स्वत:ला लाच देण्यासाठी आलेल्या माणसाला पकडून देणारा गृहराज्यमंत्री महाराष्ट्राने पाहीलाय

१९८० चा काळ. महाराष्ट्रात पुलोदच सरकार होतं. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांपासून ते जनता दल आणि कम्युनिस्ट पक्षांपासून ते जनसंघापर्यंत सगळ्या पक्षांची मोट या पुरोगामी लोकशाही दलाच्या आघाडीत बांधण्यात आली होती आणि मुख्यमंत्री बनले होते अवघ्या तिशीतले शरद पवार.

वसंतदादांचं सरकार खाली खेचून मुख्यमंत्रीपदावर आलेल्या शरद पवारांनी अगदी कौशल्याने हे मंत्रिमंडळ उभं केलं होतं. बरेच मंत्री पहिल्यांदाच सत्तेत आले होते मात्र यापैकी अनेकांनी आंदोलनात आणि चळवळीत आपलं आयुष्य घालवलं होतं.

यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे भाई वैद्य.

भाई वैद्य हे कट्टर समाजवादी विचारांचे नेते होते. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत त्यांचं व्यक्तिमत्व घडलं होतं. गोवा स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग होता. आणीबाणीत तर मिसाबंदी म्हणून १९ महिने तुरुंगवास सोसावा लागला होता. तर २५ वेळा कारावास भोगावा लागला.

पुण्याचे महापौर राहिलेले भाई वैद्य पुलोदच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या पोलीस कॉन्स्टेबलनां हाफ चड्डी मधून फुल पँट मध्ये आणण्याचं काम भाई वैद्य यांच्या कारकिर्दीतच झालं होत. यामुळे पोलीस दलात त्यांची मोठी प्रसिद्धी होती. 

सुपरकॉप म्हणून फेमस असलेले ज्युलिओ रिबेरो हे त्याकाळी मुंबईच्या क्राईम ब्रांच मध्ये होते. थेट गृहराज्यमंत्र्यांना त्यांचे रिपोर्टींग असायचे. तर मुंबईचे पोलीस कमिशनर गृहमंत्र्यांना रिपोर्टींग करायचे. रिबेरो यांनी मुंबईतील स्मगलर आणि अंडरवर्ल्डच्या गुंडाना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील येत होते.

एक दिवस अचानक भाई वैद्य यांचा रिबेरो यांना फोन आला. त्यांनी संध्याकाळी घरी भेटायला बोलवलं होतं. रिबेरो यांना आश्चर्य वाटलं. तरी ते संध्याकाळी गृहराज्यमंत्र्यांच्या निवास स्थानी गेले.

भाई त्यांना म्हणाले,

‘माझी अटक टळावी अशी विनंती करण्यासाठी मला तुमची भेट घ्यायची आहे, असा निरोप एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितला आहे.’

रिबेरो यांना देखील धक्का बसला. हा निरोप पोहचवणाऱ्यामध्ये त्यांचे वरिष्ठ देखील होते.

खरं तर हा निरोप आल्या पासून भाई वैद्य यांना काय करावे नेमके सुचत नव्हते.  काय खरे, काय खोटे प्रशासनाबाबत आपण नवखे. लाच घेऊन स्मगलरला मदत करण्याचे काम आपल्या हातून होणे शक्यच नव्हते; पण त्यालाच जाळ्यात पकडले तर…? असे त्यांच्या मनात आले.

पण सगळे नीट होईल ना, नाही तर सगळ्यांचीच नाचक्की व्हायची या विचाराने त्यांचं धाडस होत नव्हतं.  शेवटी त्यांनी एसेम जोशींना विचारायचं ठरवलं. एस.एम.जोशी हे त्यांचे मार्गदर्शक आणि या पुलोद आघाडीचे शिल्पकार होते. त्यांनी सांगितले,

‘हिम्मत कर आणि त्याला जाळ्यात पकड.’

एसएम जोशींनी सल्ला दिल्याप्रमाणे भाई वैद्य यांनी कोणालाही खबर लागू दिली नव्हती. फक्त रिबेरो यांच्यावर त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांना बोलावून सापळा रचण्यास सांगितले. रिबेरो यांची अडचण झाली की त्यांना त्यांच्या वरिष्ठांना देखील कळू द्यायचं नव्हतं कारण त्यांचा देखील यात सहभाग होता.

अखेर रिबेरो यांनी आपल्या अँटी करप्शन ब्युरो मधल्या काही मित्रांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये सापळा रचला. 

सययद अहमद बावामिया नावाचा स्मगलर आपल्या दिन साथीदारांसह  ११ जानेवारी १९८० रोजी भाई वैद्य याना भेटायला त्यांच्या घरातल्या ऑफिसवर आला. त्यांनी सोबत पुण्याचा एक सायकल दुकानदाराला आणलं होतं. तो भाई वैद्य यांचा जुना ओळखीचा होता.

त्यांनी एका बॅग मध्ये वर्तमानपत्रात गुंडाळून शंभरच्या नोटांचे बंडल आणले होते. एकूण तीन लाख रुपयांची लाच होती. गृहराज्यमंत्र्यांच्या टेबलवर ही बॅग ठेवली आणि आमच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात यावेत अशी विनंती केली.

ठरल्याप्रमाणे एसीबीचे अधिकारी दबा धरून बसलेच होते. त्यांनी लागलीच या गुन्हेगारांना त्या ३ लाखांच्या रकमेसह रंगेहाथ  पकडलं. सोबत पंच म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी देखील होते.

खुद्द गृहराज्यमंत्री लाच द्यायला आलेल्या गुन्हेगाराला रंगेहाथ पकडतात हे महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या राजकारणात पहिल्यांदा घडलं होतं. एस.एम.जोशींच्या तालमीत तयार झालेल्या भाई वैद्य यांनी  चमत्कार घडवून आणला होता.

आजही भ्रष्टाचाराच्या दलदलीत बरबटलेल्या राजकारणात भाई वैद्य यांचे आदर्श वेगळेपण हमखास आठवले जाते. त्यांनी राजकीय पदे कधी भोगली नाहीत तर आपल्या निष्कलंक चारित्र्यामुळे त्या पदांची उंची वाढवली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.