एका छोट्या पोरानं हजारो लोकांसमोर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची हत्या केली..

१८ ऑक्टोबर २००७. कराचीच्या रस्त्यावर २ लाख लोक आपल्या नेत्याची वाट पाहत होते. हि लोक तीन दिवसांपासून इथं जमायला लागले होते. तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो स्वतःच्या देशात परतत होत्या.

त्यावेळी त्यांना न राहून १९८६ च वर्ष आठवत होत. डिसेंबर १९८५ मध्ये जरनल ज़िया उल हक़ यांनी मार्शल लॉ संपवून निवडणूक घेण्याचं ठरवलं होत. त्यावेळी देखील बेनझीर निवडणुकांच्या तयारी साठी देशात परतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ३० लाख लोक लाहौरच्या रस्त्यांवर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

त्यादिवशी देखील अशीच परिस्थिती होती.

परवेज़ मुशर्रफ यांनी ७ वर्षांचा प्रदीर्घ मार्शल लॉ संपवून निवडणूक जाहीर केल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या देशात परतल्या होत्या. त्या अमेरिकेच्या प्रभावात असल्याच्या आरोपांवरून आल्या आल्याचं तालिबानी कमांडर हाजी उमर याने त्यांना खुनाची धमकी माध्यमांद्वारे दिली.  

पण त्यांनी या धमक्यांना न घाबरता जनतेसमोर आल्यावर पाहिलं वाक्य उच्चारलं,

“घर आ कर अच्छा लग रहा है.”

हत्येचा पहिला प्रयत्न….

लोक बेनझीर यांच्या नावाचा जयजयकार करत होते, कराची विमानतळापासून भुत्तोंच घर २० किलोमीटर लांब होत. बेनझीर सफेद रंगाच्या बुलेट प्रूफ ट्रकमध्ये बसल्या होत्या. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. “बेनझीर जांबाज़” नावानं एक सुरक्षा गट बनवण्यात आला होता.

सकाळपासून चालू झालेली रॅली साधारण १० वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या घराजवळ पोहचली. इथून त्यांचं घर १०० मीटरच्या अंतरावर होत.

तेवढ्यात २ शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला.

देशात परतल्यानंतर आपलं असं स्वागत होईल अशी किंचितशी देखील अपेक्षा त्यांना नव्हती. जवळपास १३९ लोक मारले गेले. यात “बेनझीर जांबाज़” चे ५० पेक्षा जास्त कार्यकर्ते होते. .

पण बेनझीर त्या स्फोटांमधून चमत्कारिक रित्या वाचल्या.

पण या स्फोटांनी त्या घाबरल्या नाहीत. पाकिस्तनामधील ‘आयर्न लेडी’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. या पहिल्या जीवघेण्या घटनेनंतर त्यांना पुन्हा धमक्या मिळत होत्या. पण कोणत्याही धमक्यांना भीक न घालता त्या दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या.

हत्येचा दुसरा प्रयत्न…

८ जानेवारी २००८ रोजी सर्वसाधारण निवडणूका होणार होत्या. बेनझीर यांना पाकिस्तानमध्ये परतून २ महिने झाले होते. पण या २ महिन्यांच्या दरम्यान त्यांना मारण्याचा दुसरा कट रचून तयार होता आणि हा यशस्वी देखील होणार होता.

२७ डिसेंबरच्या दिवशी त्यांची रॅली रावलपिंडीच्या लियाकत अली मैदानात होती. त्याच्याच जवळ असलेल्या क्रॉल चौकामध्ये नवाज़ यांच्या पकिस्तान मुस्लिम लीगची रॅली चालू होती. संध्याकाळी ४ च्या दरम्यान नवाज यांच्या रॅलीमध्ये गोळीबार होऊन चार जण मारले गेल्याच्या बातम्या आल्या. 

त्यामुळे लियाकत अली मैदानची सुरक्षा काढून नवाज यांच्या रॅलीला पाठवण्यात आली.

इकडे बेनझीर यांचं भाषण चालूच होत. जवळपास १० हजार लोक तिथं उपस्थित होते. संध्याकाळी ५ च्या दरम्यान त्यांनी आपलं भाषण संपवलं. त्यांना पुढे इस्लामाबादला जायचं होत. भाषणानंतर जसा त्यांचा रोड शो पुढं निघू लागला तसं लोकांनी त्यांच्या सफ़ेद रंगाच्या टोयोटा लैंडक्रूजरला घेरलं. पुन्हा नारे सुरु झाले. लोकांना अभिवादन करण्यासाठी बेनझीर यांनी आपल्या गाडीचं सनरूफ उघडलं आणि सीटवर उभ्या राहिल्या.

नारे चालू होते, बेनझीर कार्यकर्त्यांना हात दाखवून त्यांचा उत्साहाला दाद देत होत्या. अशात अचानक सलवार कुर्ता घातलेला एक १४ – १५ वर्षाचं पोरग गाडीच्या समोर येऊन उभं राहील. त्याने आधी आपली पिस्तूल काढली आणि बेनझीर यांच्या डोक्यावर नेम धरला.

एका सुरक्षा गार्डने लांबूनच बिलालला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत त्याने पहिली गोळी झाडली होती. ती बेनझीर यांच्या खांद्याला चाटून गेली. त्याने १ सेकंदामध्ये आणखी दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी बेनझीर यांच्या गळ्यात लागली आणि त्या जखमी होऊन गाडीत पडल्या. जशा त्या खाली गाडीत पडल्या तसे मुलाने काही क्षणात मानवी बॉम्ब स्फोट करून स्वतःला उडवून दिलं.

स्फोटाने पूर्ण परिसर आपल्या कवेत घेतला.

स्फोटामुळे गाडीचे चारी टायर देखील फुटले होते, पण ड्रायव्हरने नुसत्या रिमवर गाडी चालवत जखमी बेनझीर यांना रावलपिंडीच्या जनरल हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यावेळी संध्याकाळच्या साडे पाच वाजले होते.

त्यानंतर पाऊन तासात म्हणजे ६ वाजून १६ मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सोबतच स्फोटामध्ये जवळपास २४ लोकांना आपला जीव गमवावा लागला.

२ महिन्यांच्या आत पाकिस्तानच्या २ वेळच्या पंतप्रधानांना २ वेळा स्फोटामध्ये मारण्याचा प्रयत्न झाला. १५ वर्षाच्या पोरानं त्यांचं आयुष्य संपवलं.

एका आंतरराष्ट्रीय वाहिनीचे पत्रकार शहज़ाद मलिक या घटनेनंतर तिथे उपस्थित होते.

ते आपला अनुभव सांगताना म्हणतात,

तिथे जखमी लोक आणि मृतदेहांसोबत सगळीकडे रक्त पसरलं होत. मी घटनास्थळावरून ‘मरी रोड’ला जाण्यासाठी एका बाजूने निघालो होतो, तेव्हा माझा पाय जमिनीवर पडलेल्या एका मृतदेहावर पडला. त्याच वेळी एका पोलिसवाल्यानं मला धक्का दिला आणि तिथून जाण्यास सांगितलं.

पण मी जरा निरखून बघितलं तेव्हा एका मुलाचं डोकं धडापासून वेगळं होऊन तिथं पडलं होत. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बिलाल नामक व्यक्तीच छायाचित्र या घटनेशी संबंधित म्हणून प्रसिद्ध केलं. ते छायाचित्र त्या रस्त्यावर पडलेल्या चेहऱ्याशी जुळत होत.

या हत्येमागील मास्टरमाईंड कोण होत?

बेनझीर यांच्या हत्येनंतर जवळपास १० वर्षानंतर ३१ ऑगस्ट २०१७ ला या प्रकरणाचा निर्णय आला. प्रकरणाचा तपास करत असलेल्या ८ न्यायाधीशांच्या बेंचने २ पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याबद्दल दोषी घोषित केलं. माजी पोलीस अधिकारी सऊद अज़ीज़ आणि खुर्रम शहज़ाद यांना १७ वर्षांची कैद आणि ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणात ज्यांना मास्टरमाइंड म्हणून पकडलं होत त्या ५ संशयित ऐतजाज़ शाह, शेर ज़मां, हसनैन गुल, अब्दुल राशिद आणि रफ़ाक़त हुसैन यांना सबळ पुराव्यांअभावी सोडून देण्यात आलं. 

सोबतच सुरक्षेमध्ये हलगर्जी पणा केल्याबद्दल हुकूमशहा परवेज़ मुशर्रफ यांना देखील या प्रकरणात दोषी घोषित करण्यात आलं. १७ डिसेंबर २०१९ रोजी इस्लामाबादच्या विशेष न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अनेक दिवस न्यायालयासमोर न आल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.

पण अजून देखील या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण हे पाकिस्तान पोलिसांना शोधण्यात अपयश आलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.