वर्ल्ड कपमधल्या त्या कॅचमूळे सगळं जग थरथरलं होतं.

जगाच्या नकाशावर ठिपक्या एवढा देश बर्म्युडा. अजूनही ब्रिटीश साम्राज्यापासून अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. या देशाची एक क्रिकेट टीम आहे. अस्तित्वात आहे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कधी दिसत नाही. फक्त एकदाच दिसली होती २००७ सालच्या वर्ल्ड कप वेळी.

तेव्हाच वर्ल्ड कप वेस्ट इंडीज बेटांवर खेळल जात होतं. म्हणजे बर्म्युडाच्या शेजारच्या गल्लीत. आयसीसीने उदार मनाने त्यांना वर्ल्ड कप खेळायचा चान्स दिला. म्हणजे एकदम उपकार केलं असं काही नव्हतं. त्यांनी क्वालीफायिंग मॅचेस खेळून आपली उपयुक्तता सिद्ध केलेली. या टीमच वैशिष्ट्य म्हणजे यात कोणी पूर्णवेळ क्रिकेट पटू नव्हते. बर्म्युडामध्ये ही चैनचं समजली जाईल. सगळेजण आपआपली नोकरी सांभाळून क्रिकेट खेळायचे.

वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळण म्हणजे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यांचा समावेश ग्रुप बी मध्ये होता. यात श्रीलंका, भारत आणि बांगलादेश हे संघ होते. पहिली मॅच श्रीलंकेबरोबर होती, ती त्यांनी हरली. अवघ्या ७८ धावा त्यांच्या पूर्ण टीमने मिळून बनवल्या. पण कोणालाही विशेष दुःख्ख वाटलं नाही. त्यांची पुढची मॅच भारताबरोबर होती.

भारताचा कॅप्टन राहुल द्रविड होता. त्याच्यासोबतच सचिन, गांगुली, सेहवाग, धोनी, कुंबळे अशा सुपरस्टार खेळाडूना फक्त टीव्ही मध्ये पाहिलं होतं आता त्यांच्या सोबत खेळायला मिळणार म्हणून बर्म्युडाचे खेळाडू खुश होते. त्यांची त्यातल्या त्यात बॉलिंग चांगली होती. भारताच्या मजबूत बॅटिंग लाईनअपला आधी रोखून मग त्यांनी दिलेल टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा अशी स्ट्रॅटेजी बर्म्युडा ने ठरवली होती. म्हणूनच टॉस जिंकल्यावर त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली.

रॉबिन उत्थापा आणि सौरव गांगुली हे ओपनिंग पार्टनर मैदानात उतरले. खरं तर बर्म्युडाची बॉलिंग खेळणे भारतीय फलंदाजांना एवढ अवघड नव्हते. पण उथ्तापा का कुणास ठाऊक थोडा अडखळून खेळत होता. त्याने पहिली पूर्ण ओव्हर खेळून काढली आणि फक्त 3 रन्स बनवल्या. पुढच्या ओव्हरला ही स्ट्राईकवर तोच होता. 

१७ वर्षाचा मलाची जोन्स आपल्या आयुष्यातील पहिलीच ओव्हर टाकत होता. पहिलाच बॉल त्याने ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला. मोठा शॉट मारायचा म्हणून प्रेशरमध्ये आलेल्या उथ्तापाने बॅट फिरवली पण बॅटीचा कड घेऊन बॉल दुसऱ्या स्लीप मध्ये गेला. दुसरी स्लीप नव्हतीच. पहिल्या स्लीप मध्ये उभा असलेल्या फिल्डरने डाय मारली.

फिल्डर कसला तो तर एक डोंगरचं होतां. तो काही हा कॅच घेऊ शकेल असं वाटत नव्हतं. पण आपल्या उजव्या अंगावर झेपावत त्याने एका हातात तो बॉल झेलला. काही सेकंदासाठी अख्खं स्टेडियम शांत झालं. उत्थापा आउट झाला होता. पुढच्या क्षणाला ते धूड कसबस जमिनीवरून उठल आणि आपल थुलथुलीत पोट सावरत आनंदाने धावू लागलं. त्याचे सगळे टीममेट्स त्याच्या मागून पळत होते. त्यांनी त्याच्या अंगावर उडी घेतली. अख्खी बर्म्युडाची टीम त्याच्या अंगावर पडली होती. तो सतरा वर्षाचा बॉलर तेव्हडाच रडत होता.

वर्ल्ड कप जिंकल्यापेक्षा जास्त आनंद बर्म्युडाच्या टीमने साजरा करत होती. खुद्द रॉबिन उत्थप्पाला स्वप्नात देखील वाटलं नसेल की आपण आउट झाल्यावर एवढ सेलिब्रेशन होईल. स्टेडियममध्ये असलेले भारतीय समर्थक सुद्धा बर्म्युडाच्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

तो कॅच घेतला त्या प्लेयरचं नाव होतं ड्वेन लेव्रोक. आकाराने जगातला सर्वात मोठा खेळाडू . त्याचं वजन तेव्हा २८० पौंड होते. तो बर्म्युडामध्ये तुरुंगात कैद्यांना ने आण करणारा ड्रायव्हर आणि क्रिकेट टीमसाठी लेफ्ट आर्म स्पिनर होता. तो कच त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा कॅच ठरला. 

गांगुलीने ८९, सेहवागने ११४, युवराजने ८३ आणि तेंडूलकरने ५७ धावा कुटल्या. सचिनची ती फास्टेस्ट फिफ्टी असावी.  भारताने ४१३ धावांची आभाळाएवढी विक्रमी धावसंख्या उभा केली. अर्थातच बर्म्युडाला तेवढा स्कोर चेस करणे जमणार नव्हतेचं. तरी डेव्हिड हम्प च्या नाबाद ७६ धावांच्या जोरावर बर्म्युडाने १५६ धावा बनवल्या. त्यांचा २५७ रन्सनी मोठा पराभव झाला.

SRT21

भारताच्या दिग्गज टीमसमोर लिंबू टिंबू असणाऱ्या बर्म्युडाला या पराभवाचं वाईट वाटलच नाही आणि ड्वेन लेव्रोक तर अख्ख्या बर्म्युडासाठी सुपरस्टार झाला. त्याला २सलग दोन वर्षे बर्म्युडाचा स्पोर्ट्स पर्सन ऑफ दी इयर देण्यात आला. त्या वर्ल्ड कप मध्ये त्याने युवराज सिंग, कुमार संगकारा यांच्या विकेट देखील घेतल्या होत्या. पण त्याची ओळख त्या कच मुळेच सगळ्या जगाला झाली.

जगात जॉन्टी र्होड्सपासून ते आत्ताच्या शेल्डन कोट्रेलपर्यंत अनेकानी भारीभारी अशक्यप्राय झेल पकडले आहेत.पण या कचला जेव्हढी प्रसिद्धी मिळाली त्याच आश्चर्य जगभर व्यक्त करण्यात येत. लेव्रोक परत कधी क्रिकेट खेळताना दिसला नाही पण तो कुठेही गेला की भारत पाकिस्तान इंग्लंडचे सुद्धा प्रेक्षक त्याची सही घेण्यासाठी येतात. 

बॉब वूल्मरचा अनपेक्षित मृत्यू फ्लिन्टॉफने दारू पिऊन घातलेला राडा, मोठमोठ्या स्टार्सची गचाळ कामगिरी या मुळे २००७ सालचा वर्ल्ड कप आधीच कुप्रसिद्ध झाला होता. पण लेव्रोकचा तो कॅच आजही त्या वर्ल्ड कप ची एक छान आठवण म्हणून ओळखला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.