हनिमूनचा सीजन आहे, तेव्हा १ लाखाच्या आत भारतातील ही बेस्ट ५ ठिकाणं एकदा बघाच…

उन्हाळा हा स्वतः एक सीजन आहे, मात्र हा सीजन येताना काही एकटा येत नाही तर अजून काही सिजन्स सोबत घेऊन येतो. सुट्ट्यांचा सीजन, आंब्यांचा सीजन, आयपीएलचा सीजन, लग्नाचा सीजन. आणि मग लग्नानंतर येतो हनिमूनचा सीजन. पण इथे कसरत होते, चांगली ठिकाणं मिळाली नाही तर पहिल्याच ट्रीपला पच्छि होण्याची भीती असते.

चांगली ठिकाणं म्हटलं की, सगळ्यात पहिले लक्ष जातं खिशाकडे. मग काय? अनेक जण येतात महाराष्ट्राचाच थोडा फेरफटका मारून. कितीही इच्छा असली तरी बाहेर जाता येत नाही. मात्र हीच वेळ तुमच्यावर येऊ नये, म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरची अशी पाच ठिकाण घेऊन आलो आहोत, जी ‘चांगली’ देखील आहेत आणि बजेट फ्रेंडली देखील. 

अगदी १ लाखाच्या आत आठवडाभर तुम्ही खुलेपणाने बिनाटेन्शन इथे हनिमून एन्जॉय करू शकतात. बघुयात कोणती… 

पाहिलं ठिकाण – गोवा 

याच्या नावातच सगळं काही येतं. त्यातही तुम्ही दोघंही पार्टी लव्हर असाल आणि निवांत ठिकाण देखील आवडत असेल, तर तुमचा इथेच फुलस्टॉप लागेल. का? अहो दिवस आणि रात्र दोन्ही सुंदर करण्याचा कॉन्ट्रॅक्ट जणू गोव्याने त्याच्या नावावरच केलाय. एक स्कूटी भाड्याने घेऊन सुंदर लँडस्केप, धम्माल बीचेस, शॉपिंगचे युनिक मार्केट्स, अडव्हेंचरस वॉटर स्पोर्ट्स यांचा मस्त आनंद घ्या.

डॉल्फिन शोधण्यासाठी बोटीने प्रवास करा आणि रात्री निवांत टेन्ड किंवा पबमध्ये ऑस्सम नाईटलाइफचा अनुभव घ्या. गोव्याचे रस्ते जरी तुम्ही फिरायला गेलात तर ते तुम्हाला अजून जास्त प्रेमात पाडतील. ठिकाणाच्याही आणि तुमच्या पार्टनरच्याही. 

आमच्या एका भिडूने हे ठिकाण निवडण्याचं असं कारण दिलंय, जे कदाचित अनेकांना रिलेट होऊ शकेल. 

गोवा महाराष्ट्राच्या जवळ आहे म्हणून जायचे-यायचे २ दिवस वाचतील, तेवढंच जास्त फिरणं होईल… 

आता याचा खर्च किती येईल?

कपलसाठी ॲव्हरेज एका दिवसाचा खर्च येऊ शकतो सहा ते साडे सहा हजार. म्हणजे आठवडाभर राहिलात तरी ५० हजारांमध्ये काम होऊ शकतं.

दुसरं ठिकाण आहे – केरळ

आता मे महिन्यात तुमचं लग्न झालं असेल तर हे बेस्ट ठिकाण आहे बघा. निसर्गरम्य ठिकाणी आपल्या जोडीदारासह रोमँटिक वाइब्स जगण्यासाठी केरळ तुम्हाला भरभरून ठिकाणं देतं. मुन्नार टी गार्डन्स, अथिरापल्लीतील एक ट्रीहाऊस स्टेट, अलेप्पीतील बोट हाऊस, वायनाडमधील ग्रीनरी, बेकलमध्ये किल्ले, कोवलम मधील समुद्रकिनारा आणि इतर अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. 

पारंपरिक खाणपाण, कथकली नृत्य, मारारी बीचवरील समुद्री वारा, सुंदर वास्तुशैलीचं सादरीकरण करणारे मंदिरं आणि महत्वाचं म्हणजे तिथलं अतुलनीय आदरातिथ्य… अशा सगळ्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही तुमची प्रायव्हेट स्पेस थोडीही डिस्टर्ब न होऊ देता घेऊ शकता. 

किती रुपयांमध्ये? 

दोघांसाठीचा एका दिवसाचा खर्च साधारण पाच हजारांपर्यंत येऊ शकतो. म्हणजे आठवडाभर राहिलात तर जास्तीत जास्त ४० हजार होतात. 

तिसरं ठिकाण – कूर्ग 

कूर्ग हे कर्नाटकातील एक थंड हवेचं ठिकाण आहे, जे स्पीचलेस करणारे धबधबे, घनदाट जंगल, उंच टेकड्या, निसर्गरम्य दृश्यं आणि विस्तीर्ण चहा आणि कॉफीच्या मळ्यांनी समृद्ध आहे. ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणून याला ओळखलं जातं. नैसर्गिक सौंदर्याबरोबरच हा प्रदेश एक प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्रही आहे. कुर्ग हे बायलाकुप्पे या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिबेटी वस्तीचं घर आहे. 

सोबतच ॲबे फॉल्स, डुबरे एलिफंट कॅम्प, मडिकेरी किल्ला, ओंकारेश्वर मंदिर यांना भेट देणं, ब्रम्हगिरी, मंडलपट्टी, कोटेबेट्टा ट्रेकिंग पॉईंट, बारापोल नदीवरील रिव्हर राफ्टिंग करणं, अशा खुपसाऱ्या गोष्टी इथे करता येतात. आमच्या ऑफिसमध्ये तर बहुमत मिळालेलं हे ठिकाण आहे. 

शिवाय इथे ३ दिवसांचा खर्च तुम्हाला येऊ शकतो १२ ते १४ हजार. 

म्हणूनच तर कूर्ग हे भारतातील स्वस्त हनिमून डेस्टिनेशनपैकी एक मानलं जातं. इथे तुम्ही दोघंच काय अख्ख कुटुंब घेऊन गेलात तरी परवडतंय.

चौथं ठिकाण – दार्जिलिंग 

‘कस्तो मजा है लेलेमा’ ही वाली ट्यून जर आपोआप तुमच्या तोंडात आली तर तेवढी ताकत आहे फक्त दार्जिलिंगमध्ये. कितीही दिवस इथे घालवा तुमच्या तोंडी ही ट्यून असणारच. 

बर्फाळ शिखरं, चहाचे मळे, मठ आणि अज्ञात डोंगराळा यांच्यातून निसर्गाची सफर करताना आपल्या जोडीदारासोबत येणारा अनुभव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. शॉपिंग, ट्रेकिंग, हायकिंग, टॉय ट्रेन, खंगचेंडझोंगा या ठिकाणचे वेगवेगळे स्पॉट्स, दृश्य, टायगर हिल, बटासिया लूप, घूम मॉनेस्ट्री, मॉल रोड आणि पद्मजा नायडू झुऑलॉजिकल पार्क अशी खुप ठिकाण आहेत इथे. 

इथल्या वूलनच्या तर असं प्रेमात पडाल तुम्ही की, विणकाम येत नसेल तरी ते खरेदी करून घरी आणाल. 

एका दिवसाचा खर्च इथे चार ते साडेचार हजार जाऊ शकतो. म्हणजे इथे पण दोघांचं आठवड्याभराचं फिरणं, राहणं, ५० हजारांच्या आतच आवरतंय.

पाचवं ठिकाण  – अंदमान निकोबार  

नाव ऐकून अनेकांना वाटेल, हे ठिकाण कसकाय? असूच शकत नाही. अरे, फोटो बघूनच कळतंय महाग असणार. ऑफिसमध्येही अनेकांचं हेच मत होतं. पण तुम्हाला सांगते, भारतातील इतर ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सच्या तुलनेत अंदमान निकोबार बेटाची सफर थोडी महागडी आहे, मात्र इतकंही महाग नाहीये. १ लाखाच्या आत आरामात होऊ शकणारं हे ठिकाण आहे. 

दोन व्यक्तींसाठी सुमारे ६० हजार ते ७० हजार खर्च येतो. 

मात्र वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी, अनुभवण्यासाठी हे एक पॅकेज असल्याने पैसे गेले तरी त्याचं सॅटिसफॅक्शन मिळतं. स्कूबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंग, शहराचा हेरिटेज वॉक, फेमस बेटांना भेट देणं आणि अडव्हेंचर्स वॉटर स्पोर्ट्स एक्सप्लोर करण्यासाठी मोठे समुद्रकिनारे इथे आहेत. तर पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, रॉस आयलंड, रेड स्किन किंवा जॉली बुऑय, घनदाट रेनफॉरेस्ट अशी सगळीच ठिकाणं तुम्हाला मोहून घेतील. 

अंदमान निकोबार म्हणजे ऍडव्हेंचर आणि रोमान्सचा मिश्र अनुभव देणारं नंदनवनच समजा. म्हणून आम्ही काय म्हणतो, एकदा जाऊनच या. 

या ठिकाणांव्यतिरिक्त, लक्षद्वीप, उटी, नैनिताल, ऐतिहासिक ठिकाणांमध्ये – जयपूर, जैसलमेर, हंपी, ऍडव्हेंचरसाठी लदाख अशी अनेक ठिकाणं आहेत, जी १ लाखाच्या आत होऊ शकतात. 

तेव्हा बघा, योग्य निवड करा. तुमच्या एखाद्या जिगरीचं ‘यंदा कर्तव्य असेल’ तर त्याला ही माहिती नक्की शेअर करत हॅप्पी हनिमून’ म्हणा, का? जमतंय ना!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.