काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. सरदार भगतसिंह..

भगतसिंहांनी युवकांना दिलेला संदेश..

खरं पहायला गेलं, तर भगतसिंह हे आजच्या घडीला सर्व विद्यार्थ्यांचे, युवकांचे नेतृत्व म्हणायला हरकत नाही. शंभर वर्षांपूर्वी या भारतात होऊन गेलेल्या एका तरुणाचे विचार आजही या समाजात तंतोतंत लागू पडतात. 16 मे 1925 रोजी भगतसिंहांचा ‘विद्यार्थी, युवकांसाठी संदेश’ नामक एक लेख छापून आला. त्या काळाची पद्धत होती. क्रांतिकारी लेखक बहुदा आपले लेख एखाद्या टोपणनावाने अथवा दुसऱ्या नावाने लिहीत असत. त्यामागे आपले नाव गुप्त राहावे हीच भावना होती. हा लेख भगतसिंहांनी ‘बलवंतसिंह’ नावाने लिहिला.

हा लेख आजच्या घडीला सर्वांना एवढा प्रेरणा देणारा आहे, की वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भगतसिंहांना हे सुचलं कसं, हा प्रश्न पडतो.

भगतसिंह म्हणतात,
“जसा क्रांतिकारकांच्या खिशामध्ये बॉम्बगोळा, कटकारस्थान्याच्या अस्तनीत भरलेले पिस्तुल, जसे रणोत्सुक योध्याच्या हातामध्ये खड्ग, तशी मनुष्याच्या देहामध्ये युवावस्था.. हाडामांसाच्या या पेटार्यामध्ये विधाता जगभरातील हाहाकार एकवटून बंद करतो. युवावस्था दिसते तर शामल वसुंधरेपेक्षाही अधिक सुंदर, पण तिच्या आत भूकंपाचा भयंकरपणा भरलेला असतो.” तारुण्याचे, युवावस्थेचे नितांत सुंदर वर्णन किती कमी शब्दात भगतसिंहांनी करून ठेवल आहे. युवकांची ताकद काय हे सांगताना भगतसिंह पुढे लिहितात,

“युवक वाटेल तर त्यागी होऊ शकतो.. वाटेल तर तो विलासी होऊ शकतो.. तो देव बनू शकतो किंवा पिशाचही बनू शकतो.. तो जगाला त्रस्त करू शकतो तर अभयदानही देऊ शकतो.. जगामध्ये केवळ युवकांचेच साम्राज्य आहे. युवक रणचंडीच्या ललाटावरील रेष आहे. युवक स्वदेशाच्या विजय-वैजयंतीचा शक्तिशाली राजदंड आहे. तो निश्चित आहे आणि निष्काळजीसुद्धा.. रात्ररात्रभर जागणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे..पतितांचा उत्थान आणि जगाचा उद्धार करण्याची सूत्रे त्याच्याच हाती आहेत.. या विशाल रंगमंचाचा युवक सिद्धहस्त खेळाडू आहे…”

बलिदान म्हणजे भगतसिंह आणि भगतसिंह म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती..

भगतसिंह याच गोष्टीवर लिहितात,
“जर रक्त सांडायचे असेल तर युवकाशिवाय कोण देईल? तुम्हाला बलिदान हवे असेल, तर तुम्हाला युवकांकडेच यावे लागेल. आजचे युवक हेच उद्याच्या राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत. जगाच्या इतिहासाची पाने उघडून पहा, युवकांच्या रक्तांनी लिहिलेले संदेश पानोपानी दिसतील.. जगाच्या क्रांत्यांची आणि परिवर्तनांची वर्णने तपासून पहा.. त्यात केवळ असे युवक भेटतील, ज्यांना बुद्धिमान लोकांनी ‘वेडी पोरं’ किंवा ‘वाट चुकलेले’ असं म्हणल आहे. सच्चा युवक तर न भिता मृत्यूला आलिंगन देतो.. धारदार संगिनीसमोर छाती पुढे करून राहतो.. तोफेच्या तोंडावर बसूनही हसतच राहतो.. बेडयांच्या झंकारावर राष्ट्रगीत गातो आणि फाशीच्या तख्तावर अट्टहासाने आरूढ होतो.. हा युवक आहे..”

हे भगतसिंह होते.. तरुण कसा असावा तर भगतसिंहांसारखा असे आपण सर्रास म्हणतो.. पण भगतसिंह आपल्या सर्वांकडे, तरुणांकडे नेमकं काय आणि कोणत्या दृष्टीने पाहत होते हे भगतसिंहांनीच खुद्द लिहून ठेवलय..

या लेखाच्या शेवटी भगतसिंहांनी दिलेला संदेश आजही आपल्याला लागू पडतो.. ते म्हणतात,

“हे भारतीय तरुणा.. तू का गोंधळाच्या झोपेत निश्चिंत घोरत पडला आहेस? उठ.. डोळे उघड.. बघ पूर्व दिशेला ललाट रक्तरंजित झाले आहे. आता आणखी झोपू नकोस. झोपायचे असेल तर अनंत निद्रेच्या कुशीमध्ये जाऊन झोपी जा. भ्याडपणाच्या बाहुपाशात का झोपत आहेस? अजूनही तुझ्या अंगात जराजरी लाज शिल्लक असेल तर उठून आईच्या दुधाची लाज राख, तिच्या उद्धाराचा विडा उचल, तिच्या आसवांच्या एकेक थेंबाची शपथ घे, तिचे संकट पैलतीरीला ने आणि मुक्त कंठाने म्हण.. वंदे मातरम….”

किती ही आर्तता? एवढ्या तळमळीने भगतसिंह तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी आवाहन करतोय.. बर तेव्हा वय काय होते? तर अवघे सतरा-अठरा वर्षे.. काय कळतं हो या वयात?

काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. द्रष्टा कॉम्रेड.. सरदार भगतसिंह..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.