शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचं प्रत्येक शिल्प आजही इतिहास म्हणून गणलं जातं.

समुद्र प्रत्येकाला आवडतो. काहीज तिथं कचरा साफ करायला येतात , काहीजण कचरा टाकायला तिथं येतात. काहीजण त्यांची आवड जोपासायला समुद्रावर जातात. समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर पसरलेली मऊशार वाळू. या वाळूत लोकं घरं बनवतात, लहान पोरं किल्ले बनवतात, प्रत्येकजण तात्पुरतं त्या वाळूबरोबर आपल्या आठवणी बनवत असतो. मात्र एकजण असा आहे ज्याचं या वाळूवर अफाट प्रेम आहे आणि या वाळूच्या जोरावर त्याने जागतिक विक्रमांना गवसणी घातली आहे.

वाळूचा प्रियकर अर्थात शिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनायक.

शिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या शिल्पकला आपण समाज माध्यमांवर बघतोच. आजवर त्यांनी बनवलेली प्रत्येक शिल्पकला हि जागतिक दर्जाची आणि इतिहास म्हणून नोंदली गेली आहे. भारत देशातचं नव्हे तर जगभरात त्यांच्यासारखा उत्कृष्ट वाळुकार दुसरा नाहीए.

सुदर्शन पटनायक आपल्या कलेच्या माध्यमातून जरी आपल्याला भेटत असले तरी त्यांनी आवड कशी जोपासली, त्यांचा संघर्ष किती मोठा होता, प्रतिकूल परिस्थितीशी त्यांना सामना करावा लागला याचा हा आजचा किस्सा .

ओडिसातल्या जगन्नाथपुरीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात १५ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची आणि हलाखीची होती. शालेय शिक्षण सुरु असताना केवळ घरच्या प्रतिकूल परिस्थितिमुळे पुढे त्यांना शिकता आलं नाही. सहाव्या इयत्तेत त्यांनी शाळेला राम राम ठोकला. लहान वयातच पडेल ते काम ते करायचे आणि घरखर्चाला हातभार लावायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते एका बंगाली कुटुंबात सांगकाम्या म्हणून कामाला होते.

लहानपणापासूनच शिक्षणापेक्षा कला क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता. घरच्या गरिबीमुळे कलेसाठी लागणारे साहित्य त्यांना परवडणारे नव्हते म्हणून त्यांनी त्या क्षेत्राला मुरड घातली. पण त्यांनी सगळ्या समुद्राच्या वाळूलाच कॅनव्हास बनवलं आणि आपली आवड जोपासायला सुरवात केली.

रात्रीच्या तीन वाजेपासून ते समुद्रकिनारी जाऊन वाळूत शिल्प किंवा काहीतरी चित्र काढायचे आणि सकाळच्या सहा वाजता पुन्हा कामावर रुजू व्हायचे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं कारण त्यांना भीती होती कि यावर लोकांच्या वाईट प्रतिक्रिया आल्या तर पुढे काय करायचं. हळूहळू सकाळी फिरायला येणारी लोकं त्याची कला आवडीने पाहू लागली आणि त्याला सल्लेही देऊ लागली. सुदर्शन पटनायक त्या लोकांच्या सल्ल्याचा वापर करून आपली कला बहरवत गेले.

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी एक पानाची टपरी सुरु केली आणि दुसरीकडे आपली कलाही साकारू लागले.

सुरवातीच्या काळात जगन्नाथपुरीच्या देवाची मूर्ती, महादेवाची मूर्ती अशा अनेक देवांच्या मूर्ती ते साकारायचे. त्यांनी एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर एक व्यक्तीसारखी मूर्ती बनवली तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता कि हि खरंच मूर्ती आहे म्हणून इतकं बारीक काम आणि कलाकुसर ते शिल्प साकारताना लक्षात ठेवायचे.

दररोज वेगळी शिल्पकला ते साकारायचे मात्र लोकं फक्त बघून निघून जायचे मग त्यांना एक कल्पना आली कि आपण शिल्पकलेतून काहीतरी समाजजागृतीचा काहीतरी संदेश देत जाऊ आणि मग त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. पॉलिटिकल, करंट इश्यू, खेळ अशा कन्टेन्टवर आधारित ते शिल्प साकारू लागले तेव्हा त्यांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

भारताने दखल घेण्याआधी लंडन मधून त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रण आलं. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचा व्हिसा नाकारला गेला, एअरपोर्टवर त्यांचे कागदपत्र चोरीला गेले, नाराज झालेल्या सुदर्शन पटनायक यांनी पुन्हा व्हिजा मिळावा म्हणून अर्ज केला आणि लंडनला आपली कला सादर करून त्यांनी भारताची शान वाढवली.

आजवर जगभरात झालेल्या वाळूच्या शिल्पकला स्पर्धेत सुदर्शन पटनायक यांच्या नावावर २७ गोल्ड मेडल आहेत. पुढे भारत सरकारने त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारत सरकारचा मानाचा पदमश्री पुरस्कार देण्यात आला.

रशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी बनवलेल्या कलाकृतीला जगभरातून पीपल्स चॉईस अवॉर्ड देऊन त्यांना गौरवण्यात आलं. जगभरातल्या जवळपास सगळ्या देशांच्या वाळू कलाकृती स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत.

फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी जगातला सगळ्यात मोठा वाळूचा किल्ला त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून साकारला आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.

भारताच्या महत्वाच्या आणि चालू घडामोडींवर शिल्पाच्या आधारे कलाकृती साकारणारे सुदर्शन हे सध्याचे सगळ्यात मोठे कलाकार आहेत. सध्याच त्यांचं गाजणारं शिल्प म्हणजे करोना महामारीवर त्यांनी साकारलेलं भव्य दिव्य शिल्प होय.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.