योगीजी भाग्यनगरचा हा इतिहास तुम्हाला तर माहिती आहे का..?

जगात लय प्रश्न आहेत, पण आपले राजकारणी तिकडं लक्ष देत नसतेत. त्यांना नवं कायतरी लोकांच्या समोर टाकून मज्ज्या घेण्यात लय आनंद मिळत असावा. अशा गोष्टींमध्ये पहिला नंबर लागतो तो किरीट सोमय्या यांचा. त्यानंतर चंद्रकांत दादा. म्हणजे ही लोक रोज नवनवे विषय चर्चेला देत असतात. पण सध्याचा विषय देशाचा आहे. 

देशात नंबर काढायचा झाला तर निर्विवाद योगी आदित्यनाथ एक नंबरला येतील. आत्ता बघा सध्या पदवीधर सोडून देखील एक इलेक्शन चालू आहे. पदवीधरचा घोळ कालच बंद झाला पण हा घोळ इतक्यात थांबणारा नाही. 

तर इलेक्शन आहे हैद्राबादचं…

हैद्राबादच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचाराला येवून गेलेत. इतके मोठे नेते एका महानगरपालिकेच्या इलेक्शनला येत्यात म्हणजे समजून घ्या पक्ष कसा वाढवला जातो. नायतर तुम्ही आपलं टिका करत बसणार.. 

असो तर चार दिवसांपूर्वी योगीजी हैद्राबादमध्ये येवून गेले. तिथे ते म्हणाले हैद्राबादच भाग्यनगर करणार. त्यानंतर ओवेसी बोलले, करुन दाखवाच, शक्यच नाय. 

मग काय सोशल मिडीयावर हैद्राबाद की भाग्यनगरचा धुरळा उडला. भाजपची लोकं म्हणायला लागली योगी बरोबर आहेत. हैद्राबादच भाग्यनगर करायलाच पायजे. तर आपले सेक्युलर मंडळी बोलले करायला हरकत नाय पण भाग्यनगर बिर्याणी कसं वाटतं ते ऐकायला… 

या सगळ्या चर्चेत मुख्य मुद्दा बाजूला राहिला तो म्हणजे भाग्यनगरच का…? 

तर खूप खूप दिवसांपूर्वीची ही गोष्ट, याला ना इतिहास आहे ना कोणता संदर्भ. फक्त ऐकीव गोष्ट जी एखाद्या दंतकथेप्रमाणे पुढे पुढे येत गेली.. 

एका आटपाट शहरात एक मुलगी रहायची. दिसायला अत्यंत सुंदर वगैरे होती. बंजारा समाजाची ही मुलगी गाणी गावून आपलं पोट भरायची. एक दिवस ती अशीच नदीकिनारी गाणं म्हणत होती. तेव्हा तिथे शहजादा कुली कुतूबशहा आलेला. तो काळ कुतूबशाहीचा होता. शहजादा भागमतीच्या प्रेमात पडला. लव ॲट फर्स्ट साईट प्रमाणे. भागमती पण त्याच्या प्रेमात पडली. आत्ता एका शहजाद्याने एका सामान्य अतिसामान्य मुलीशी निकाह करणं ही अवघड गोष्ट होती. तरिही कुली कुतूबशहाने लोकांचा विरोध झेलून तिच्याशी निकाह केला. 

आत्ता ही भागमती ज्या भागात रहायची त्या भागाचं पुर्वीचं नाव होतं चिचलम. मुसी नदीच्या किनारी त्यांची भेट झाली होती. 

आत्ता स्टोरी अशी की या गोष्टीचा आधार घेवून शहजाद्याने या भागाचं नाव भागनगर किंवा भाग्यनगर ठेवल्याचं सांगितलं जातं. पण मॅटर असा आहे की भागमतीने निकाह करतानाच इस्लाम कबुल केलेला आणि तिचं नाव बेगम हैदरमहल झालं होतं. या नवीन नावावरून या भागाला हैद्राबाद अस नाव पडल्याचं देखील सांगितलं जातं. 

आत्ता या स्टोरीत काय काय घोळ आहेत, तर याला काहीही आधार नाही. इतिहासाचे अभ्यासक सांगतात अशा गोष्टी खऱ्या असतील किंवा खोट्या काय माहित. मुद्दा हा आहे की आपण किती मागं जाणार. 

आत्ता आजची बेगम हैदरमहल कालची भागमती होती. म्हणून भाग्यनगर म्हणायचं की हैद्राबाद हा प्रश्न आहे. बर ही गोष्ट खरी जरी असली तर तिने इस्लाम कबुल केलेला म्हणल्यानंतर नवीन नावानेच शहराला नाव मिळाले असेल.

हैद्राबादमध्ये भाग्यलक्ष्मीचं मंदीर देखील आहे.

हे मंदीर या मुस्लीम राजाने आपल्या बायकोसाठी म्हणजेच भागमती साठी बांधल्याचं सांगितलं जातं. पण पुन्हा तेच इथेही पुरावा वगैरे काही नाही. काहीजण इथे बाग होत्या म्हणून बागनगर म्हणायचे अस सांगतात. म्हणजे ही तिसरीच जमात पुढे येते, भाग्यनगर पण नाही अन् हैद्राबाद पण नाही थेट बागनगरच. 

आत्ता शेवटचा मुद्दा डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत इतिहास तज्ञ नरेंद्र लुथर भाग्यनगर नव्हतेच भागनगर होतं १५९१ च्या आसपास मिळतात त्याचे पुरावे मिळतात. हे चौथ नाव. 

थोडक्यात बागनगर, भाग्यनगर, भागनगर आणि हैद्राबाद ही वेगवेगळी नाव, भावांनो हे सगळं वाचून तुमच्या लक्षात आलं असेल शेक्सपियर का म्हणलेला नावात काय आहे…? 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.