एक काळ असाही होता जेव्हा राज्याचा गृहमंत्री स्कूटरवरून सिग्नलला भेटायचा…

जुना काळ. स्थळ पुणे .

संध्याकाळची वेळ असावी. शाळा सुटल्या, ऑफिसचं टायमिंग झालं. सगळी पाखरे आपापल्या घरट्याच्या दिशेने गडबडीत निघाली होती. पुण्याला तेव्हा सायकलींचा शहर म्हणून ओळखलं जायचं. मात्र तेव्हाची पब्लिक देखील आजच्या प्रमाणे पळवाटा काढून सटकण्यात एक नंबर होती. सिग्नल पाळणे वगैरे आमच्या रक्तातच नाही असा अविर्भाव. काही कारण असलं की लगेच आपल्या ओळखी कशा पंतप्रधानांपर्यंत आहेत, मी अमुक तमुकला ओळखतो वगैरे प्रकार हा तसा जुनाच. त्यामुळे इथले पोलीस देखील जरा जास्तच कडक असतात.

असेच एक हवालदार मामा आपली टोपी सांभाळत सिग्नलला उभे होते. त्यांनी एका बाजूची ट्रॅफिक सोडली आणि दुसऱ्या बाजूची थांबवली. इतक्यात एक स्कुटर जराशा वेगातच आली. ट्राफिक हवालदारने केलेला थांबायचा इशारा गाडीवरचा व्यक्तीला दिसला पण त्यांनी ब्रेक देखील मारला पण गाडी काही थांबली नाही.

गाडीवानाची उंची थोडी कमी असल्यामुळे त्यांचा पाय देखील टेकला नाही. कसबस हवालदाराच्या जवळ येऊनच स्कुटर थांबली. हवालदार साहेबांचा पारा वर चढला. आपण सांगत असूनही हा माणूस थांबत नाही म्हणजे काय ?

गाडीवान आपला ब्रेक लागला नाही हे समजावून सांगत होता पण हवालदार साहेब आरडाओरडा करू लागले. लायसन्स दाखवा. चौकीवर चला.

समोरचा माणूस आपली सगळी शांतपणे कागदपत्रे दाखवत होता. हे सगळं दृश्य बघून चौकातला एक माणूस धावत पळत आला आणि त्या हवालदाराला म्हणलं,

“अरे तू कोणाला थांबवलं आहे हे ठाऊक आहे काय? ते राज्याचे माजी गृहमंत्री आहेत .”

हवालदार नवीन होता. त्याला काय पटलं नाही. असं गृहमंत्री स्कुटरवरून कधी फिरतात का ? साधा नगरसेवक देखील सफारी घेऊन फिरतो आणि हे गृहमंत्री स्कुटरवरून निघालेत. काहीही काय सांगताय असं म्हणत त्याने त्या व्यक्तीची पावती फाडली. समोरची वृद्ध व्यक्ती देखील काहीही न बोलता मंद हसत दण्ड भरून निघून देखील गेली.

हवालदार साहेब ठाण्यात जेव्हा पावत्या जमा करायला गेले तेव्हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जेव्हा ती पावती दिसली तेव्हा तो उडालाच. ते खरोखर माजी गृहमंत्री होते. नाव भाई वैद्य.

अशीच एक आठवण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी आपल्या एका लेखात सांगितली आहे. ते काही कामाच्या निमित्ताने पुण्याला आपल्या लाल दिव्याच्या गाडीतून आले होते. एका सिग्नलला गाडी थांबली. शेजारी सहज लक्ष गेलं तर गाडीच्या काचेच्या पलीकडे भाई वैद्य स्कुटरवर उभे होते. रिबेरो सांगतात,

“हि घटना घडली त्याच्या अगदी काही दिवसांपूर्वी राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणून ते माझे बॉस होते. त्याकाळात देखील त्यांची पत्नी पब्लिक बसने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीला जायच्या. इतका साधा व स्वच्छ मनाचा हा नेता आपल्याला लाभला होता. त्यांना सिग्नलवर स्कुटरवर उभे असलेलं पाहून आपसूकच माझा हात सलाम करण्यासाठी वर आला.”

भोर-वेल्हे तालुक्यातील (जि. पुणे) दापोडे या खेडय़ात २२ जून १९२८ रोजी भाई वैद्य यांचा जन्म झाला. समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विषय घेऊन त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर बी. टी. (बॅचलर इन टिचिंग) अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. विविध जाती-धर्माच्या लोकांची वस्ती असलेल्या पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये वास्तव्यास असलेले भाई वैद्य शाळकरी वयामध्येच स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले.

शाळेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीमध्ये भाईंनी सहभाग घेतला होता.

लोकनेते जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली १९४६ मध्ये स्थापन झालेल्या ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’चे सदस्यत्व स्वीकारून भाईंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर समाजवादी पक्षाची जी जी रूपांतरे झाली त्यामध्ये भाईंचा सक्रिय सहभाग होता.

१९५५ मध्ये गोवा मुक्ती संग्राममध्ये कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या तुकडीत सहभागी झालेल्या भाई यांना जबर मारहाण झाली होती. त्यानंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल भाईंना तुरुंगवास पत्करावा लागला होता. १९६१ मध्ये कच्छ येथे झालेल्या सत्याग्रहामध्ये भाई हे भुज ते खावडा पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

पुणे शहराच्या पूर्व भागातून नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाई वैद्य यांची १९७४ मध्ये पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. महापौरपदाच्या कालखंडात भाई ‘ऑल इंडिया मेयर्स कॉन्फरन्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करणारे भाई वैद्य मिसाबंदी म्हणून १९ महिने तुरुंगामध्ये होते.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जनता पक्षाने जनसंघाबरोबर युती करून स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकारमध्ये भाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपदाची धुरा आली.

महाराष्ट्राच्या पोलीस कॉन्स्टेबलनां हाफ चड्डी मधून फुल पँट मध्ये आणण्याचं काम भाई वैद्य यांच्या कारकिर्दीतच झालं होत. यामुळे पोलीस दलात त्यांची मोठी प्रसिद्धी होती. 

गृहमंत्रालय सांभाळत असताना त्यांना दोन लाखांची लाच द्यायला आलेल्या गुंडाला रंगेहाथ पकडण्याचा विक्रम देखिल त्यांच्याच नावावर दाखल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात स्वच्छ चारित्र्याचा कर्तबगार मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं.

पुढं दुर्दैवाने केंद्रातील जनता सरकार कोसळलं आणि त्यांच्या जागी इंदिरा गांधींचे पुनरागमन झाले. त्यांनी आपल्या विरोधातील विचारांच्या सर्व राज्यसरकारे बरखास्त करून त्यांच्या जागी राष्ट्रपती राजवट लावली. यात शरद पवारांचे पुलोद सरकार देखील होते.

मंत्रिपद जाताच भाईंनी एका दिवसात बंगला खाली करण्याचा निर्णय घेतला. पुढे काही दिवस पुण्यात भाई वैद्य नेहमीप्रमाणे आपल्या स्कूटरवर इकडे तिकडे फिरताना दिसत होते फक्त गंमतीची गोष्ट एकच होती कि ते राज्याचे काळजीवाहू गृहमंत्री असल्याने त्यांच्या पाठीमागे पोलीस गाड्या होत्या.

सत्तेपेक्षा आंदोलने त्यांना जास्त मानवली. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्ली अशा चार हजार किलोमीटर अंतराच्या भारत यात्रेमध्ये भाई यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

 स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल अनेकदा तुरुंगवास भोगावा लागलेल्या भाई वैद्य यांनी स्वातंत्र्योत्तर काळातही विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये मिळून भाई वैद्य यांना २५ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. शिक्षण हक्काच्या मागणीसाठी डिसेंबर २०१६ मध्ये आंदोलन केल्याबद्दल वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांना अटक झाली होती.

स्कुटरवरून फिरणारा मंत्री महाराष्ट्राला लाभला हे जर आज कालच्या काळात कोणाला सांगितलं तर त्यांना या अफवा किंवा दंतकथा वाटतील. काही जण स्वच्छ चारित्र्याचे अवडंबर असेही म्हणतील पण भाई वैद्य यांच्यासाठी त्यांचा साधेपणा हि कोणत्याही दिखाव्याची गोष्ट नव्हती तर ते त्यांच्या जगण्याचा भाग होता. असा नेता महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण देशात आता पाहायला मिळणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.