पक्षनिष्ठेसाठी मुख्यमंत्रीपद नाकारणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता

पक्षनिष्ठा काय असते, पक्षासाठी काय करायचं असतं, पक्षाचे विचार काय असतात…

या सर्व गोष्टींचा काळ संपला. आत्ता या गोष्टी होत नाहीत. पण पुर्वी पक्षनिष्ठेसाठी मुख्यमंत्रीपद नाकारणारी माणसं याच महाराष्ट्रात झालेली आहेत. ही गोष्ट अशाच एका नेत्यांची ज्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली असताना देखील पक्षांतर केलं नाही..

त्या नेत्याचं नाव आहे भाई उद्धवराव पाटील..

यशवंतराव चव्हाणांनी आपल्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री हे पद उस्मानाबादच्या उद्धवराव पाटलांना देवू केले होते. 

वास्तविक भाई उद्धवराव पाटील यांचा उस्मानाबादचे नेते असा उल्लेख करणं म्हणजे त्यांना मर्यादित करण्यासारखं होईल. भाई उद्धवराव जसे मराठवाडा मुक्ती संग्रामातले मोठ्ठे होते तसेच ते महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा आवाज होते. ३० जानेवारी १९२० साली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या इर्ले गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर आर्य समाजाचा पगडा होता. LLB च शिक्षण झाल्यानंतर ते समाजकारण व राजकारणात आले.

हैद्राबादचा मुक्तीसंग्राम हा मुस्लीमांविरोधातला लढा नव्हता हे ते लोकांना पटवून सांगत. १९५२ साली ते उस्मानाबाद तुळजापूर मतदारसंघातून हैद्राबाद असेंब्लीत निवडून गेले. भाषिक पुर्नरचनेनंतर मुंबई राज्याची स्थापना झाली त्यानंतर ते मुंबई विधानसभेचे सदस्य झाले. पुढे ते शेकाप पक्षामार्फेत श्रमीकांची व शेतकऱ्यांची लढाई लढू लागले. १९५८ साली ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 

हा किस्सा देखील त्याच नंतरचा. 

विधानसभेत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि भाई विरोधीपक्षनेते. भाईंच विधानसभेतील मुद्देशीर म्हणणं यशवंतराव चव्हाण ऐकून घ्यायचे. यशवंतरावांनी आपल्या हयातीत कधीच भाई उद्धवरावांच भाषण चुकवलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाई उद्धवराव असे समीकरण होते. 

१४ नोव्हेंबर १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात जाव लागलं. त्यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याच्या चर्चा चालू झाल्या. वसंतराव नाईक हेच जेष्ठ असल्याने मुख्यमंत्रीपद वसंतराव नाईकांना मिळेल याची शक्यता होती. मात्र यशवंतराव चव्हाणांच्या मनात वेगळच होतं.

यशवंतराव चव्हाणांना विरोधी पक्षात असणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांना मुख्यमंत्री करायचं होतं. 

भाईंना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी तत्कालीन राज्यसभेचे खासदार रामराव आवरगावकर यांना दिली होती. रामराव आवरगावकर ठरल्याप्रमाणे भाईंच्या घरी गेले. भाईंनी त्यांना चहापाणी केले. विषयाला बोलण्यास सुरवात झाली.

रामरावांनी त्यांना सांगितल यशवंतरावांनंतर कोण हा प्रश्न खुद्द यशवंतराव चव्हाणांना देखील पडला आहे. त्यांच्या नंतरच सक्षम नेतृत्त्व म्हणून ते तुमच्याकडे पाहतात. चव्हाण साहेबांचा निरोप आहे की तुम्ही कॉंग्रेसमध्ये याव आणि मुख्यमंत्री पद स्वीकारावं. 

त्यावर भाई उद्धवराव म्हणाले, 

‘तुम्ही देऊ केलेला सन्मान मी स्वीकारू शकत नाही. कारण मी डाव्या चळवळीचे राजकारण करतो. शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाणार आहे. मला सत्तेचा मोह नाही.’

त्यांच हे उत्तर घेवून रामराव आवरगावकर यशवंतराव चव्हाणांकडे गेले. विचारांना पक्के असणारे भाई मुख्यमंत्री पद नाकारत आहे हे ऐकून यशवंतराव चव्हाणांना वाईट वाटल पण आपण एका सच्चा माणसावर विश्वास टाकल्याच समाधान देखील त्यांना वाटलं. 

पुढे भाई खासदार झाले. त्यांनी डाव्या पक्षाच राजकारण केलं. मुख्यमंत्री पद नाकारताना ते म्हणाले होते की, कामगारांच्या लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाणार. त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांच पार्थिव लाल झेंड्यातच गुंडाळले गेले.  

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Adv.Ravi Pathade says

    गोकुळ दूध संघ च्या निवडणुकी विषयी लेख वाचयाला आवडेल …

Leave A Reply

Your email address will not be published.