फासावर जाण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भगतसिंह पुस्तकच वाचत होते..
“देशातील हाताच्या बोटावर मोजन्याइतक्या त्यावेळेच्या अभ्यासू राजकीय व्यक्ति काढल्या,तर भगतसिंह हे त्यांपैकी एक होते.”
क्रांतिकारी लेखक जितेन्द्रनाथ सन्याल यांनी भगतसिंहाविषयी काढलेले गौरवोद्गार..
भगतसिंहांच्या सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे वाचन. त्यांचे वाचनाचे वेड अफाट होते. त्यांचे मित्र शिव वर्मा यांनी लिहून ठेवले आहे,
“भगतसिंहाच्या वाचन गतीशी जुळवून घेण्यास ग्रंथालयाला अवघड होऊन बसत असे.”
चौथीमधे असताना भगतसिंह यांनी त्यांचे काका अजीतसिंह, लाला लाजपतराय आणि अन्य गदर पार्टीचे नेते यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडीच्या अनेक फाइल्स वाचून काढल्या होत्या. तसेच, सूफी अंबाप्रसाद आणि लाला हरदयाल यांनी लिहिलेली किमान 50 पुस्तके त्यांनी वाचली होती.
भगतसिंहांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या अनेक लेखकांची पुस्तके वाचली. त्यांची यादी करायची झाल्यास फार मोठी होईल. यामध्ये बुखातीन, डार्लिंग्स, कार्ल लिब्नेक्ख्त, बी.रसेल, प्रिंस क्रोपोस्तकीन, मार्क्स,अप्टोन सिंक्लेयर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बर्नार्ड शॉ अशा एकूण 107 लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे, पुस्तकांचे भगतसिंहांनी टिपन काढून ठेवले होते. आज ही टिपणे आपल्यासमोर ‘भगतसिंहाची जेल डायरी’ म्हणून उपलब्ध आहेत.
भगतसिंहांना हवी ती पुस्तके मिळण्याचे ठिकाण म्हणजे द्वारकादास लायब्ररी..
गितारहस्य, नेपोलियन की जीवन गाथा, Militarism, Why men fight, Soviets at work, Collapse of second international, Left wing communism, Mutual add Fields,factories and workshops, Civil war in france, Land revolution In Asia, Spy, Historical Materialism, Profit of religion अशी एक ना अनेक पुस्तके भगतसिंहांनी वाचून काढली होती.
अवघ्या 23 वर्षांत भगतसिंहांनी केलेले एवढे वाचन त्यांच्या विचारांच्या कक्षांची व्याप्तीच दाखवतात..
भगतसिंहांचे जवळचे मित्र शिव वर्मा भगत सिंहांच्या पुस्तक वाचनाबद्दल सुंदर आठवण सांगतात,
“आम्हा सर्वाना वाचन आवडत असलं तरी, भगतसिंहाच वाचन प्रेम काही वेगळं होतं. समाजवादाविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा असूनही त्यांनी कादंबरी वाचण्याची, खासकरून राजकीय आणि आर्थिक विषयांबद्दल उत्कट इच्छा मनी धरलेली. डिकन्स, अप्टन सिन्क्लेअर, हॉल केन, व्हिक्टर ह्यूगो, गॉर्की आणि लिओनार्ड अँड्रयू हे त्यांचे काही आवडते लेखक.
पुस्तकातील काही विशिष्ट पात्रांसोबत ते भावनिकरित्या जोडले जायचे. काही काही वेळा त्या पात्रांसमवेत ते अक्षरशः रडायचे तर कधी मनमोकळे हसायचे.”
भगतसिंहांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पुस्तके वाचली. कित्येक लेख लिहीले. पत्रके छापली. पण भगतसिंह यांनी 4 पुस्तके लिहिली होती, ही गोष्ट फार कमी जणांना माहीत आहे..
1 – The History of Revolutionary Movement Of India
2 – The Ideal Of Socialism
3 – Autobiography
4 – At The Door Of Death
आपले दुर्दैव पहा.. सन 1947 पर्यंत हा ठेवा भगतसिंहांच्या सहकाऱ्यांनी काही विश्वासू लोकांकडे सुपूर्त केला होता. भारताची फाळणी झाल्यावर मात्र सगळ्या गोष्टी बदलल्या. ही पुस्तके कुठे गेली, हे आजवर समजले नाही. ज्या व्यक्तीकडे ही पुस्तके शेवटची पाहण्यात आली, त्याचे घर फाळणीच्या दंगलीत जळाले. त्यात ही पुस्तके जळाली की नाही, याचीही त्याला कल्पना नाही.
भगतसिंह यांनी आग्र्याला 175 पुस्तकांचे छोटेखानी ग्रंथालयसुद्धा स्थापन केले होते.
आपल्या मित्रांनी वेगवेगळी पुस्तके वाचावीत, याची ते पुरेपूर काळजी घेत असत. आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रिन यांची आत्मकथा “आयरिश स्वातंत्र्यासाठी माझा लढा” या पुस्तकाचे भाषांतर करून आपल्या सर्व सहकाऱ्यांना ते वाचायला दिले. वाचनावर एवढे प्रचंड प्रेम करणारा हा अवलिया तरुण विरळच..
भगतसिंह यांच्यावर बकुनिनने लिहोलेल्या god and state या पुस्तकाचा फार प्रभाव होता.
अगदी फासावर जायच्या काही क्षण आधीपर्यंत भगतसिंह ‘क्रांतिकारी लेनिन’ हे पुस्तक वाचत होते.
पुस्तकांच्या दुनियेत स्वताला हरवून घेतलेल्या या तरुणाची लेखनी इतकी धारदार का होती, याची एक झलक यातून आपल्याला पाहायला मिळते. काळाच्या पुढे चालून विचार करणाऱ्या या महान क्रांतिकारी तरुणाला शत शत नमन.
- केतन पुरी
हे ही वाच भिडू.
- त्यादिवशी भगतसिंहांचा काढलेला फोटो क्रांतीचे प्रतीक बनून अजरामर झाला..
- १२ गावे पाकिस्तानला दिली तेव्हाच भगतसिंग यांचं अंत्यसंस्कार झालेलं गाव भारताला मिळालं.
- फक्त एका फोटोच्या बदल्यात त्याने चंद्रशेखर आझाद यांची पिस्तूल भारतात परत पाठवली
- ८५ वर्षानंतर भगतसिंग यांच्या पिस्तुलचा शोध सुरू झाला..