हाफ चड्डी बंद करणारे भाई..

स्वतंत्र आणि समान स्त्री-पुरुषांचा समाज म्हणजे समाजवाद, अशी समाजवादाची सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. असा समाज निर्माण करायचा तर भांडवलशाही आणि जातिव्यवस्थेचा बीमोड करायला हवा आणि धर्मावर आधारित राष्ट्रवादाला गाडून टाकायला हवं, विज्ञानाची कास धरायला हवी परंतु जीवन पर्यावरणस्नेही असायला हवं. भाई वैद्य यांची जीवननिष्ठा सारांशाने अशी मांडता येईल. त्यामुळे गेली अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचा विरोध ह्याला भाई वैद्य यांनी प्रधान स्थान दिलं होतं. गेली वीस वर्षं ते याच विषयावर विविध व्यासपीठांवर जाणीव जागृती करत होते. सोशॅलिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद, राष्ट्र सेवा दल, सोशॅलिस्ट पार्टी, माध्यम वा संघटना कोणतीही असो, ज्येष्ठ नागरीक संघ असो की शिक्षक भारती असो प्रत्येक व्यासपीठावरून भाई वैद्य मूलतः ह्याच विषयाची मांडणी करत होते. एन्‍रॉन प्रकल्पाच्या विरोधातील संघर्ष, नर्मदा बचाव आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सहभाग होता आणि मार्गदर्शनही होतं.

१९८९ साली विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना, काश्मीरमध्ये जगमोहन मल्होत्रा यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी जगमोहन यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे काश्मीरी पंडित व काश्मीरी मुसलमान यांच्यामध्ये अंतराय निर्माण झाला. काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराला जगमोहन यांनी सर्वतोपरी मदत केली असे आरोप झाले. या काळात काश्मीरी जनतेशी संवाद करण्यासाठी भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र सेवा दलाचे काही कार्यकर्ते काश्मीर खोर्‍यात रवाना झाले होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे काश्मीर विषयक मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. श्रीनगरला रवाना होण्यापूर्वी दिल्लीमध्ये भाईंनी जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली. माझ्या आठवणीप्रमाणे एक का दोन आठवडे भाई वैद्य यांनी श्रीनगरमधील विविध स्तरातील लोकांशी संवाद साधला होता.

काश्मीर प्रश्न जटील आहे मात्र त्याची सोडवणूक करायची तर काश्मीरी जनतेला विश्वासात घ्यायला हवं अशी समाजवाद्यांची भूमिका होती आणि त्यासाठी केंद्र सरकारला सहाय्यभूत ठरेल अशीच भूमिका समाजवाद्यांनी घेतली होती, बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचा पुरस्कार करतानाही. शेर ए कश्मीर अशी पदवी ज्यांना काश्मीरी जनतेने दिली, त्या शेख अब्दुल्ला यांच्याशी चर्चा करायला जयप्रकाश नारायण गेले होते. त्यानंतर मधु लिमये यांनीही ही भूमिका निभावली होती. एस. एम. जोशींवर जयप्रकाशांनी नागालँण्डमधील फुटीरतावाद्यांशी संवाद करण्याची जबाबदारी टाकली होती. १९८९ साली जॉर्ज फर्नांडीस आणि भाई वैद्य यांनी हीच भूमिका निभावली. कोण किती यशस्वी झालं हा मुद्दा गौण आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा वारसा आपण निभावला पाहीजे या समाजवादी आंदोलनाच्या मूल्याला साजेसा व्यवहार त्यांनी केला.

विद्यार्थी दशेत असताना भाई वैद्य राष्ट्र सेवा दलात सक्रीय झाले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी भाग घेतला. १९५५ साली सुरु झालेल्या गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रहींना अमानुष मारहाण करण्यात आली. नानासाहेब गोरे बेशुद्ध पडले, मधु लिमये यांना रक्तबंबाळ झाले होते. भाई वैद्य यांच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती आणि एक हाताचं हाड मोडलं. त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाई आघाडीवर होते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भाई पुण्याचे महापौर होते. त्यांनी जाहीर सभा घेऊन आणीबाणीचा निषेध केला आणि हरताळ टाकण्याचं आवाहन केलं. विविध चळवळींमध्ये भाईनी २५ वेळा तुरुंगवास भोगला.

समाजवादी चळवळीत भाई वैद्य लोहियावादी समजले जात. भारतीय राजकारणात बिगर काँग्रेसवादाची सुरुवात डॉ. लोहियांनी केली. बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाने समाजवादी पक्षाचा सामाजिक आधार बदलण्याची गरज डॉ. लोहियांनी अधोरेखीत केली होती. संसोपाने बांधी गांठ पिछडा पावे सौ में साठ ही घोषणा उत्तर भारत आणि बिहारमध्ये लोकप्रिय झाली होती. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, नितीश कुमार हे नेतृत्व याच आंदोलनातून पुढे आलं. महाराष्ट्रात मात्र समाजवाद्यांना काँग्रेसच्या विरोधात असा सामाजिक आधार निर्माण करता आला नाही. परिणामी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याशिवाय पर्याय नव्हता. १९७७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे १०० जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी दोन काँग्रेस होत्या—चव्हाण-रेड्डी यांची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस. यशवंतराव चव्हाणांनी जनता पक्षाशी युती करणं वैचारिक आणि राजकीयदृष्टीने योग्य ठरलं असतं. परंतु यशवंतरावांनी काँग्रेसचा लांडगा घरात घेतला, अशी टीका एस. एम. जोशी यांनी केली. काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसचं सरकार अल्पमतातलं होतं. ते टिकणं शक्य नव्हतं. ते पाडण्यासाठी शरद पवार यांना हाताशी धरलं एस. एम. जोशी यांनी. शरद पवार जनता पक्षात सहभागी झाले नाहीत. त्यांनी काँग्रेस (समाजवादी) असा स्वतंत्र पक्ष काढला. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. वस्तुतः काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस यांचा सामाजिक आधार एकच होता, आर्थिक आधारातही अंतर नव्हतं. परिणामी समाजवाद्यांचं बिगर काँग्रेसवादाचं राजकारण महाराष्ट्रात फसलं. त्यानंतर राजकारणात समाजवाद्यांची पिछेहाटच होत गेली.

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारामध्ये भाई वैद्य गृहराज्यमंत्री झाले. मंत्रिपदाच्या कार्यकाळात भाई वैद्य यांनी स्वच्छ कारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यांना लांच द्यायला आलेल्या कस्टम अधिकार्‍याला त्यांनी अटक करण्याचा सापळा त्यांनी रचला आणि स्मगलर्सना कोणत्याही प्रकारचं संरक्षण या राज्यात मिळणार नाही असा मेसेज त्यांनी गृहखात्याला दिला. गृहराज्यमंत्री म्हणून भाईंनी पोलीस दलात अनेक सुधारणा केल्या. भाई गृहराज्यमंत्री होते त्यावेळी पोलीसांचा गणवेश होता निळी हाफ पँट आणि निळ्या रंगाचा फूल शर्ट. हे कपडेही जाडेभरडे असायचे. खाकी फुल पँट आणि हाफ शर्ट असा तलम आणि रुबाबदार गणवेश पोलिसांना देण्याचा निर्णय भाई वैद्य यांनी गृहराज्यमंत्री असताना घेतला.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते त्यावेळीच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत खाजगी विधेयक सादर करण्याची पूर्वसूचना भाई वैद्य यांनी विधानसभेत सादर केली होती. पुढे हे सरकार कोसळलं आणि शरद पवारांच्या मंत्रिमंडळात भाई वैद्य यांचा समावेश झाला. त्यामुळे सरकारनेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात मांडला. दोन्ही सभागृहांनी तो अविरोध मंजूर केला आणि त्याच दिवशी, २७ जुलै १९७८ रोजी मराठवाड्यात दलित वस्त्यांवर हल्ले सुरू झाले. त्यामागे राजकारण नव्हतं असं म्हणता येणार नाही, अशी नोंद एस. एम. जोशी यांनी केली आहे. कारण नामांतराचा निर्णय बदला यासाठी एस. एम. जोशी यांच्यावर दडपण आणण्यात येत होतं. एका नामांतर विरोधकाने एस. एम. जोशींना जाहीर सभेत चपलांचा हारही घातला होता. पुढे हाच तरूण नामांतराच्या मागणीसाठी झालेल्या मोर्चात एस. एम. जोशी यांची माफी मागून “नामांतर कशासाठी, समतेसाठी न्यायासाठी” ही घोषणा देत होता. नामांतराच्या प्रश्नावर समाजवाद्यांमध्ये दोन गट पडले. डॉ. बाबा आढाव यांनी लातूरचं विषमता निर्मूलन शिबिर पार पडल्यावर नामांतराच्या प्रश्नावर लाँग मार्चची घोषणा केली. एस. एम. जोशी यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की सध्याचं सरकार—पुरोगामी लोकशाही दल, नामांतरवादीच आहे. गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनीच नामांतराचं खाजगी विधेयक मांडलं होतं. बाबा आढावांना अटक करण्याची वेळ भाई वैद्यांवर येऊ नये त्यामुळे मराठवाड्यातील नामांतर विरोधकांना अनुकूल करून घेण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा असा एस. एम. जोशी यांचा आग्रह होता. पण लाँगमार्च झाला. “लोक पकडले गेले व त्याबद्दल जो काय वाईटपणा यायचा तो आला” अशी नोंद एस. एम. जोशी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे. अर्थात त्यामुळे एस.एम. , बाबा आढाव आणि भाई वैद्य यांचे परस्पर संबंध दुरावले नाहीत. नामांतर विषयक भूमिका बदलल्या नाहीत. ऋणानुबंध आणि वैचारीक भूमिका कायम ठेवूनही राजकीय भूमिका विरोधी असू शकते, हे केवळ समाजवादी आंदोलनातच घडू शकतं. कारण समाजवादी आंदोलनाचं स्वरुप मूलतः बहुकेंद्री आहे.

१९९० च्या दशकात भाई वैद्य यांनी जागतिकीकरणाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. सदानंद वर्दे ह्यांनी यासंबंधात साधना साप्ताहिकात एक लेख लिहून जागतिकीकरणाची पाठराखण केली होती. सदानंद वर्देंच्या लेखावर जनता केंद्रात चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाई वैद्य यांनी प्रद्युम्न कौलची ओळख करून दिली. प्रद्युम्न कौल गुजरात आंदोलनापासून भाईंच्या संपर्कात होता. या चर्चेमध्ये सदानंद वर्दे यांच्या भूमिकेची चिकित्सा प्रद्युम्नने विविध आकडेवारीसह केल्याचं मला आठवतं. वस्तुतः सदानंद वर्दे आणि भाई वैद्य दोघेही समाजवादी चळवळीतले. राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, आणीबाणीमध्ये येरवडा कारागृहात एकत्र होते पुढे पुलोद मंत्रिमंडळातही होते. पण आर्थिक विषयावर मतभेद झाले. त्यानंतर भाई वैद्य या विषयावर भूमिका व्यापक करत गेले. निवडणुकीच्या राजकारणातून ते बाहेर पडले. गेली वीस वर्षं भाईंनी जागतिकीकरणाच्या विरोधातील भूमिका विविध व्यासपीठावर मांडण्याचं व्रतच घेतलं होतं.

समाजवादी पक्षाचा हा नेता गेली वीस वर्षं प्रबोधनाच्या कार्यात होता. समाजवादी क्रांतीचं स्वप्न पाहणार्‍या नेत्याचं कार्यकर्त्यात आणि प्रबोधन वा उद्‍बोधन करणार्‍या कार्यकर्त्यात रुपांतर होणं ही समाजवादी चळवळीची शोकांतिका आहे.

  • सुनिल तांबे 
Leave A Reply

Your email address will not be published.