भगतसिंगांच्या हौतात्म्याचा खरा बदल घेतला तो क्रांतीपुत्री शांती घोष यांनी…

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जितकी महत्वाची भूमिका पुरूष क्रांतिकारकांची होती, तितकीच महिलांची सुद्धा. अनेक जुन्या विचारांनी बुरसटलेल्या समाजात सुद्धा या महिला क्रांतिकारक निर्भीडपणे पुढे आल्या, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

यातलचं एक उदाहरण म्हणजे १५ वर्षीय क्रांतीपुत्री शांती घोष. ज्यांनी आपल्या  साथीदारांच्या हत्येच बदला हत्या करूनचं घेतला. 

शांती घोष यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१६ साली कलकत्त्यात झाला. शांती यांचे  वडील देबेंद्रनाथ घोष कोमिल्लाच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये फिलॉसॉपीचे प्राध्यापक होते.  त्यामुळे आपल्या देशासाठी समर्पणाची भावना घरातूनचं निर्माण झाली. वडीलच प्राध्यापक होते म्हंटल्यावर त्यांचं प्राथमिक शिक्षण हे घरातूनच झालं. आणि त्यांनतर पूढच्या शिक्षणासाठी त्यांनी फजुनिसा कन्या शाळेत प्रवेश घेतला.

इथं त्यांची भेट प्रफुल्ल नलिनी ब्रह्मा यांच्याशी झाली. त्यामुळे शांती घोष यांनी लहान वयातचं विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. १९३१ मध्ये त्या मुलींच्या विद्यार्थी संघटनेच्या संस्थापक सदस्या तसेच सचिव म्हणून निवडून आल्या.  प्रफुल्ल नलिनी ब्रह्मा यांच्या मदतीनेच त्या युगांतर पक्षात सामील झाल्या. आता तसं पाहिलं तर हा पक्ष फक्त नावाला होता, पण यातून क्रांतिकारी उपक्रम राबविणे हा त्यांचा मेन उद्देश होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणाने अनेकांना स्वातंत्रलढ्यात सहभागी करून घेतलं होत. “हे मातांनो! स्त्रीत्वाच्या रक्षणासाठी तुम्ही शस्त्र उचला… ” नेताजींच्या या आव्हानानेचं शांती घोष यांना सुद्धा क्रांतिकारक बनण्याची प्रेरणा दिली.

युगांतर पार्टीत सामील झाल्यानंतर शांती यांनी तलवारबाजी आणि काठ्या तसेच इतर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची विशेष मोहिमेसाठी निवड झाली. यात सुनीती चौधरी त्यांच्यासोबत होत्या. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणत्या महिलेला क्रांतिकारी चळवळीत काम करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

कारण पूर्वीच्या युगांतर पक्षात महिला पडद्याआड राहून क्रांतिकारकांना मदत करायच्या. पण  पहिल्यांदाच पडद्याच्या बाहेर पडून  महिला इंग्रजांचा सामना करतील असा निर्णय घेण्यात आला.

याच दरम्यान २३ मार्च १९३१ रोजी धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीची. या तिन्ही क्रांतिकारकांच्या  हौतात्म्याचा बदला घेणे हे शांती घोष यांचे ध्येय बनले.

१४ डिसेंबर १९३१ रोजी या दोन क्रांतीपुत्री स्विमिंग क्लब चालवण्याची परवानगी घेण्याच्या बहाण्याने कोमिल्लाचे  जिल्हा दंडाधिकारी चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स यांच्या कार्यालयात पोहोचल्या आणि न्यायदंडाधिकारी समोर येताच दोघींनी त्याला कँडी आणि चॉकलेट दिलं. 

चॉकलेट खाल्ल्यानंतर  तो ब्रिटीश दंडाधिकारी म्हणाला, खूप चवदार आहे. यानंतर दोन्ही महिला क्रांतिकारकांनी लगेच शॉलखाली असलेलं हत्यार काढलं आणि म्हणाल्या – अच्छा! आता हे कसं आहे  मिस्टर मॅजिस्ट्रेट? आणि त्याला गोळ्या घालून ठार मारलं.

या घटनेने एकच खळबळ उडाली होती. काही नियतकालिकांनी या हत्येचे चित्रण भारतीयांच्या आक्रोशांपैकी एक म्हणून केलं, तर  भारतीय स्त्रोतांनी या हत्येचे वर्णन ब्रिटिश जिल्हा दंडाधिकाऱ्याची स्त्रियांसोबतच्या गैरवर्तनाची प्रतिक्रिया म्हणून केले.

या घटनेनंतर शांती घोष आणि सुनीती चौधरी यांना अटक करून दंडाधिकारी यांच्यावर हत्येचा खटला चालवण्यात आला. तरुण  असल्यामुळे दोघींनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. एवढंच नाही तर तुरुंगात त्यांना आपली साथीदार सुनीतीपासून वेगळ्या ठिकाणी  आले होते. सुमारे सात वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर १९३९ साली शांती घोष यांची तुरुंगातून सुटका झाली.

तुरुंगातून सुटल्यानंतर शांती यांनी आपला अभ्यास पुन्हा सुरू केला. यासोबतच त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्याही झाल्या. यानंतर, १९४२ मध्ये त्यांनी चितगाव म्हणजे आताच्या बांगलादेशात राहणारे क्रांतिकारी प्राध्यापक चित्तरंजन दास यांच्याशी लग्न केले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या राजकीय कार्यात सहभागी झाल्या होत्या. याचा परिणाम म्हणून, त्या १९५२- ६२ आणि १९६७- ६८ पर्यंत बंगाल विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्य होत्या.

शांती घोष यांनी बंगाली भाषेत त्यांचे आत्मचरित्र अरूण बहनी सुद्धा लिहीलं.

शांती घोष यांचे साहसी कार्य भारतीय लोकांपर्यंत नेण्यासाठी ये मदर नावाचा चित्रपट २०१० मध्ये तयार करण्यात आला होता.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.