भंडाऱ्यामध्ये नेमकं काय घडलय..?

शनिवारची पहाट एक मन सुन्न करणारी बातमी घेऊन आली. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि ही दुर्दैवी घटना घडली.

रुग्णालयाच्या या बॉर्न युनिटमध्ये ज्या नवजात बालकांचं वजन कमी आहे किंवा जन्मतः इतर काही आजार असतील अशा एकूण १७ बालकांना इथं ठेवण्यात आलं होत.

लोकसत्ता वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,

बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या ७ बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

ABP माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार

या १७ बालंकापैकी १५ मुली तर २ मुलं होती. त्यातल्या ८ मुली दगावल्या असून २ मुलांचा मृत्यू झाला. तर ७ मुलींना वाचवण्यात यश आलं आहे.

खाली दिलेल्या यादी मध्ये मृत मुलांचं नामकरण झालं नसल्याने त्यांच्या आईचं नाव दिले आहे 

१. आईचे नाव – हिरकन्या हिरालाल भानारकर (मृत बालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली),

२. आईचे नाव – प्रियंका जयंत बसेशंकर (मृत बालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी),

३. आईचे नाव – वंदना मोहन सिडाम (मृत बालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा),

४. आईचे नाव – सुषमा पंढरी भंडारी (मृत बालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया),

५. आईचे नाव – गिता विश्वनाथ बेहरे (मृत बालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा),

६. आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी),

७. आईचे नाव – सुकेशनी धर्मपाल आगरे (मृत बालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी),

८. आईचे नाव – कविता बारेलाल कुंभारे (मृत बालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर),

९. आईचे नाव – योगिता विकेश धुळसे (मृत बालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा)

१०. अज्ञात (मृत बालक-पुरुष)

सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांच्या आईच नाव खालीलप्रमाणे  

१. आईचे नाव – शामकला शेंडे (बालक-स्त्री),

२. आईचे नाव – दीक्षा दिनेश खंडाते (बालक – स्त्री (जुळे),

३. आईचे नाव – अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री),

४. आईचे नाव – चेतना चाचेरे (बालक-स्त्री),

५. आईचे नाव – करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री),

६. आईचे नाव – सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री)

७. अज्ञात – (बालक-स्त्री)

प्रत्यक्षदर्शी राहुल आणि राजेश यांनी ABP माझा वृत्तवाहिनीला सांगितले,

आम्ही हॉस्पिटलच्या जवळच राहतो, सिक्युरिटीने रात्री फोन केल्यावर आम्ही पटकन आतमध्ये आलो, सगळे जण वर गेलो, खूप ट्राय करत होतो, पण काहीच दिसत नव्हतं, सगळं काळ – काळ होत. इकडून तिकडून शिडी आणून मागे गेलो, दार तोडलं, आणि आत मध्ये जाऊन ७ मुलांना बाहेर काढलं.

बाकीच्यांना काढू शकलो नाही कारण खूप आग होती.

शासनपातळीवर काय पावलं उचलली?

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यानं १० बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजता ही घटना घडली. सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :

या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. सोबतच सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही.

अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील दिले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कडक कारवाईचे गृहमंत्री देशमुख यांचं आश्वासन :

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. आगीच्या कारणांची चौकशी तज्ज्ञ मंडळी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मदतीची घोषणा: 

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात :

मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आग कशामुळे लागली याचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिलेली आहे. 

या सर्व घडामोडींबाबत मनसेचे अनिल शिदोरे जे ट्विट करतात ते फार महत्वपुर्ण वाटतं ते म्हणतात,

हा निव्वळ अपघात आहे असं समजून सोडून देणं योग्य नाही. हे असले अपघात नसतात तर वर्षानुवर्षाच्या आपल्या घोर दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत असतात.

मृत बालकांना बोलभिडूकडून भावपूर्ण श्रद्धांजली…! 

Leave A Reply

Your email address will not be published.