फॅमिलीसोबत प्रवास करत असलात, तर हायवे जवळच्या या हॉटेल्समध्ये गेलंच पाहिजे…

दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या की वेध लागतात घर गाठायचे. जिथं स्थलांतर झालंय त्या शहरात कितीही रुळलो तरी सणाची मजा येते ती घरीच. दिवाळीच्या दिवसात पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून आपल्या घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसंच पुण्या मुंबईतली बरीच लोकं सुट्टीचं निमित्त साधून फिरायलाही बाहेर पडतात. या सगळ्या प्रवासात महत्त्वाचं असतंय ते म्हणजे जेवण.

वे वेगवेगळ्या मार्गांवरुन घरी किंवा बाहेर फिरताना कुठं आणि काय खायचं यावर सगळ्या ट्रिपचा मूड अवलंबून असतोय. म्हणूनच जाणून घेऊ प्रवास करताना कुठल्या हॉटेलला गेलं पाहिजे…

सुरुवात करूयात मुंबई-गोवा हायवेपासून

 १) मालवणी गजाली, वाशी –

भरपेट खाऊन मग प्रवास करायचा असा प्लॅन असेल, तर वाशीतल्या मालवणी गजाली या हॉटेलसारखा पर्याय नाही. घरच्या चवीसारखं उत्तम सीफूड इथं मिळतं. ताजं गरमागरम जेवण म्हणलं की विषय एन्ड.  इथले दरही माफक असल्यानं बरीच गर्दी सुद्धा असते.

२) नवरत्न रेस्टॉरंट, वाशी

Hotel Navratna

वाशी ब्रिजच्या जवळ असलेलं हॉटेल हा शाकाहारी लोकांसाठी बेस्ट पर्याय आहे. इथं पंजाबी, चायनीज फूड मिळत असलं, तरी सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे इडली सांबार. त्यामुळं इथं गेलात तर वेळ काळ न बघता इडली सांबार तेही एस्क्ट्रा सांबारसकट ट्राय करायला विसरु नका.

वाशीपासून सुरुवात करायचं कारण म्हणजे ही हॉटेल्स तुम्हाला पुन्हा मुंबईत येताना सुद्धा फायद्याची ठरतात.

३) दत्त भुवन, नेर्ले

WhatsApp Image 2022 10 22 at 3.22.42 PM घरासारखं दिसणारं हे हॉटेल जेवणही घरासारखंच देतं. दत्त भुवनच्या मेनू कार्डमध्ये फार व्हरायटी नाही, मांसाहारी जेवण करायचं असेल तर इथं मटण ताट मिळतं, मटण आवडत नसेल तर अंडाकरी ताटाचा पर्याय आहे आणि शाकाहारी ताटाचा पर्याय सुद्धा आहे. मटण ताट २००, अंडाकरी ताट १४० आणि शाकाहारी ताट १२० इतके कमी दर असल्यानं हे हॉटेल खिशाला परवडतं आणि चवीला आवडतंही.

४) महालक्ष्मी भोजनालय (भालेकर खानावळ), सावंतवाडी

WhatsApp Image 2022 10 22 at 5.49.58 PM

अस्सल कोकणी जेवण कुठं मिळत असेल, तर इथं. सुरमई, बांगडा, चणक, तिसऱ्या, पापलेट आणि खेकडे असं उत्तम सीफूड इथं मिळतं. शाकाहारी लोकांसाठीही थाळी उपलब्ध आहेच. अगदी तव्यावरून थेट ताटात येणाऱ्या घरगुती चपात्या ही सुद्धा इथली खासियत. इथं जाताना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा, सावंतवाडीतल्या आंबोली रोडवरच्या या हॉटेलमध्ये मजबूत गर्दी असते, त्यामुळं फोन करुन गेलेलं बरं आणि दुसरं म्हणजे इथून निघण्याआधी सोलकढी पिलीच पाहिजे.

५) अंकिता क्लासिक, वारखंड

WhatsApp Image 2022 10 22 at 3.51.36 PM

गोव्यात एंट्री केल्यावर वारखंडमध्ये अंकिता क्लासिक नावाचं एक हॉटेल दिसतं. इथं तुम्हाला टुरिस्ट गाड्या कमी आणि अस्सल गोवेकरी लोकांच्या गाड्या जास्त दिसतील. कारण हे हॉटेलच गोवेकरांचं आहे. इथं एकदम भारी मासे मिळतात आणि त्यातल्या त्यात इथं होणारी बहुतांश गर्दी ही ‘तिसऱ्या’ खाण्यासाठी असते. त्यामुळं गोव्याची चव इथं चाखायला मिळते असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.

आता पुढचा रस्ता मुंबई-कोल्हापूर हायवे

१) वाकडमध्ये थांबा आणि जगदंब, समाधान, रानजाई कुठंही जेवा

एक्सप्रेस वे मुळं भूक थोडी पुढं ढकलावी लागते, आणि पहिला स्टॉप घेता येतो तो वाकडला. इथं खाण्याचे तीन मस्त पर्याय आहेत. पहिला म्हणजे हॉटेल जगदंब, इथं तुम्हाला बोकडाचं मटण खायला मिळतं. काही जणांना बोल्हाईचं मटण लागतं तर त्यांच्यासाठी अगदी हायवेला असलेली समाधान खानावळ आहेच. पण तुम्हाला व्हेजच खायचं असेल, तर हॉटेल रानजाईला जा आणि मटकीची उसळ आणि भाकरी ही ऑर्डर द्या. अस्सल खवय्ये सांगतात इथल्या मटकीच्या रश्श्याची सर दुसऱ्या कशालाच नाही.

२) भैरवनाथ मिसळ, कामत हॉटेलच्या समोर 

साताऱ्याच्या अलीकडे विठ्ठल कामत हॉटेलच्या समोरच भैरवनाथ मिसळ नावाचं छोटेखानी हॉटेल आहे. इथं नावाप्रमाणेच मिसळ मिळते आणि त्याच्यासोबत बटाटाभजीही फेमस आहे. पण इथली खासियत म्हणजे सोलापुरी कडक भाकरी. जर लांबच्या प्रवासाला चाल असाल, तर पार्सल घेऊन जायला या भाकरीसारखा हेल्दी आणि स्वस्त पर्याय नाही.

३) हॉटेल शिवराज ढाबा, कराड

Hotel Shivraj Dhaba

अक्खा मसुर स्पेशल या टॅगलाईनसह दिसणाऱ्या या हॉटेलची काही खास वैशिष्ट्य आहेत. इथं शिवाजी महाराज जेवायला बसलेत अशी एक मूर्ती आहे. इथल्या मेनूकार्डमध्ये अगदी मोजके पदार्थ आहेत, ज्यातला सगळ्यात महागडा पदार्थ आहे १२० रुपये किंमतीचा. तब्बल ७०० लोकांची बैठक व्यवस्था असूनही शिवराजच्या बाहेर लोकं वेटिंगला थांबलेले असतात, म्हणजे विषय बघा. इथलं ताक आणि दहीही विशेष चवीमुळं फेमस आहे.

पुढचा रस्ता पुणे-सोलापूर हायवे

१) रामदरा, लोणी काळभोर

हायवे लगतच्या या हॉटेलमध्ये फार फॅन्सी मेन्यू नाहीयेत. कारण इथली स्पेशालिटी आहे, पिठलं भाकरी. साध्या ताटात गरमागरम पिठलं, भाकरी, बरोबर कांद्याच्या फोडी, लोणचं आणि ठेचा असं गावरान जेवण तुम्हाला इथं मिळू शकतं. झाडांच्या सावलीत बसून जेवायचा आनंदही इथं घेता येतो.

२) हॉटेल चतुर्थी, कुरकुंभ

समजा तुम्हाला व्हेज खायचं आहे आणि सोबत मोठा ग्रुप आहे, तर कुरकुंभ एमआयडीसीच्या थोडंसं पुढे हे चतुर्थी हॉटेल आहे. आजूबाजूला हिरवळ, ऐसपैस जागा असल्यानं हा पर्याय उत्तम ठरतो. इथं काय खायचं तर, पंजाबी, साऊथ इंडियन, मराठी आणि अगदी काँटिनेंटल फूड मिळतं. व्हरायटी असल्यानं भरपूर पर्याय मिळतात, पण हा इथं असताना बजेट थोडं जास्त ठेवायला विसरु नका.

३) हॉटेल जय तुळजाभवानी, चौफुला

WhatsApp Image 2022 10 22 at 5.41.32 PM

पुणे-सोलापूर हायवेबद्दल बोलायचं आणि मटण रानचा विषय निघणार नाही असं कसं होईल ? हॉटेल जय तुळजाभवानी हे मटण रानसाठी प्रसिद्ध असणारं हॉटेल. परफेक्ट मसाल्यानं भरलेलं मटण रान खाण्यासाठी इथं प्रचंड गर्दी होते. मटण रानसोबतच मसाला रोटी हि डिश सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. जागा फार मोठी नसली, तरी इथल्या चवीपुढं सगळ्या तक्रारी फिक्या पडतात.

आणखी एक रस्ता म्हणजे मुंबई-नाशिक हायवे

१) श्री दत्त स्नॅक्स

WhatsApp Image 2022 10 22 at 5.19.22 PM

मुंबई-नाशिक असा प्रवास करणाऱ्या कुठल्याही माणसाला खायचा पर्याय विचारा एकच नाव येतं, श्री दत्त स्नॅक्स. हायवेला दिसतात तसं टिपिकल हॉटेल दिसत असलं, तरी इथली स्वच्छता आणि चव या दोन्ही गोष्टी भारी आहेत. अनेकदा प्रवासात असताना उपास केला की काय खायचं हा प्रश्न पडतो, पण दत्त स्नॅक्समध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे पर्यायही मिळतात. इथं एकदा नाष्टा केला की कितीही लांबचा प्रवास असला तरी लोड नसतोय.

२) हॉटेल भगत ताराचंद, पडघा

WhatsApp Image 2022 10 22 at 5.23.25 PM

१८९५ मध्ये सुरु झालेलं हे हॉटेल आजही त्यांच्या चवीमुळं दर्जा राखून आहे. भगत ताराचंद हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथं पंजाबी किंवा साऊथ इंडियन खाण्यापेक्षा थाळी खाणं हा कधीही बेस्ट पर्याय. प्रशस्त जागा असल्यानं कुटुंबासोबत इथं जाणं सोयीचं ठरतंय.

३) हॉटेल साई ढाबा, भिवंडी

मुंबईत मिळणारं जेवण हे काहीसं कोकणी पद्धतीचं असतं. त्यात खोबऱ्याचा मनसोक्त वापर केला जातो. अर्थात त्यामुळंच त्या जेवणाला चव येते, पण इकडं घाटावर मात्र मसाले वापरुन तुलनेनं तिखट जेवण असतं. जर घाटावरच्या तिखट जेवणाची लज्जत हवी असेल, तर साई ढाबा हा चांगला पर्याय आहे. जिथल्या जेवणाची चव तुम्ही लवकर विसरत नाही, असं अनेक खवय्ये सांगतात.

तर दिवाळी, दसरा किंवा कुठलीही नॉर्मल ट्रिप असली, तरी ही यादी सेव्ह करुन ठेवा. आपल्या सगळ्या ट्रिपचा मूड एकाच गोष्टीवर अवलंबून असतोय तो म्हणजे जेवण, ते दणक्यात आणि भारीच झालं पाहिजे.

बाकी दिवाळीच्या पोटभर शुभेच्छा!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.