त्यादिवशी भगतसिंहांचा काढलेला फोटो क्रांतीचे प्रतीक बनून अजरामर झाला..

भगतसिंह म्हणजे क्रांतीची प्रेरणा. आजही भारतातल्या प्रत्येक तरुणाला भगतसिंह प्रेरणादायी वाटतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जाणारे भगतसिंह त्यागाचे, राष्ट्रप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

भगतसिंहांचे एकूण चार फोटो आज उपलब्ध असून, त्यांच्या खरेपणाविषयी कोणतीही शंका नाही. यातील एक फोटो त्यांच्या लहानपणी काढलेला होता, एक कॉलेजमध्ये असताना, एक हॅट घातलेला आणि एक जेलमध्ये.. यात भगतसिंहांचा ‘हॅट’ घातलेला फोटो प्रचंड प्रसिद्ध आहे. आजही सर्रास याच फोटोच्या लाखो प्रति आपण पाहतो. कित्येक टीशर्ट वर, पुस्तकांवर, बॅनर, पुतळे, फोटो आणि अजून कितीतरी गोष्टींवर हेच भगतसिंह आपल्याला दिसतात..

पण या फोटोच्या जन्माची कहाणी फार कमी जणांना माहीत आहे.

8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त या तरुण क्रांतिकारकांनी विधीमंडळात बाॅम्ब टाकुन ब्रिटीश सरकार हादरवून टाकलं. ‘पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट बिलच्या विरोधात या क्रांतीकारकांनी आवाज उठवला. ट्रेड डिस्प्युट बिलामुळे कायद्याने कामगारांना संप, हरताळपासुन दुर ठेवता येणार होतं, तर पब्लिक सेफ्टी बिलामुळे आंदोलनांवर मर्यादा आणून त्यावर बंदी घालणे शक्य होणार होते.

याच्या विरोधात आवाज उठवला पाहीजे, निषेध केला पाहिजे या भावनेने हे 2 तरुण असेंब्लीमध्ये पोहोचले.

11 वाजता कामकाज सुरु झालं. दोन्ही बिलावर चर्चा सुरू झाली. मतदान घेण्यात आले आणि संपूर्ण मतदान या दोन्ही बिलांच्या ठरावाविरोधात पडले. यावेळी असेंब्ली अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल होते. ही सगळी गडबड सुरू असतानाच भगतसिंहांनी दर्शक गॅलरीमधून असेंब्लीच्या बरोबर मधल्या बाजूस, रिकाम्या ठिकाणी बॉम्ब फेकला. सोबतच, HSRA ची पत्रके हवेत भिरकावली.. जोरजोरात घोषणा सुरू झाल्या,

‘इन्कलाब जिंदाबाद. साम्राज्यवाद मुर्दाबाद..’

सारी असेंब्ली हादरली.. या बॉम्बच्या आवाजाने इंग्लंडपर्यंत कानठळ्या बसल्या. दोन्ही क्रांतीकारकांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. तिथे राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा देण्यास कारागृहात टाळाटाळ होत आहे, कसल्याही प्रकारे माणसासारखी वागणूक मिळत नाही हे दृश्य पाहून भगतसिंह उपोषणाला बसले. बटुकेश्वर दत्त यांनीसुद्धा त्यांची साथ दिली.

या उपोषणाची फार जोरदार चर्चा साऱ्या भारतात होऊ लागली. याचदरम्यान एक पत्रक छापण्यात आले. ज्यामध्ये भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त या दोघांचा फोटो छापण्यात आला होता. याच पत्रकावर भगतसिंहांनी हॅट घातलेला फोटो पहिल्यांदा प्रकाशित झाला.

‘देशाच्या सन्मानासाठी मरेपर्यंत उपोषण’ अशी हेडलाईन या पत्रकावर देण्यात आली होती.

लाहोरच्या ‘राष्ट्रीय छापखान्यामध्ये’ ही पत्रके छापण्यात आली. भगतसिंहांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी हे पत्रक 6 जून 1929 रोजी कोर्टात वाचून दाखवले.

3 एप्रिल रोजी काश्मीर गेट येथील रामनाथ फोटोग्राफरच्या प्रेसमध्ये भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त गेले होते. तिथे भगतसिंहांनी स्वता हे फोटो काढून घेतले. 8 एप्रिल रोजी असेंब्लीमध्ये घडणाऱ्या घटनेनंतर जेव्हा या दोन्ही क्रांतिकारकांना न्यायालयात नेण्यात येईल आणि प्रेससमोर मुलाखत देण्याचा प्रसंग येईल तेव्हा ह्या फोटोंचा वापर करता यावा, प्रेसला फोटो देता यावे, हा भगतसिंहांचा विचार होता.

या फोटोमध्ये भगतसिंहांनी घातलेल्या त्या जगप्रसिद्द हॅटचे तपशील आपल्याला ‘Lahore Conspiracy Case’ च्या proceedings मध्ये पाहायला मिळतात. ते वर्णन असे,

‘भगतसिंहाच्या डोक्यावर असलेली हॅट ही काहीशी हिरवट-बदामी रंगाची, इटली इथे तयार केलेली आहे. ती हॅट भगतसिंहाने लाहोर येथील अनारकली बाजारात असणाऱ्या ‘अगरवाल ब्रदर्स’ या दुकानातून विकत घेतली.’

या फोटोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भगतसिंहांच्या कोणत्याही बातम्या प्रकाशित करत असताना हाच फोटो सर्वत्र वापरला जाई. 25 मार्च 1931 रोजी ‘The Tribune’ ने भगतसिंहांच्या हौतात्म्याची बातमी पहिल्या पानावर छापली होती. त्याही बातमीसाठी हाच फोटो वापरण्यात आला. एवढेच नव्हे, तर भगतसिंहाचा हा फोटो त्यांची आई वीरमाता विद्यावती देवी यांच्याकडे अखेरपर्यंत होता.

या फोटोला 92 वर्ष पूर्ण झाले. भगतसिंहांनी आवर्जून काढून घेतलेला हा फोटो अजरामर आहे. क्रांतीचे प्रतीक आहे.. एवढ्या प्रचंड प्रेरणादायी फोटोची ही छोटीशी गोष्ट..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.