केशवराव पंतप्रधानांना म्हणाले, “तुमच्या फोटोवर निवडून आलेलो नाही पदाला शोभेल असं बोला”

शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगेत्यांचं नाव जरी काढलं तरी त्यांची समस्त राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते.

मराठवाड्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजे भाई केशवराव धोंडगे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नांदेड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा पाया रोवणारे म्हणजे भाई केशवराव धोंडगे. आपल्या ६० वर्षांच्या दमदार राजकीय कारकिर्दीत आजतागायत पक्ष न बदलता ज्यांनी राजकारण दणाणून सोडलं. हो हे समजून घेण्यासाठी त्याकाळचा मराठवाड्याशी संबंधित संदर्भ पाहणं महत्वाचं आहे.

मराठवाड्यात काँग्रेस मोठी झाली ती शंकराव चव्हाण यांच्यामुळे. चव्हाण यांची प्रतिमा एक निष्णात राजकारणी म्हणून होती. पक्षाचे राजकारण मोठ्या नेटाने पुढे नेत त्यांनी शेतकरी कामगार पक्ष, पुढे जनता पक्षातील नेत्यांना देखील सोबत घेतले होते.

पण जिल्ह्यातील राजकारणात शंकरराव चव्हाण यांचे व त्यांचे कधीच जमले नाही. विशेषत: सिंचनाच्या मुद्द्यावरून तर त्यांचे खूप मतभेद होत असायचे.

१९६० ते १९९० अशी तीन दशके राज्यावर काँग्रेसचाच एकहाती वरचष्मा राहिला होता. कारण या काळात विरोधी पक्षांची विधानसभेतील सदस्यसंख्या १९७८ वगळता कधीही १०० च्या जवळपास गेलेली दिसत नाही. १९६० नंतर काँग्रेससाठी विरोधी पक्ष म्हणून शेकाप व कम्युनिस्ट पक्ष, काहीशी प्रजा समाजवादी पक्ष व पुढे जनता पक्ष समोर आले पण हे सगळे पक्ष काँग्रेसपुढे कमीच ताकदीचे होते

तरी देखील चव्हाण यांच्यासारख्या राजकारण निष्णात नेत्याने काँग्रेसला भविष्यात निर्माण होऊ शकणारे संभाव्य आव्हान १९६० पासूनच ओळखले होते.

काँग्रेसला आणखी एक आव्हान दिसत होते ते म्हणजे शेकापचे, हा पक्ष मजबूत न होऊ देण्याचे कारण या पक्षात बहुजन समाजातील नेत्यांचा पगडा होता. काही तालेवार मराठा या पक्षात होते. तसेच शेकापचे नेते अभ्यासू होते. केशवराव धोंडगे आणि उस्मानाबादचे भाई उद्धवराव पाटील हे तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी अत्यंत लायक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.  मग हेच आव्हान लक्षात घेऊन…

एकेक करुन शेकापचा नेता काँग्रेसमध्ये आणण्याची मोहीम ६० नंतर सुरू झाली. 

स्थानिक राजकारण, मतदारसंघाचा विकास आणि राजकीय भविष्य याचा विचार करूना काही नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना पुढे आवर्जून साखर कारखाने, मंत्रीपदे मिळाली. त्यात यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते पाटील आदींचा समावेश होता.

पण या दलबदलू वृत्तीला बळी न पडणाऱ्यांमध्ये अनेक मोठी नावे आहेत. त्यातलं मुख्य म्हणजे केशवराव धोंडगे तसेच केशवराव जेथे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, दाजीबा देसाई, एन. डी. पाटील, शेषराव देशमुख, नरसिंगराव देशमुख काटीकर, त्र्यं. सी. कारखानीस, शरद गव्हाणे, गणपतराव देशमुख, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, विठ्ठलराव हांडे. ही सगळी नावे शेतकरी कामगार पक्ष कसा होता हे समजण्यासाठी पुरेशी आहेत.

पण तरी देखील मोठ्या संख्येने नेते काँग्रेसमध्ये गेले आणि हळूहळू शेकापची झालेली पिछेहाट काँग्रेसला राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरली असेल पण राज्याच्या एकूणच समाजकारण आणि राजकारण यांच्यासाठी ती फार नुकसान करणारी होती. कारण शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्यासाठी सातत्याने संघर्ष करणारा पक्ष क्षीण होत गेला.

पण क्षीण होत असलेल्या पक्षाला जीवनदान देणारे भाई केशवराव होते…

हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा  सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले. 

१९५७ -१९६२-१९६७- १९७२- १९८५-१९९० असं सलग तब्बल सहा विधानसभा निवडणुका त्यांनी गाजवल्या आणि जिंकल्या.

मराठवाड्याच्या राजकारणात असं म्हणतात की, केशवराव काँग्रेस पक्षात गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते

भाई केशवराव स्वभावाने जितके शांत तितकेच ते बोलायला तिखट होते. कधी काय बोलतील सांगता येत नाही..  पण जे काही वागणूक असायची ती खरी आणि तितकीच स्पष्ट असायची. डायरेक्ट तोंडावर बोलणारे…मग समोरचा कुणीही का असेना. इतके परखड राजकारणी महाराष्ट्राने क्वचितच पाहिलेत. 

भर स्टेजवर शरद पवारांचा मुका घेणारे अन दुसऱ्याच मिनिटाला शरद पवारांवर टीका करणारे भाई केशवराव सर्वांनाच माहितीयेत. त्यांची टीका अशी होती की, शरद पवारांची बारामती हि भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदाच्या आहेत.

हे झालं अलीकडचं पण त्याही पेक्षा एक भारी किस्सा म्हणजे, जेंव्हा भाई केशवराव यांनी थेट पंतप्रधानांना सुनावलं होतं.

झालं असं की, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार मोरारजीभाई देसाईंना कापूस एकाधिकार योजनेसंदर्भात भेटायला गेले होते. तेंव्हा चर्चेच्या दरम्यान मोरारजीभाईंनी सर्व आमदारांना शहाणपणाचे बोला, दलाली करू नका, असे थेट सुनावले. 

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी महत्त्वाची योजना म्हणजे कापूस एकाधिकार योजना…या योजनासाठी विधान मंडळाच्या व्यासपीठावर ज्यांनी सर्वस्व पणाला लावले त्यात केशवराव धोंडगे आघाडीचे नेते. त्यांना शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा महत्वाचा होता. पण पंतप्रधानांच्या अशा थेट बोलण्याने केशवराव धोंडगे चांगलेच भडकले..आपल्या समोर पंतप्रधान आहेत आणि त्यांना काय बोलायचं अन काही नाही बोलायचं याचा विचारही त्यांनी केला नाही. 

त्यांनी थेट पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना ठणकावले. 

तेंव्हा भाई धोंडगे म्हणाले होते, ‘बळीराजाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहोत. माझ्या शूर मतदारांनी निवडून दिल्याने त्यांच्या कृपेने आलो आहोत. आमच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं, आम्ही काय तुमचे फोटो लावून विजयी झालेलो नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या पदाला शोभेल असे बोला’ असे सुनावल्याची आठवण अजूनही त्यांचे समर्थक सांगतात…

तर असे होते निडर आणि परखड व्यक्तिमत्व !

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.