भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार, पण हे पहिल्यांदा होत नाहीए..
पाच राज्यांमध्ये उडालेल्या निवडणुकांचा धुराळा अखेर काल जाहीररीत्या संपला. हरलेल्यांनी कुठे प्रयत्न न सोडण्याचे, विजयींना शुभेच्छेचे उद्गार हाकले तर विजयींनी वाजत गाजत जंगी पद्धतीने आनंद साजरा केला. पण पाचही राज्यांमध्ये चर्चा राहिली ती पंजाबच्या विजयाची. पंजाबच्या निवडणुकीचं चित्र सगळ्यात पहिले क्लीअर झालं होतं आणि आम आदमीने विरोधकांच्या नाकावर टिच्चून सत्ता स्थापन केल्याचं दिसलं.
पंजाबमध्ये आपच्या या तुफान विजयाचा चेहरा म्हणजे भगवंत मान.
एका छोट्या दुकानात मोबाईल दुरूस्त करणाऱ्या मेकॅनिक मुलानं पंजाबच्या मुख्यमंत्र्याला हरवलं. आम आदमी पक्षाच्या या खऱ्याखुऱ्या आम आदमीने जो ठासून विजय पताका फडकवलाय त्यामुळे ते पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्टच झालंय.
भगवंत मान यांनी आज ११ मार्चला शपथविधीबाबत घोषणा केलीये.
भगवंत मान इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे राजभवनात नाही तर शहीद भगतसिंग यांचं जन्मस्थान ‘खटकर कलान’ या गावात शपथ घेणार आहेत. त्यामुळे भगवंत मान यांच्या या निर्णयाला एक क्रांतिकारक पाऊल म्हणून संबोधलं जातंय.
मात्र भगवंत मान हे काही पहिलेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाही ज्यांनी असा निर्णय घेतलाय.
भारतीय राजकारणाचा इतिहास बघितला तर ‘रघुबर दास’ हे नाव पुढे येतं, ज्यांनी असाच राजभवना व्यतिरिक्त इतर ठिकाणी शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता. रघुबर दास हे झारखंडचे १० मुख्यमंत्री होते ज्यांनी २०१४ मध्ये बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियममध्ये शपथ घेतली होती. आदिवासी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या बिरसा मुंडा या क्रांतिकारकाप्रती मानवंदना म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता.
त्यांच्या धर्तीवर आता भगवंत मान यांचा निर्णय कसा महत्त्वाचा आहे, हे बघूच मात्र त्याआधी या निर्णयामुळे चर्चेत आलेल्या
खटकर कलान गावाचा थोडा इतिहास बघू…
खटकर कलान हे एक ऐतिहासिक गाव आहे ज्याला सरदार किशन सिंग, सरदार अजित सिंग, सरदार स्वरण सिंग, शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांसारख्या प्रसिद्ध देशभक्त आणि स्वातंत्र्यसैनिकांचं गाव होण्याचा मान मिळाला आहे. यातील सरदार अजित सिंग यांनी या गावाचं नाव कसं पडलं याचा इतिहास सांगितलाय.
हे ठिकाण आधी ‘किल्ला’ म्हणून ओळखलं जायचं. त्याचा संबंध एका सरंजामदाराशी होता.
अजित सिंगांच्या पूर्वजांपैकी एकाने मुघल काळात लाहोर जिल्ह्यातील ‘नारळी’ गावातून हरिद्वारला जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबातील मृत व्यक्तीची राख त्यांना गंगेत विसर्जित करायची होती. प्रवास लांबचा होता. तेव्हा त्यांनी वाटेत किल्ल्यात आश्रय घेतला. किल्ल्याचा मालक दयाळू मनाचा होता. त्याने त्या अनोळखी माणसाचं स्वागत केलं, त्याच्या कुटुंबासोबत जेवायला बोलावलं.
किल्ल्याच्या मालकाला एक पत्नी आणि मुलगी होती. ती मुलगी या अनोळखी तरुणाकडे आकर्षित झाली आणि त्याच्याशी लग्नाची इच्छा आपल्या वडिलांकडे व्यक्त केली. तरुणाला देखील मुलगी पसंत होती. तेव्हा त्याने लग्नाला संमती दर्शवली. मात्र लग्नाआधी ज्या कामासाठी तो निघाला होता ते पूर्ण करण्याची अट घातली. त्यानुसार अस्थि विसर्जनासाठी तरुण हरिद्वारला निघून गेला.
तो तरुण परत येईपर्यंत किल्ल्याच्या मालकाने संपूर्ण घर सजवलं होतं. मोठ्या राजेशाही थाटात लग्न पार पडलं. लग्नात भेट म्हणून किल्ल्याच्या मालकाने राहतं घर आपल्या जावयाला दिलं. जावई आणि मुलीने नवीन संसार त्या किल्ल्यात सुरु केला, तेव्हा त्याला ‘खटकर कलान’ असं नाव दिलं.
गावात अजूनही घरं होती मात्र सगळ्यात मोठा बंगला असल्याने आधीही किल्ल्यावरूनच संपूर्ण गावाला संबोधलं जायचं. तेव्हा त्याचं नामांतर केल्यानंतर संपूर्ण गाव नव्याने खटकर कलान म्हणून ओळखलं जाऊ लागलं, जे नंतर कधीच बदललं नाही आणि आजही कायम आहे. याच गावात भगतसिंगांचा जन्म झाला होता.
भगतसिंग मान यांच्या प्रचारात कसे महत्त्वाचे ठरले?
भगतसिंगांचं गाव म्हणजे पंजाबी लोकांचं श्रध्दास्थान आणि थेट त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा विषय. पंजाबच्या जनतेत भगतसिंगांसाठी खूप विशिष्ट स्थान आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्या बलिदानाचा आदर्श नेहमी दिला जातो. तेव्हा भगवंत मान यांनी त्यांचाच आदर्श पुढे ठेवत निवडणूक लढवली. मान यांच्या भाषणात हुतात्मांचा उल्लेख आणि त्यांनी परिधान केलेली ‘पिवळी पगडी’ याकडे त्यांनी शहीदांना दिलेलं निष्ठेचं वचन आणि शेतकरी आंदोलकांचं प्रतीक म्हणून बघितलं गेलं.
हीच स्ट्रॅटेजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ओळखली.
राज्यातील त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खटकर कलानला केजरीवालांनी नियमित भेट दिली. ज्याचा परिणाम म्हणजे कालांतराने भगतसिंग प्रतीकवादानं सापेक्ष जागा पक्षात घेतली.
२०१४ च्या निवडणुकीत ‘आप’च्या स्वराज अभियानापासून राज्यात भगतसिंग यांच्याबद्दल उत्सुकता वाढीस लागली. त्यापाठोपाठ २०१५ मध्ये, सर्व प्रमुख पक्षांनी २३ मार्च रोजी खटकर कलान इथे एकत्र येऊन वैयक्तिक रॅल्या काढल्या. भगतसिंगांचं प्रतीक म्हणून भगवंत मान यांनी उत्साहानं पिवळी पगडी धारण करत ‘पिवळ्या भगतसिंग पगड्या’ पुन्हा प्रचलित केल्या होत्या.
कॉंग्रेसनं जसं गांधींना, शिवसेनेनं बाळासाहेबांना वोटिंग कार्ड केलंय तसंच पंजाबमध्ये भगतसिंगांना वोटिंग कार्ड बनवलं गेल्याचं दिसतंय, असं बोललं जातंय. आता निवडून आल्यानंतर सरकारी कार्यालयात आंबेडकर आणि भगतसिंग यांचं चित्र लावण्याच्या आश्वासनांसह, भगवंत मान यांनी शपथविधी सोहळ्याची घोषणा केली आहे. त्यातही ती भगतसिंगांच्या गावात होणार आहे.
भगवंत मान यांनी या गावात शपथ घेण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्या संपूर्ण प्रचारात त्यांनी भगतसिंगांना पुढे ठेवलं. संपूर्ण निवडणूक ज्यांना समोर ठेवून लढवली, ज्यांच्या विचारांना आणि उद्देशाला पूर्ण करण्याची आश्वासनं दिली गेली, ती पूर्ण करून दाखवण्याची संधी आता भगवंत मान यांना लाभली आहे. तेव्हा त्याची सुरुवात खटकर कलान गावातून करण्याचा भगवंत मान यांचा मानस बरंच काही सांगताना दिसतोय, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
आजवर अनेक पक्षांनी ब्रँड म्हणून कोणत्यातरी व्यक्तीचा वापर केल्याचं दिसलंच आहे. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कधी संबंधित व्यक्तिमत्वांशी जोडलेल्या गोष्टींवरून कार्याची सुरुवात केल्याचं दिसलेलं नाहीये. म्हणूनच भगवंत मान यांच्या शपथविधीच्या निर्णयाचं कौतुक केलं जातंय. त्यांचा आजचा निर्णय पुढील राजकारणातील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणार, असे तर्क लावले जाताय.
प्रतिकात्मक आहे पण महत्त्वाचं आहे, अशा दृष्टीकोनातून या निर्णयाकडे पाहिलं जातंय.
हे ही वाच भिडू :
- एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये ‘आप’नं वापरलेली स्ट्रॅटेजी सक्सेसफुल होताना दिसतिये
- भगतसिंग सारखं जगणं आणि चे गव्हेरा सारखं मरण हवं असणारा चंद्रशेखर प्रसाद…
- स्वतःला स्वीट आतंकवादी म्हणवणारे केजरीवाल खलिस्तानचं समर्थन करतायेत का ?