भगतसिंगांनी आपल्या भावांना लिहिलेली अखेरची पत्रे प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत
भगतसिंह विचारवंत म्हणून, राजकारणी म्हणून, देशप्रेमी म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, एक लेखक म्हणून, कॉम्रेड म्हणून, जबरदस्त क्रांतिकारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे.. पण एक आदर्श मुलगा, मोठा भाऊ म्हणून आपण त्याला कितपत ओळखतो? आज भगतसिंहांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या एका भावनिक बाजूचा घेतलेला हा आढावा..
आपल्या दोन लहान भावांना, कुलबीर आणि कुलतार सिंह यांना, 3 मार्च 1931 रोजी त्याने पत्र लिहीले. भगतसिंहाने आजवर जे काही लिहीले, त्यामध्ये या दोन पत्रांना (माझ्यादृष्टीने तरी) विशेष स्थान आहे.
कुलबीर सिंह यांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंह म्हणतो,
“मी कुणासाठी काही केले नाही. तुझ्यासाठीही नाही.आणि आता तुम्हाला संकटात टाकून जात आहे. तुझ्या आयुष्याचे काय होईल? दिवस कसे काढाल? याचा विचार केला तर थरकाप उडतो. पण माझ्या भावा, हिम्मत ठेव. संकटात कधीही घाबरून जाऊ नको.”
ज्या तरुणामागे सारा भारत उभा होता, ज्याच्या एका शब्दावर देशाचे राजकारण बदलले असते, तत्कालीन भारतात तयार झालेला सर्वशक्तिमान आणि सर्वात हुशार व्यक्ती ‘भगतसिंह’ जेव्हा आपल्या लहान भावाला सांगतोय, “भाई हौसला रखना, मुसीबत में कभी मत घबराना”.. काय हिम्मत आली असेल हे वाचून?
भगतसिंहाचे वाचन अफाट होते. फासावर चढेपर्यंत पुस्तक वाचणारा भगतसिंह साऱ्या जगाला माहीत आहे. पण, आपल्या पश्चात भावांचे शिक्षण व्यवस्थित होईल की नाही, या काळजीने चिंतातुर झालेला ‘मोठा भाऊ’ आपल्या दृष्टीआड गेलाय. ‘कुलतारच्या शिक्षणाची काळजीही तूच घ्यायला हवीस. मला फार शरम वाटते पण दुःख करण्याखेरीज मी काय करू शकतो.’ एकाच वेळी आई, वडील, आपल्या लहान भावांचे शिक्षण, बाजूच्या कोठडीत असलेला मित्र, देशाचे स्वातंत्र्य, कष्टकरी शेतकरी जनतेचे प्रश्न, देशाचे भविष्य आणि फासावर जाण्याचा आनंद.. हे पत्र लिहीताना त्याच्या मनात नेमके किती विचार सुरू असतील, याचा अंदाजसुद्धा बांधता येत नाहीये.. कदाचित अजून तो पूर्ण समजला नसावा..
भगतसिंह लिहीतो,
“अमेरिकेला जाऊ शकला असतास तर फार चांगले झाले असते, पण आता तेही अशक्य दिसते. हळूहळू मेहनत घेऊन शिकत जा. काही काम शिकून घेता आले तर चांगलेच.”
पुढे तो लिहीतो,
“मला हे माहीत आहे, की तुमच्या मनात दुःखाचा महासागर उसळला आहे. माझ्या भावा, विचाराने माझेही डोळे भरून आले आहेत. पण काय करू शकतो! हिमतीने जगा.”
देशस्वातंत्र्यासाठी भावनिक होणारा भगतसिंह आम्ही पाहीलाय.. पण कुटुंबाचा कर्तापुरुष म्हणून त्याला समजून घेण्यात आम्ही कमी पडलो.
आपल्यामागे परिवाराचे काय होईल, याची काळजी त्याला नक्कीच वाटली असणार.. जे काही कराल, ते वडिलांच्या सल्ल्यानेच करा. एकत्र रहा.. असा सल्ला देणारा भगतसिंह पाहीला की त्याची आजवर उभी राहिलेली प्रतिमा क्षणात कोसळते आणि घरातल्या आशाअपेक्षांचे ओझे बाळगणारा, भविष्याची चिंता करणारा आणि भावांची जबाबदारी घेणारा ‘भाई’ समोर उभा राहतो..
“हे जग निष्ठुर आहे. फार कोडगे आहे. सर्व लोक फार निर्दयी आहेत. केवळ प्रेम आणि हिमतीच्या जोरावरच जगता येईल.”
या जगात राहायचं कसं, हे केवळ दोनच ओळींमध्ये त्याने सांगितलंय.. हा संदेश फक्त कुलबीर किंवा कुलतारसिंहासाठी नाहीये, आपल्यासाठीसुद्धा आहे असेच वाटते.
वयाच्या 23 व्या वर्षी फासावर जाणाऱ्या तरुणाने असं किती जग बघितलं असेल?‘ मेरे अजीज, मेरे बहुत बहुत प्यारे भाई, जिंदगी बडी सख्त है और दुनिया बडी बे-मुरव्वत.. सिर्फ मुहब्बत और हौसले से ही गुजारा हो सकेगा..’ हा मंत्र आयुष्यभर लक्षात ठेवा. या जगात जगायचं असेल तर त्याची ओळख असायलाच हवी.. भगतसिंहाने त्याच्या तमाम लहान भावांना दिलेला हा सल्ला आहे..
कुलतार सिंहांना लिहीलेल्या पत्रात पहिलेच वाक्य मनाला पोखरून जाते,
“तुम्हारे आंसू मुझसे सहन नहीं होते..”
पुढे तो लिहीतो,
“भल्या मुला, हिमतीने शिक्षण पूर्ण कर आणि तब्येतीची काळजी घे. हिम्मत सोडू नको.”
कुलतारला लिहिलेले पत्र माझ्या सर्वात आवडीचे पत्र आहे.. या पत्रात जेवढी प्रेरणा, जेवढी ऊर्जा आणि हिंमत मिळते, ती भगतसिंहाच्या इतर लिखाणात आढळून येणार नाही. अर्थात, त्याच्या तोंडून बाहेर पडलेला ‘इन्कलाब जिंदाबाद’ हा शब्दसुद्धा प्रचंड प्रेरणादायी आहे.. परंतू, आपल्या लहान भावाला लिहिलेले हे पत्र म्हणजे प्रेम, हिंमत, त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक आहे..
“उसे यह फिक्र है हरदम नया तर्जे जफा क्या है,
हमे यह शौक है देखे सितम की इन्तहा क्या है ।
दहर से क्यो खफा रहे, चर्ख का क्यों गिला करे,
सारा जहा अदू सही, आओ मुकाबला करे ।”
“कोई दम का मेहमान हु ऐ अहले-महफ़िल,
चरागे-सहर हूं बुझा चाहता हूं ।
हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली,
ये मुश्ते-खाक है फानी, रहे रहे ना रहे।”
काळजाला घर पडणाऱ्या ओळी लिहून भगतसिंह पुढे म्हणतो,
“अच्छा रुखस्त । खुश रहो अहले-वतन, हम तो सफर करते है । हिम्मत से रहना ।”
जेव्हा लहानग्या कुलतारसिंहाच्या हाती हे पत्र पडले असेल आणि “खुश रहो अहले-वतन, हम तो सफर करते है..” हे वाक्य वाचून त्यांची काय परिस्थिती झाली असेल. फक्त 20 दिवसांनी आपला मोठा भाऊ फासावर जातोय.. जाताना त्याला आपली काळजी वाटतेय, आपल्या शिक्षणाची काळजी वाटतेय.. किती मोठी भावना आहे ही! जग कसे आहे आणि तुम्ही कसं राहायचं, हे तो शिकवून जातोय. मरणाच्या दारावर उभा असताना सुद्धा जबाबदारीचे भान राखून आपल्या लहान भावांना तो मार्गदर्शन करतोय. मरणाची चाहूल ऐकून सैरभैर होणाऱ्यांच्या गर्दीत निश्चल पहाडासारखा शांतपणे उभा राहायला या 23 वर्षाच्या पोरात हिम्मत येते कुठून?
वर आपल्यालाच सांगून जातोय,
“हिम्मत से रहना..”
- केतन पुरी
हे ही वाच भिडू.
- तेव्हापासून भगतसिंहांशी कुस्तीला भिडायला इतर क्रांतिकारक देखील घाबरायचे..
- भगतसिंगांच्या आई म्हणाल्या, तुला बघून माझा मुलगाचं परत आल्यासारखं वाटतंय
- फासावर जाण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भगतसिंह पुस्तकच वाचत होते..