स्वत:ची सहनशीलता तपासण्यासाठी कोण स्वत:चा हात जाळून घेतं का, सुखदेव ते करायचे

सुखदेव थापर.. भयंकर लहरी तरुण.. सुखदेवांचे राहणीमान इतर क्रांतिकारी मित्रांपेक्षा प्रचंड वेगळे असायचे.. डोक्यावर अख्खी तेलाची बाटली ओतली आहे असं वाटावं एवढं तेल डोक्याला लावलेलं, त्याचा ओघळ खाली मानेपर्यंत यायचा..

अंगात मळका सदरा.. कधीच बाह्यांच्या गुंड्या लावलेल्या नसायच्या.. एक खाली तर एक वर.. डोक्यावर टोपी.. हातात बांधलेला गजरा आणि कणीस खात खात गाणे म्हणत बाजारातून फिरणे हा त्यांचा छंदच होता.. पार्टीमध्ये त्यांचे टोपणनाव ‘व्हिलेजर’..

एकदा झालं असं, सुखदेवांना एक मार्शल आर्टस् चे पुस्तक सापडले.

त्यांनी ते पूर्ण वाचून काढले. सुखदेव भगतसिंहांप्रमाणे पट्टीचे वाचक होते. एखादं पुस्तक त्यांनी वाचून काढलं, तर परत त्या पुस्तकाला हात लावायची गरज पडत नसे, एवढी त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. 

सुखदेवांनी ते मार्शल आर्टस्चे पुस्तक वाचले, त्यात लिहिले होते की जर अगदी नेम धरून समोरच्या व्यक्तीच्या नाकावर बंदमुठीने ठोसा दिला तर समोरचा मूर्च्छित होऊ शकेल एवढा तो घाव वर्मी लागतो.

आता त्यांना हवं होतं याचं प्रात्यक्षिक.. त्यांनी पुस्तक हातात घेतल आणि तडक बाजाराकडे आपली पावलं वळवली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांना मनासारखा तगडा व्यक्ती दिसला. त्याच्यासमोर जाऊन अगदी ताकदीने सुखदेवांनी त्याच्या नाकावर ठोसा लगावला.. पैलवानासारखा धिप्पाड तरुण व्हिवळतच खाली बसला.

त्यांनी जे वाचलं ते प्रत्यक्षात सिद्ध झालं होतं. पण सुखदेव तिथून हलले नाहीत. ठोस्याचा परिणाम किती वेळ राहतो, हे पाहण्यासाठी ते जागेवरच उभे राहिले. काही वेळाने तो तगडा व्यक्ती उठला आणि मग सुखदेवांनी केलेल्या कृतीचे उत्तर त्यानेसुद्धा ठोस्यानेच दिले.

सुखदेव स्वतः कसेही राहत असले तरीही त्यांचा आपल्या क्रांतिकारी साथीदारांकडे विशेष लक्ष असे.

कुणाची गुंडी तुटली आहे, कुणाचे कपडे फाटले आहेत, कोण मळके कपडे घातलेत का, कुणाच्या चपला तुटल्यात का याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. आपल्या साथीदारांना जे लागेल ते आणून देण्याची तयारी सुखदेवांनी आधीच करून ठेवली असे त्यामुळे कधीच या तरुणांना काही मागायची गरज पडत नसे.  शिव वर्मा सुखदेवांच्या बाबतीत लिहिलं होतं,

“मी ऐकल होत संघटनेमध्ये विलेजर नावाची कोणी व्यक्ती आहे. विलेजर म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला गावाकडचा तरुण शेतकरी, निरक्षर किंवा कमी शिकलेला पण ताकदवान, ज्याच्या चेहऱ्यावर कठिण परिश्रमाचे व्रण लहानपणापासूनच कोरलेले असतील.. त्याचा रंगसुद्धा गोरा नसेल..

पण, जेव्हा मी डी.ए.वी. कॉलेज, कानपूर मध्ये असताना तो माझ्या खोलीवर आला, तेव्हा मी माझ्या डोक्यात कोरल्या गेलेल्या प्रतिबिंबापेक्षा तो पूर्ण वेगळा होता. सडपातळ, गोरा रंग, गुबगुबीत गाल, मोठे मोठे डोळे, मुलायम चेहरा असलेला विलेजर.. तो कसाही असला तरी तो गावातला शेतकरी नव्हता, हे नक्की.. नंतर कळाले त्याचे नाव सुखदेव आहे..”

सुखदेवांच्या सहनशक्तीचा नमुना दाखवणारा आणखी एक किस्सा.. 

त्यांनी क्रांतीकारक दलात येण्याआधी एका हातावर ओम आणि स्वतःचं नाव गोंदवलं होतं. कधी फरार झालेच तर त्यांना ओळखण्यासाठी ही गोष्ट पुरेशी होती. आग्ऱ्यात बाॅम्ब बनवण्यासाठी नाईट्रीक ऍसिड विकत घेऊन ठेवण्यात आलं होत. कुणालाही न सांगता सुखदेवांनी ते हातावरच्या त्या दोन खुणांवरती लावलं..

संध्याकाळपर्यंत जिथं जिथं ते लावलं गेलं त्या ठिकाणी मोठया-मोठ्या जखमा झाल्या आणि पुर्ण हात सुजला.. सुखदेवांना भयंकर ताप आला. इतकं सारं होऊनही सुखदेवांनी याबद्दल तोंडातुन ब्र काढला नाही.

दुसऱ्या दिवशी अंघोळीसाठी त्यांनी आपला कुर्ता काढला तेव्हा हा सगळा प्रकार भगतसिंहाच्या नजरेस आला. भगतसिंहांना आपण केलेलं कृत्य समजलंय, हे दिसल्यावर सुखदेव हसत हसत म्हणाले,

“शिनख्त की निशानी भी मिट जाएगी और एसिड मे कितनी जलन है इसका अनुभव भी हो जाएगा.”

नंतर साथिदारांनी त्यांच्यावर इलाज केला. बऱ्याच दिवसांनी जखमा भरल्या. पण अजुन काही अक्षरं शिल्लक असल्याचं सुखदेवांना दिसलं. तेव्हा ते भगवतीचरण व्होरा यांच्या घरी मुक्कामी होते. बाजूलाच जळत असलेल्या मेणबत्तीवर त्यांनी हात धरला, अगदी ती अक्षरं जळेपर्यंत. भगवतीभाई बाहेर गेलेले होते. बराच वेळ झालं, सुखदेव खोलीत एकटेच काय करत आहेत, हे पाहण्यासाठी जेव्हा दुर्गाभाभी खोलीत गेल्या तेव्हा सुखदेव निवांतपणे जळत्या मेणबत्तीवर हात धरुन त्वचा पुर्ण भाजेपर्यंत उभे होते.

असे होते सुखदेव.. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना शिव वर्मा म्हणतात

भगतसिंग जर पंजाब संघटनेचा राजनैतिक नेता असेल तर सुखदेव त्याचा संघटनकर्ता होता

..एक एक वीट जोडून इमारत उभी करणारा..”

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.