आपल्याकडे पण “स्टॅडअप कॉमेडियन” मुख्यमंत्री होतायत…!!!
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे पूर्वी स्टॅण्डअप कॉमेडी करायचे. त्यातून ते प्रसिद्ध झाले राजकारणात आले आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झाले. आपल्या भारताबद्दल बोलायचं झालं तर इथं उलट आहे. इथं लोकं पहिला राजकारण करतात. मग स्टॅण्डअप कॉमेडीला सुरवात करतात.
असो, तर विषय तो नाही. विषय आहे पंजाबच्या निकालांचा. आत्ता पंजाबमध्ये आप आल्यातच जमा झालय. ११७ जागांपैकी ९० हून अधिक जागेवर आप आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यात जमा आहे. आत्ता मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू होईल. आपने पूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांना हा मान दिला आहे..
तर हे भावी मुख्यमंत्री भगवंत मान कोण आहेत? कसे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे हेच पहायला लागतय.
भगवंत मान हे पंजाबचे आप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा. आप पक्षाचे सर्वात लोकप्रिय.
भगवंत मान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा संगरूरमधून लोकसभेत पोहोचले होते. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला देशभरात लोकसभेची एकच जागा जिंकता आली होती आणि ती होती संगरूरची आणि उमेदवार होते भगवंत मान.
भगवंत मान यांच्या आधीच्या करियरवर नजर टाकली तर ते एक कॉमेडियन म्हणून फेमस होते
पटियालाच्या पंजाबी विद्यापीठातून त्यांनी इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकलीत होती. जगतार जग्गीसोबतचा त्यांचा पहिला कॉमेडी अल्बम खूप प्रसिद्ध झाला. दोघांनी मिळून कॅनडा आणि इंग्लंडमध्येही अनेक शो केले.
२००८ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्येही त्यांनी बरीच पॉप्युलॅरीटी मिळवलेली.
दरम्यान नंतर त्यांनी आपल्या या कॉमेडी करियरपासून दूर जात, २०११ मध्ये पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१२ मध्ये त्यांनी लहरगागा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला.
पुढे मार्च २०१४ मध्ये मान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि संगरूर लोकसभा मतदारसंघातून २७ हजारांहून अधिक मतांनी खासदारपदाची निवडणूक जिंकली.
पण कहानीत काहीतरी ट्विस्ट पाहीजे. तो ट्विस्ट येतो भगवंत मान यांच्या बाटलीप्रेमामुळे..
भगवंत मान यांचे दारू पिवून गोंधळ घालतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडायावर प्रसिद्ध आहेत. एकदा तर दारू पिवून संसदेत राडा केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला आहे.
त्यांच्या दारू पिऊन बोलतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि, संसदेत एका बिलावर चर्चा सुरु आहे. त्यावर आपलं मत मांडण्यासाठी सभागृहाचे अध्यक्ष मान यांना परवानगी देतात. पण मान यांनी त्या बिलावर बोलण्याऐवजी विषय भलतीकडेच वळवला.
त्यांनी भाषणात दिल्लीच्या कारभारचं आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं गुणगान गेला सुरुवात केली. यावरून अध्यक्षांनी त्यांना हटकलं सुद्धा, एवढच नाही तर विरोधी पक्षांनी त्यांचं मेडिकल टेस्ट करायला सांगितलं.
त्यांच्या दारूचे असे अनेक किस्से चर्चेत आहे. पण या सगळ्या घटनांमुळे पक्षाची होणारी बदनामी आणि पक्ष प्रमुखांचा दबाव त्यामुळे २०१९ साली जेव्हा निवडणुकी आल्या तेव्हा भगवंत मान यांनी दारू हात सुद्धा लावणार नाही अशी शपथ घेतली होती.
यावर स्वतः आम आदमी पक्षाचे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं होत. मीडियासमोर बोलताना केजरीवाल म्हणाले,
भगवंत मान यांचं पाहिलं करियर हे एक कॉमेडियन म्हणून होतं, ज्यात दारूची सवय लागतेच, ते सुद्धा दारू प्यायचे. पण आता त्यांनी पक्षाच्या सगळ्या नेत्यांसमोर आणि आपल्या आईसमोर दारू पिणार नाही अशी शपथ घेतलीये.
त्यांच्या या संकल्पावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांना टार्गेट सुद्धा केलं. कि निवडणुकीसाठी हा फक्त दिखावा आहे. पण त्यांनतर २ वर्षाच्या काळात त्यांचा दारू पिऊन बोलायच्या कोणत्या घटना तरी समोर आल्या नाहीत.
हे ही वाच भिडू :
- पंजाबातल्या युतीचं गणित बसलंय, शहरात भाजप तर गावात कॅप्टन
- चंदीगडमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या भांडणाचा फायदा ‘आप’नं घेतलाय
- युपीच्या निवडणुकीसाठी ‘आम आदमी पार्टी’ तिरंगा झेंडा घेऊन उतरलीय