्या जंगलात घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर बंगळूरची जबाबदारी आलेल्या व्यंकोजीराजेंनी मात्र हे शहर कासीम खानच्या मुघल सैन्याशी झालेल्या युद्धात गमावले.

नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला तीन लाख रुपयांना विकली.

दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या.

इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.

शहाजी महाराजांच स्मारक बेंगलोरमध्ये आहे की नाही हे ठाऊक नाही. मात्र आजही त्यांच्या काळात बंगळूर आलेली हजारो कुटुंबांचे वारसदार आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसले जाऊ देत नाहीत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.