पाणी साठलंय.. तर खरच पाण्यात उतरू नका, लेप्टोस्पायरोसिस घातक रोग आहे…

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस त्याच्या नेहमीच्या ‘फिक्स’ वेळेत न आल्याने यंदा सगळे जन या पावसाची आतुरतेनं वाट बघत होते. शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या होत्या, कित्येक ठिकाणी तर दुबार पेरणीचं संकट ओढवतय की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण फायनली या मोसमातला पाऊस आलाच.

संपूर्ण महाराष्ट्रात मागच्या ५ ते ६ दिवसांपासून धो धो पाऊस पडतोय, सगळी धरणं बर्‍यापैकी भरून वाहतायेत. काही भागात सरकारने रेड अलर्ट जारी केलाय. अशी सगळी पावसाची परिस्थिति असताना या पावसामुळे कामासाठी बाहेर पडणार्‍यांची धांदल उडून गेलीये. घराबाहेर पडताना अनेकांना हा पाऊस भिजवतोय आणि कित्येक शेतकर्‍यांना गावाकडं शेतात काम करताना नाइलाजाने का होईना हा पाऊस अंगावर घ्यावाच लागतोय. 

पावसाळ्यात सगळीकडे हिरवंगार, थंड आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होत असल्यामुळे कित्येकांना वर्षाविहार करण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे भरपूर पाऊस चालू असला तरी लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात.

पावसाच्या साचलेल्या आणि जमिनीवरून वाहणार्‍या पाण्यात बर्‍याचदा जीव जंतूंचा वावर असल्याने वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता असते. 

पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. सूर्य ढगांआड जातो. त्यामुळे आपल्याला हानीकारक असणार्‍या जीव जंतू नष्ट होत नाहीत कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाहीत. 

परिणामी आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. अशावेळी मोठ्यांसह लहान मुलांची देखील विशेष काळजी घ्यावी लागते.   

थंडीताप, सर्दी, डोकेदुखी यासोबतच पावसाळ्यात प्रामुख्याने होणारा आजार म्हणजे

लेप्टोस्पायरोसिस’.

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूजन्य आजार असून  या आजाराचे जीवाणू पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहू शकतात.

याचा प्रसार घुशी, उंदीर, मुंगूस, डुक्कर, कोल्हा, तसेच घोडा, कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या मुत्रातून होत असतो. उंदरांचे आणि इतर प्राण्यांचे मूत्र पाणी, डबके व नद्यांना अधिक दूषित करतात. या पाण्याशी आपला संपर्क आल्यानांतर त्वचेमध्ये असलेल्या भेगांमधून हे जीवाणू मानवांवर प्रभाव पाडू शकतात. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग मानव आणि प्राण्यांना देखील होतो.

भारतात संसर्गाचा प्रसार पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर दिसून येतो. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी सांडपाणी व्यवस्था. या संसर्गाचा प्रभाव शेतात विशेष करून भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांवर होऊ शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असेल तर अशा ठिकाणी हा रोग जास्त प्रमाणात पसरतो.

या लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीत बरेचदा लक्षणे ही फ्ल्यू सारखी असतात,

ज्यामध्ये थंडी भरून येणे, डोके दुखणे, स्नायू दुखणे यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिसचा उपचार हा या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे डॉक्टर्स ठरवतात.

पावसाळ्याच्या दिवसांत, पूरस्थितीमध्ये लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असतो. तसेच, चिखल व सतत प्राण्यांशी संपर्क येत असणारा शेतकरी वर्ग, सांडपाणी निचरा करणारे कचरा कामगार यांना पावसाळ्याच्या दिवसांत या आजाराचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते.

आता या आजाराची लक्षणं नेमकी काय असतात ? 

बरेच दिवस न जाणारा ताप, तीव्र अंगदुखी हे लेप्टोस्पायरोसिसची सामान्यत: दिसून येणारी लक्षणे आहेत.

बर्‍याच वेळा रूग्णांना कावीळ, मुत्रपिंड निकामी होणं किंवा फुप्फुसामधून रक्तस्त्राव होणं अशा प्रकारच्या देखील समस्या उद्भवू शकतात. अशा रूग्णांना डायलिसिस किंवा मेकॅनिकल वेंटिलेशनची सुद्धा गरज पडू शकते.

सुरूवातीला शरीरात जीवाणूंनी प्रवेश केल्यानंतर ७ ते १४ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. तर, काही लोकांमध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत.

तीव्र ताप, थंडी वाजून येणे, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधे दुखणे, पोटदुखी, उलट्या होणे, जुलाब होणे, पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे लालसर होणे. अशी गंभीर लक्षणं सुरुवातीच्या काळात दिसून येतात.

जर योग्य उपचार न केल्यास आजार वाढत जाऊन किडनी, फुप्फुसे, मेंदू, लिव्हर, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

चिखल, माती व पावसाच्या पाण्यात काम करताना त्यातून बर्‍याचदा जीवाणूंचा प्रवेश होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यातील साचलेल्या पाण्यात खेळणं किंवा चालणं टाळायाला हवं. गरज पडली तर पाण्यात उतरताना वॉटरप्रुफ कपडे, बूट इत्यादि गोष्टींचा वापर करावा. तसेच दुषित पाण्याशी संपर्क आल्यावर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यावेत. पाणी तुंबल्यानंतर लेप्टो होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे.

पावसाळ्याबरोबर गॅस्ट्रो, कॉलरा आणि लेप्टोचे रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूषित पाणी पिणे टाळावे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा.

यासोबतच पावसाळा आला की काही आजार हमखास होतात ते म्हणजे सर्दी, खोकला, डोकेदुखी, कावीळ, हगवण इत्यादि तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे आजार डासांमार्फत पसरतात. थंडी वाजून विशिष्ट वेळाने येणारा मलेरियाचा ताप, अंगदुखी, आणि कमी होत जाणाऱ्या प्लेटलेट्स ही डेंग्यूची लक्षणे. तापाबरोबर सांधेदुखी ही चिकनगुनियाची लक्षणे. असे आजार उद्भवतात.

यामुळे काही विशेष काळजी घेतली की भर पावसाळ्यात आपण या रोगांपासून दूर राहू शकतो.. 

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर आणि आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवायला हवा, आजाराची लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यामध्ये पचायला जड आहार घेतला तर तब्येत बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे पोषक आणि हलका आहार घ्यावा. बाहेरचं दूषित पाणी पिऊ नये, पाणी फिल्टर करून किंवा चांगलं उकळून थंड केलेलं पाणी पिण्यासाठी वापरावे.

पाऊस कमी होई पर्यंत शक्यतो बाहेर फिरायला जाणं टाळलेलंच बरं. चांगला पाऊस पडू द्या मग सगळीकडे हिरवंगार वातावरण तयार होईल आणि तोपर्यंत पाऊसही कमी होईल, मग फिरायला जायला काही हरकत नाहीये. तेव्हा अशी साधी आणि बेसिक काळजी घेऊन तुम्ही या पावसाळयात तंदुरुस्त राहून पावसाचा आनंद घेऊ शकता..

हे ही वाच भिडू ..

 

Leave A Reply

Your email address will not be published.