भिडूंनो नोटबंदी काय पूर्णच गंडली नाही, त्याचे काही फायदे पण झालेत.
आज सकाळी सकाळी पेपर हातात घेतला आणि कळालं ५ वर्ष पूर्ण झाली…
अहो कशाला काय विचारताय ? नोटबंदीला… पाच वर्षांचं हे मोदींनी दिलेलं बाळ आता चांगलंच गुटगुटीत झालं असणार. मग म्हंटल सगळेच या बाळाला सावत्र म्हणतायत टीका करतायत, तर आपण या बाळामुळं काही चांगलं झालं का ते पाहूया.
तर २०१६ च्या रात्री आठच्या सुमारास दोन घटना घडल्या. याच दिवशी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांचा निकाल लागून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.
मोदींनी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि बनावट नोटा चलनात आणून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या देशातील एका गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल होत.
काही अपवादात्मक म्हणजे रूग्णालये, पेट्रोल पंप व काही सरकारी आस्थापना वगळता या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आल्या. याठिकाणीही काही ठराविक कालावधी पुरताच या नोटा घेण्याची परवानगी देण्यात आली होती. मोदी सरकारच्या या एका निर्णयामुळे देशभरात हल्लकल्लोळ माजला होता. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि मग नोटबंदीमुळे कसे तोटे झाले हे सगळ्यांनीच सांगायला सुरुवात केली. पण काही फायदे झालेच असतील कि,
तर जास्त कर गोळा झाला हे एक
२०१८ ला आरबीआयचा एक रिपोर्ट पब्लिश झाला होता. त्यानुसार नोटबंदीमुळे करसंकलनात सुधारणा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. कर चुकवणाऱ्या अनेक व्यक्तींची नावं समोर आली होती. २०१६ -१७ या काळात कर संकलनाचा दर १४.५ टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर पुढल्या वर्षी हा आकडा १८ टक्क्यांवर पोहोचला.
टॅक्स भरण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचं श्रेय प्रत्यक्ष कर विभाग नोटबंदीला देतं. या विभागाने जे लोक टॅक्स भरत नाही त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला आणि त्यांना कर भरायला लावला.
खोट्या नोटा सापडल्या हे दोन
खोट्या नोटा चलनाबाहेर काढण्याच्या उद्देशाने ही नोटबंदी महत्वाची होती. नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जितक्या खोट्या नोटा निदर्शनास आल्या त्या नोटबंदीच्या आदल्या वर्षीपेक्षा जास्त होत्या. ज्या नवीन नोटा चलनात आल्या त्यांच्या खोट्या नोटा तयार करता येणार नाहीत याची पूरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
कॅशलेस व्यवहार वाढले हे तीन
नोटबंदीमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली. कॅशलेस व्यवहारांचं प्रमाण गेल्या काही काळापासून वाढत असलं तरी २०१६ पासून त्यात जास्त वाढ झाली आहे. त्यात आणि कोरोनामुळे कॅशलेस व्यवहारांमध्ये भर पडली. कॅपजेमिनी रिसर्च इन्स्टिट्यूटने ११ देशांमध्ये एक सर्व्हे केला. त्यानुसार भारतात कोरोना व्हायरसमुळे डिजिटल पेमेंट वाढलं आहे.
पुढच्या सहा महिन्यात यामध्ये ७८ टक्के वाढ होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाइमच्या वृत्तानुसार फेसबुक आणि बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या सर्व्हेनुसार भारतात लॉकडाऊन लागू केल्यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २०१५ पासून आतापर्यंत देशात डिजिटल पेमेंट पाचपट झालं आहे. मार्च २०१९ पर्यंत आर्थिक वर्षात प्रत्येक व्यक्तीचे सरासरी डिजिटल पेमेंट २२.४ वर पोहोचलं होतं.
आणि चौथ म्हणजे भ्रष्टाचाराला लगाम बसला.
देशात ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर अनेकांचा पैसा बाहेर आला. देशाचा एकूण पैशाच्या ८५ टक्के भाग हा ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये होता. काळा पैसा देखील यामध्येच अनेकांनी साठवून ठेवला होता. भ्रष्टाचारासाठी देखील याच नोटांचा अधिक वापर केला जात होता.
आता एवढं सगळं झालंय. मग नोटबंदी कशी काय फसली तुम्हीच सांगा बघू ?