केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते.
केशवराव म्हणजे मराठमोळा माणूस. कपाळावर मातीचा टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे अगदी शांत आणि चालतेबोलते व्यक्तिमत्व. हा पण एक गोष्ट त्यांची मोठीच डेंजर होती म्हणजे, कधी काय बोलतील सांगता यायचं नाही. कधी बोलता-बोलता नाचतील तर कधी थेट काळजाला लागेल असं तिखट बोलतील. पण जे काही वागणूक असायची ती खरी आणि तितकीच स्पष्ट असायची.
थोडक्यात सांगायचं तर केशवराव म्हणजे अगदी नितळ मनाचे. तुकारामांच्या गाथेमध्ये प्रत्येक शब्दाचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करणारे व्यक्तिमत्व.
छत्रपती शिवाजी महाराज, जीवा महाला यांचे चरित्र, कंधार तालुक्यातील चळवळ, गुराखी गड, शिवाजी मोफत शिक्षण संस्था, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्र. के . अत्रे हे व्यक्तिमत्वे ज्यावर ते भरभरून बोलत असत.
त्यांचा एक मुका जो आजही महाराष्ट्रातल्या जनतेला आठवणीत राहतो, तो म्हणजे…
नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीमध्ये ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून ठिकठिकाणी पवारांचे सत्कार झाले होते.अशाच एका सत्काराच्या कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी पवारांचा स्टेजवरच मुका घेतला होता. आता केशवराव धोंडगे यांचा स्वभावच मृदू आणि तितकाच हसता -खेळता आहे. आणि तितकाच परखड आणि स्पष्ट आणि त्याची प्रचीती याच कार्यक्रमात आलेली.
मुका घेतल्यानंतर लग्गेच धोंडगेंनी त्यांच्या भाषणात पवारांवर सडकून टीका केली होती. “शरद पवार हे बिना चीपड्याचे नारद आहेत. पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार कोणाच्या घरचा माणूस कसा फोडतील याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदही पवारांची बरोबरी करू शकत नाहीत”, अशा तिखट शब्दांमध्ये धोंडगेंनी पवारांवर तोंडसुख घेतलं होतं, असो ..
राजकारणातील जातीचे राजकारण आणि वाढते गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी घातक आहे. हा प्रकार आम्ही पूर्वीही सहन केला नाही अन पुढेही सहन करणार नाही. माझं वय झालं असेल मी थकलो असेल पण माझे विचार थकणार नाहीत ना संपणार नाहीत. पूर्ण आयुष्य गोरगरीब, उपेक्षित, ‘नाहिरे’वाल्यासाठी काम केले. पुढेही करत राहणार असं ते नेहेमीच म्हणत असत आणि त्याचा अवलंब करत असत.
हैदराबाद मुक्तिसंग्राम असो कि, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले.
१९५७ -१९६२-१९६७- १९७२- १९८५-१९९० असं सलग तब्बल सहा विधानसभा निवडणुका त्यांनी गाजवल्या आणि जिंकल्या.
१९७५ साली आणीबाणीचा विरोध करताना १४ महिने कारावास भोगला. यात विशेष म्हणजे आणिबाणीनंतर १९७७ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. पण याच नेत्याला १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आणि तोही त्यांनी मोठ्या मानाने स्वीकारला.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण या तिन्हीची सांगड घालत जनतेवर लादलेल्या सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करण्याची तयारी देखील ठेवावी लागते हा गुण मात्र त्यांच्याकडून विशेष शिकण्यासारखा आहे.
आणखी एक म्हणजे त्यांची लेखणी अगदीच दर्जेदार आणि तितकीच प्रखर होती. ‘जयक्रांती’च्या माध्यमातून ते लिखाण करीत असत. त्यांचे लिखाण हे ग्रामीण समाजाला जवळचे वाटत. कर्मकांड, आचार-विचार, श्रद्धा-अंधश्रद्धा व त्यातून निर्माण झालेली सांस्कृतिक गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी मोडीत काढण्यासाठी त्यांनी लिखाण केलं, समाजाला ज्ञान दिलं. ग्रामीण विकासावर त्यांचं खास लक्ष असायचं. विकासाच्या कामात अडचण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरून मोर्चे, उपोषणे करत असत.
या सर्वांचे मूळ म्हणजे त्यांनी स्वतःला शेतकरी कामगार पक्षातूनच घडवलं, वाढवलं.
जिल्ह्यातील राजकारणात कॉंग्रेसचे दिवंगत बलाढ्य नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व त्यांचे कधीच जमले नाही. विशेषत: सिंचनाच्या मुद्द्यावरून तर त्यांचे खूप मतभेद होत असायचे.
केशवराव काँग्रेस पक्षात गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते
अलीकडेच त्यांना वयाच्या १०२ व्या वर्षी लोकशाही न्युज चॅनलने “लोकशाही मराठवाडा रत्न” पुरस्कार दिला आहे. त्यांच्या कार्यांची सुरुवात पाहता अनेक चळवळीतुन व सत्याग्रहातुन झाली तसेच त्यांचे विधानसभा व लोकसभेतील कामकाज हे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होते. हा पुरस्कार म्हणजे मन्याड खोर्यातील जनता जनार्धनास मिळालेला बहुमान आहे.
त्यांना दिलेला प्रत्येक मान -सन्मान हा त्यांच्या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानापुढे फिकाच आहे.
हे ही वाच भिडू :
- किरीट सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट कोण?
- किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर असलेले महाविकास आघाडीचे ११ नेते
- एकेकाळच्या दोन कट्टर शिवसैनिकांना नारळ देणार असल्याची चर्चा का होतेय ?