तेव्हापासून भगतसिंहांशी कुस्तीला भिडायला इतर क्रांतिकारक देखील घाबरायचे..

विश्वनाथ वैशमपायन, भगवानदास माहौर आणि शिव वर्मा या तीन क्रांतिकारी मित्रांनी भारत स्वतंत्र झाल्यावर अनेक पुस्तके लिहिली. ही पुस्तके म्हणजे क्रांतिकारकांच्या आयुष्यात झालेल्या एकूण एक घडामोडींचे जिवंत चित्रणच आपण म्हणू शकतो. या सर्वांनी बराच काळ भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवतीचरण व्होरा इ. क्रांतिकारकांसोबत काढला.

हे तिन्ही लेखक ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ चे सदस्य होते, त्यामुळे या सर्वांचा एक परिवार होता. आपण आयुष्यात पहिल्यांदा भगतसिंहाला कसे भेटलो आणि त्यादिवशी नेमके काय घडले, हे भगवानदास माहौर यांनी लिहून ठेवले आहे. 

एके दिवशी विश्वनाथ वैशमपायन आणि भगवानदास माहौर दोघे आग्रा येथे पोचले. आग्ऱ्यात मूहल्ला नुरी दरवाज्याजवळ क्रांतिकारकांचा तळ पडला होता. या दोघांना रात्री पोचण्यास उशीर झाला. विश्वनाथांनी दरवाजा वाजवला, तो हळूच उघडला गेला आणि भगवानदास घाबरले. त्यांच्याच रोखाने बंदुकीची नळी पकडून एक तरुण उभा होता. 

विश्वनाथांनी त्या तरुणाची ओळख करून दिली, “हे साथी रणजित..” 

त्यांच्या या वाक्याने भगवानदासांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपल्याकडे सावध दृष्टीने पाहणारा सुदृढ शरीराचा हा उंचापुरा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून ‘भगतसिंह’ आहे, हे त्यांना समजले. पार्टीमध्ये सर्वांची टोपणनावे होती. भगतसिंह यांना ‘रणजित’ या नावाने सर्व जण संबोधित करत. या जोडीला आग्र्याला पोचायला रात्रीचे अकरा वाजले होते. त्यांनी आपले पावसामुळे भिजलेले कपडे बदलले आणि पेलर जमिनीवर टाकून, अंगावर धोतर ओढून झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भगवानदासांनी पाहिले की भगतसिंह, विजयकुमार सिन्हा आणि सुखदेव एकमेकांशी बोलत होते, मध्येच भगवानदासांकडे पाहत आणि परत काहीतरी खुसफूस करत. थोडं लक्षपूर्वक ऐकल्यावर त्यांना भगतसिंहाने उच्चारलेले एक वाक्य ऐकू आले,

“बहुतेक डार्विन बरोबर होता. माकड आणि मनुष्यातली हरवलेली कडी हाच व्यक्ती असू शकतो..”

हे वाक्य ऐकताच विजयकुमार मोठमोठ्याने हसू लागले. तेव्हा भगवानदासांना  समजले की हे सर्वजण त्यांची चेष्टा करत आहेत. पण विजयकुमार यांचे हसणे पाहून भगतसिंहांनी मुद्दाम गंभीरतेचा आव आणला आणि भगवानदासांना जवळ बोलावले. त्यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली.

संघटनेच्या नियमानुसार भगवानदासांचे नामकरण झाले. त्यांना ‘कैलास’ हे नवीन नाव मिळाले.

थोड्यावेळाने अंघोळीला जाण्याच्या आधी भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद एकमेकांवर आपल्या ताकदीचा जोर आजमावत होते. सर्वजन जमा झाले. हळू-हळू दोघांमधली कुस्ती रंगात आली. कधी भगतसिंह वरचढ होत होते तर कधी आझाद आपल्या ताकदीने भगतसिंहांचे डाव हाणून पाडत होते.. दोघेपण आपापली ताकद लाऊन एकमेकांना आव्हान देत होते आणि पाहता पाहता भगतसिंहांनी आझादांना हातांच्या सहाय्याने हवेत उचलले आणि जमिनीवर जोरात पटकले. आझादांच्या गुडघ्याचे सालटे निघाले होते.

HSRA मधल्या सर्वात ताकदवर समजल्या जाणाऱ्या आझादांना भगतसिंहांनी आपल्या बाहुतले बळ दाखवल्यामुळे सर्वांनाच भगतसिंहांच्या ताकदीची प्रचिती आली.

हा प्रसंग ज्यांनी पाहीला, त्यापैकी एक भगवानदास माहौर यांनी लिहून ठेवले होते,

‘आझादांना हवेत उचलून जमिनीवर आपटने हे काही साधारण काम नव्हे. आझादांना सर्वजन ‘पोलादी शरीराचा क्रांतिकारक’ म्हणत. त्या क्षणापासून भगतसिंहांच्या ताकदीचा धाक माझ्या मनावर बसला. भगतसिंह यांनी कित्येकदा माझ्याशी आणि सदाशिव अमलापुरकर यांच्याशी पंजा लढवन्याची तयारी दाखवली. पण भगतसिंह कधीच ना माझ्याबरोबर जिंकू शकले ना सदाशिव अमलापुरकर यांच्यासोबत….

कधी कधी माझी आणि भगतसिंहांची हातापाई व्हायची पण त्यांना थेट भिडण्याचे साहस मला कधीही झाले नाही. त्यांच्या ताकदीचा धाक अखेरपर्यंत माझ्यासोबत राहीला.’

20-22 वर्षांचे क्रांतीच्या ध्येयाने झपाटलेल्या क्रांतिकारकांची ही अपरिचीत आणि मैत्रीमधल्या गोड जिव्हाळ्याची बाजू बघितल्यावर त्यांच्या मैत्रीचा आपल्यालाही हेवा वाटल्यावाचून राहात नाही..!!

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.