हिंदुत्ववाद्यांसह सेलिब्रिटीजचाही पठाणला विरोध; बरेच जण समर्थनातही उतरलेत….
मागच्या वर्षभरात चित्रपटांवर म्हणा किंवा मग बॉलिवूडवर म्हणा आक्षेप घेण्याचं प्रमाण हे चांगलंच वाढलंय. सध्या बॉलिवूड सूपरस्टार शाहरूख खान ज्या चित्रपटातूल तब्बल ४ वर्षांनी कमबॅक करणार आहे त्या चित्रपटावरून वाद चांगलाच पेटलेला दिसतोय. चित्रपटातलं बेशर्म रंग हे गाणं आणि गाण्यातला दीपिकाचा लूक हे या वादाचं कारण ठरतंय.
हिंदुत्त्ववादी संघटना याविषयी जास्त आक्रमक झाल्यात, बऱ्याच सेलिब्रिटीजनंही विरोध केलाय तर, अनेक सेलिब्रिटीज आणि बॉलिवूड स्टार्स मात्र पठाणच्या समर्थनात बोलताना दिसतायत. १५ डिसेंबर रोजी झालेल्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिलमध्ये बोलताना अमिताभ बच्चन यांनी या विषयावर आपलं मत मांडलंय. ते म्हणाले,
“१९५२च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सेंसरशीपचं स्वरूप काय असावं याबाबत फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत. असं असून सुद्धा नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.”
पठाण चित्रपटावरून नेमका मॅटर काय सुरूय ते पाहूया…
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान हा २०१८ पासून इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून फारसा दिसलाच नाही, त्याने एक मोठा ब्रेक घेतला आणि आता २५ जानेवारी २०२३ ला तो पुन्हा पठान या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी पुनरागमन करतोय.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् शाहरूखच्या चाहत्यांनी ट्रेलरला डोक्यावर घेतलं… वयाच्या ५७व्या वर्षी शाहरूखचा किलर लूक, जबरदस्त अॅक्शन अन ब्लॉकबस्टर डायलॉगबाजी असा हा चित्रपट बनणार असल्याचा अंदाज चाहत्यांना आला आणि च्यांनी ट्विटरवर #किंग_इज_बॅक असले ट्रेंडही चालवले… चित्रपट येणार आणि जबरदस्त चालणार असं वाटत होतं.
ट्विस्ट आला तो १२ डिसेंबरला चित्रपटातलं बेशर्म रंग हे गाणं रीलिज झाल्यावर…
बेशर्म रंग या गाण्यात प्रमुख भुमिकेतला शाहरूख आणि मुख्य अभिनेत्री दीपिका दिसतायत. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोन हिच्या डान्स स्टेप्समुळे सुरूवातीला हा वाद निर्माण झाला.. त्यानंतर तिने घातलेले कपडे हे अतिशय टोकडे आहेत.
त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो असं म्हणत विरोध केला गेला आणि आता तर, तिने गाण्यात जी बिकिनी घातलीये तिचा रंग भगवा आणि शाहरूखने घातलेल्या शर्टचा रंग हिरवा आहे असं म्हणत या वादाला धार्मिक रंग देत विरोध केला जातोय.
चित्रपटाला हिंदुत्त्ववादी संघटना आणि सेलिब्रिटीजचाही विरोध…
मध्यप्रदेशचे गृहमंत्री चित्रपटाविरोधात आक्रमक…
मध्यप्रदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे या चित्रपटाविरोधात आक्रमक झालेत. त्यांनी या चित्रपटाला विरोध तर दर्शवला पण, चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा इशाराही दिलाय. याविषयी बोलताना ते म्हणाले,
“पठाण या चित्रपटातील गाण्यात तुकडे तुकडे गँगला सपोर्ट करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे. वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह असून हे गाणे गलिच्छ मानसिकतेने चित्रित करण्यात आलंय. गाण्यातील दृश्ये आणि वेशभूषा दुरुस्त करावी, अन्यथा मध्य प्रदेशात चित्रपटाला परवानगी द्यायची की नाही, यावर विचार करावा लागेल.”
मुकेश खन्ना झाले सेन्सॉर बोर्डावर नाराज…
अभिनेते मुकेश खन्ना यांनी पठाण या चित्रपटाबद्दल बोलताना सेन्सॉर बोर्डावर नाराजी व्यक्त केलीय. बेशर्म रंग हे गाणं अश्लीलतेच्या कॅटेगरीत मोडतं असंही ते म्हणाले. याशिवाय,”आजकाल लहान मुलं-मुली हे सतत टीव्ही, चित्रपट, मोबाईल बघत असतात.
त्यामुळे या अश्या चित्रपटांना आणि गाण्यांना सेन्सॉर बोर्डानं परवानगी द्यायलाच नकोय आणि सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय सुप्रीम कोर्ट नाहीये की त्यांच्या निर्णयाविरोधात आवाज उठवता येणार नाही.”
हिंदू सेनेनं सेन्सॉर बोर्डाला लिहीलं पत्र…
या चित्रपटाला होत असलेल्या विरोधातील धार्मिक मुद्दा लक्षात घेऊन हिंदू सेनेनं आता आक्रमक भुमिका घेतलीय. हिंदू सेनेनं सेन्सॉर बोर्डाला एक पत्र लिहीलंय. या पत्रात पठान चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी केलीये. शिवाय, बेशर्म रंग या गाण्यातला बेशर्म हा शब्द भगव्या रंगासाठी वापरलाय असं म्हणत तुम्ही अश्या गाण्याला परवानगीच कशी देऊ शकता असा सवालही विचारलाय.
राम कदम म्हणतायत या चित्रपटातूल जेएनयू विचारधारा पसरणार…
महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे नेते राम कदम यांनी आता या वादावर आपली प्रतिक्रिया दिलीये… या विषयी ते म्हणतायत,
“चित्रपटात अपेक्षित ते बदल करा अन्यथा महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्त्ववादी विचारांचं सरकार आहे आणि हा असला प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. जेएनयू वादी मतं असलेले लोक जाणून बुजून जनेयूधारी विचारधारांना धक्का लावण्याचं काम तर करत नाहीयेत ना?”असा सवालही त्यांनी विचारलाय.
नवनीत राणा म्हणतायत बहिष्कार नको…
अमरावतीच्या खासदार आणि भाजप समर्थक अशी ओळख असलेल्या नवनीत राणांनी मात्र याविषयावर भाजपपेक्षा काहीशी वेगळी भुमिका मांडलीय. ‘चित्रपटावर बहिष्कार घातला जाऊ नये, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर.. त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. सेन्सॉर बोर्डानं चांगलं काम करावं” अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिलीय.
अनेकांनी पठान चित्रपटाचं समर्थनही केलंय…
स्वरा भास्करने सत्ताधाऱ्यांवर केला घणाघात…
पठान चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणं रिलीज झाल्यानंतर पठान चित्रपट बॅन केला जावा अशी मागणी करण्यात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. याविषयावर ट्वीट करून स्वरा भास्करने भाजप नेत्यांवर टीका केलीय. या ट्वीटमध्ये तिने म्हटलंय,
“आपल्या देशातील सत्ताधाऱ्यांकडे बघा… अभिनेत्र्यांच्या कपड्यांकडे बघण्यातून यांना वेळ मिळाला तर काही कामंही करत असतील.”
प्रकाश राज यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांना विचारला थेट सवाल…
अभिनेता प्रकाश राज हे सतत राजकीय परिस्थितीवर विविध विधानं देत असतात. पठान चित्रपटावरून सुरू असलेल्या राड्यावरही प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांना सवाल विचारताना म्हटलंय,
“मग भगवे कपडे घातलेले लोक बलात्कार करणाऱ्यांना हार घालतात… भगवे कपडे घातलेले स्वामीजी, दलाल आमदार अभद्र भाषणं करतात, अल्पवयीन मुलांवर बलात्कार करतात ते ठीक आहे, पण चित्रपटात ड्रेस घालता येत नाही?”
अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचं ममता बॅनर्जींकडून कौतूक…
कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अमिताभ बच्चन यांनी पठान चित्रपटासंदर्भात बोलताना सिनेमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत असं वक्तव्य केलं. यानंतर ममता बॅनर्जी यांनी,
“जे अमिताभ यांनी आपल्याला समजावलं ते आपल्यापैकी कुणालाही बोलता आलं नसतं”
असं म्हणत अमिताभ यांचं कौतूक आणि पठान सिनेमाचं समर्थन अश्या दोन्ही गोष्टी केल्या.
या सगळ्या वादामुळे शाहरूखचं चार वर्षांनंतरचं अभिनय क्षेत्रातलं पुनरागमन मात्र टांगणीला लागलंय…
हे ही वाच भिडू:
- पिक्चर बॅन करण्याचा विषय निघाला की मध्य प्रदेशचे गृहमंत्री चर्चेत आलेच म्हणून समजा
- सगळं जुळून आलं असतं, तर DDLJ मध्ये शाहरुख खानच्या जागी टॉम क्रूझ दिसला असता…
- JNU च्या मुलांना सपोर्ट दिला म्हणून शेकडोजण दीपिकाच्या पिक्चरचं तिकीट कॅन्सल करत आहेत. पण..