कोर्टात स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, तरी भगतसिंह गंमतीने म्हणाले, “मेरे रसगुल्ले कहां है?”

भगतसिंह दुधाचे निस्सीम चाहते. दुधापासून बनवलेल्या गोष्टी त्यांना भयंकर आवडत. त्यांच्या घरीच दुभत्या जनावरांची रेलचेल असल्यामुळे दूध, दही, ताक, तूप यांसारख्या गोष्टींवरच त्यांचे शरीर वाढले होते. भगतसिंहांना रसगुल्ले सुद्धा प्रचंड आवडत. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान किंवा कारागृहात कधी भेटीसाठी कुणी येणार असेल, काही सामान पाठवणार असेल तर भगतसिंह ‘रसगुल्ले’ आवर्जून आणायला सांगत.

एकदा तर त्यांना स्ट्रेचरवरून कोर्टामध्ये आणण्यात आलं. वाटेत त्यांची गाठ ‘राजारामशास्त्री’ यांच्याशी पडली. हे राजारामशास्त्री ‘द्वारकादास लायब्ररी’ चे ग्रंथपाल. या सर्व तरुण क्रांतिकारकांना पुस्तकांची रसद इथूनच मिळत असे. भगतसिंहांच्या शरीराचे झालेले हाल पाहून त्यांना धक्का बसला पण राजाराम शास्त्रींना पाहताक्षणी भगतसिंह म्हणाले,

“मेरे रसगुल्ले किधर है?”….

दुधासाठीसुद्धा भगतसिंहांचे प्रेम असेच होते. गजाननराव पोतदार यांनी या सर्व तरुणांची जेवण्याची सोय एका हलवाईकडे केली होती. तो हलवाई एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे सगळे त्याला ‘काणू हलवाई’ म्हणत. त्या काणू हलवाई कडे सगळेच चांगलं मोठा पेला भरून दूध पीत. पण भगतसिंहांची दूध पिण्याची पद्धत वेगळी होती. ते थेट दुधाचे पातेलं तोंडाला लावायचे आणि सगळं दूध संपवून टाकायचे. गरमागरम वाफाळलेल दूध प्यायला त्यांना आवडत असे. त्यांच्या या सवयीमुळे भगतसिंह काणू हलवाईच्या चांगलेच लक्षात राहिले.

असेंम्बली बॉम्बच्या घटनेनंतरचा हा किस्सा. गजाननराव पोतदार सर्व क्रांतिकारकांची उधारी चुकवण्यासाठी त्या हलवाईकडे गेले होते. त्यांना पाहून काणू हलवाई खुश झाला. त्याने गजाननरावांना हात जोडले आणि म्हणाला,

“तुमच्यामुळे मला ब्रम्हा, विष्णू, महेशाचे दर्शन झाले. जे लोकांना दोन डोळ्यांनी दिसलं नाही, ते मी एका डोळ्याने पाहिलं.. मला चार धामांचे दर्शन झाले आणि तुम्ही उधारीच्या गोष्टी करताय?”

असेंम्बलीमध्ये झालेल्या घटनेनंतर वृत्तपत्रांमध्ये भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांचे फोटो छापून आले होते. ते काणू हलवाईने पाहीले होते. एवढ्या मोठ्या क्रांतीकारकांना आपण जेवू घातले, याचेच समाधान त्याला होते. भगतसिंहांची १८० रुपये उधारी असलेलं पान त्याने फाडून टाकले आणि गजाननरावांकडून केवळ चार रुपये उधारी घेतली.

याच गजाननराव पोतदारांच्या आठवणीतला एक रोचक किस्सा. एकदा ग्वाल्हेर येथे असताना काही कारणांसाठी गजाननराव पोतदार आणि भगवानदास माहौर बाहेर पडले होते. भगतसिंह एकटेच त्यांच्या खोलीवर बसून होते. त्यांचा अज्ञातवास सुरू असल्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते. इकडे गजाननरावांना यायला उशीर झाला, इकडे भगतसिंहांना प्रचंड भूक लागली होती. बरीचशी उचकपाचक केल्यानंतर त्यांना चहापत्ती सापडली. पण चहा करायचा कसा? या आधी ना त्यांनी कधी चहा बनवला होता, ना चहा पिला होता. त्यामुळे चहा कसा तयार करावा, त्याची चव कशी असते या गोष्टीविषयी त्यांना काहीही कल्पना नव्हती. भूक तर प्रचंड लागलेली.

त्यांनी एका पातेल्यात पाणी घेतलं, त्यात चहापत्ती टाकली, पाणी उकळू दिलं. जसा पाण्याचा रंग बदलला तसं ते पाणी फेकून दिलं आणि चहापत्तीमध्ये तेल टाकून त्याला तडका दिला. आणि तडका दिलेली ती चहापत्ती त्यांनी खाल्ली..

इकडे गजाननराव आणि भगवानदास माहौर काही वेळाने रूमवर परतले. ते आल्या आल्या भगतसिंह गरजले, “असले बेचव पदार्थ तुम्ही खाऊच कसे शकता?”
गजाननरावांना जेव्हा सगळा किस्सा समजला तेव्हा ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले,
“अरे भल्या माणसा.. जी गोष्ट फेकून द्यायची होती त्याला तू तेलाची फोडणी देऊन खालीस आणि जे उकळत पाणी प्यायचं होतंस ते तू फेकून दिलेस.. मग तुला कशी चव लागणार?..”

पण भगतसिंहांनी कधीच चहा पिलेला नसल्यामुळे त्यांना हा अनुभवच नवीन होता..

भगतसिंह खाण्यापिण्याचे प्रचंड शौकीन होते. दूध, दही, ताक, लस्सी, रसगुल्ले यांच्यासाठी असलेले त्यांचे प्रेम हे जगजाहीर होते.. त्यांनी काही काळ दुधाची डेरीसुद्धा चालवली होती. असे होते आपले क्रांतिकारक..

  • भिडू केतन पुरी

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.