इंग्लिश क्लब फुटबॉल बघणाऱ्यांना त्याने भारतात पण फुटबॉल असतं हे शिकवलं
रात्री जागून ला लिगा, इंग्लिश प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग पाहणारी, तिथल्या टीम मधल्या प्लेयर्सची उच्चारताही न येणारी नावे पाठ असणारी मंडळी आपल्या इथे गल्ली बोळात असतात. मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो असा तावातावाने वाद करतात. वर्ल्डकपच्या मॅचेस रात्र रात्र जागून बघतात.
पण आपल्या देशातल्या फुटबॉल प्लेयर्सची नावे सांग म्हटल्यावर त्यांच रुपांतर प्रचार सभेमधल्या नेत्यापासून पत्रकारपरिषदेमधल्या नेत्यासारखं होऊन जात.
भारतीयांना लक्षात आलेला पहिला भारतीय फुटबॉलपटू म्हणजे बायचुंग भुतिया. त्याला पण आपण फुटबॉलमधला सचिन म्हणून बाद करून टाकलं.
सचिन जर भारतीयांचा क्रिकेटमधला सुपरहिरो असेल तर हो बायचुंग भुतिया भारताचा फुटबॉल मधला सुपरहिरो होऊन गेला. पण तरी बायचुंगची सचिन बरोबर तुलना करणे हे दोघांच्याही खेळावर अन्याय करणारेच आहे. मात्र दोघांच्याही खेळाच्या प्रवासाची काही साम्य नक्कीच आहे.
सचिन अजून शालेय क्रिकेट खेळत होता तेव्हा पासूनच त्याची चर्चा सुरु झाली होती. बायचुंग भुतियासुद्धा शाळेत असतानाच सिक्कीमच्या बाहेर अख्ख्या देशभरातल्या फुटबॉलवर्तुळात फेमस झाला होता. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया(SAI) ची स्कॉलरशिप अवघ्या ९ व्या वर्षी त्याने पटकवली.
शालेय स्तरावरच्याच सुब्रतो रॉय कपमध्ये त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीला पाहून वेगवेगळ्या क्लबमध्ये त्याला साईन करण्यासाठी चढाओढ सुरु झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी “इस्ट बंगाल एफसी” या भारतातल्या सगळ्यात जुन्या आणि प्रतिष्ठेच्या क्लबकडून त्याने आपली प्रोफेशनल फुटबॉलची घोडदौड सुरु केली.
सचिनप्रमाणेच बायचुंगनेही खेळासाठी आपलं शिक्षण अधूरं सोडलं.
पुढच्या दोनच वर्षात टीम इंडियाची ब्ल्यू जर्सी त्याला घालायला मिळाली. नेहरू कप मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय डेब्यू मध्येच त्याने सर्वाधिक गोल केले. १९९६ चा इंडियन प्लेअर ऑफ द इयर चा मान त्याने पटकवला.
जागतिकीकरण झाल्यानंतर थोडाच काळ लोटला होता. केबल चॅनल मुळे मनोरंजनाची साधने रिमोटच्या क्लिकवर जवळ आली होती. भारतातही हळूहळू युरोपियन फुटबॉल क्लबच्या मॅचेस दिसू लागले. कट्ट्यावरच्या चर्चेत झिदान, रोनाल्डो यांची पण नावे येऊ लागली होती.
अशातच एक दिवस बातमी येऊन थडकली भुतिया नावाच्या भारतीय खेळाडूला ” बरी” या इंग्लिश फुटबॉल क्लबने तीन वर्षाच्या कराराने साईन केले. अनेक जणांना भारतात फुटबॉल खेळला जातो हाच आश्चर्याचा धक्का होता. भुतियाची चर्चा भारतीय मिडिया मध्ये सुरु झाली.
भारताचे फुटबॉल मॅचसुद्धा लोक टीव्हीवर शोधून पाहू लागले. एकेकाळी जशी भारतीय क्रिकेट टीम सचिनच्या भरवश्यावर खेळायची तशीच भारतीय फुटबॉल टीममध्ये बायचुंग भुतिया वन मॅन आर्मी होता.
सचिनप्रमाणेच वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याच्यावर कॅप्टनशिपची जबाबदारी येऊन पडली.
भारतीय फुटबॉलला देवानं दिलेलं गिफ्ट म्हणजे बायचुंग भुतिया असं समजल जात होत.
फुटबॉलसारख्या स्टॅमिनाचा अंत पाहणाऱ्या खेळामध्ये एका खेळाडूच्या जोरावर मॅच काढणे केवळ अशक्य होते. अशावेळी भारताला उझबेकिस्तान, मालदीव अशा फालतू देशाकडून मार खाताना पाहणे रसिकांना झेपले नाही. परत चॅनलचे बटन क्रिकेटकडे वळले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली तिकडे नवे युग सुरु झाले होते.
हीच ती वेळ बायचुंग आणि फुटबॉल हे सचिन आणि क्रिकेटच्या मागे पडत गेले.
बायचुंगनेही सचिन प्रमाणेच भारतासाठी सर्वाधिक सामने खेळले आहेत. सर्वाधिक गोलचा विक्रमसुद्धा अनेक वर्षे त्याच्या नावे होता. पण सचिनला जशी गांगुली, सेहवाग, द्रविड अशा गुणवान खेळाडूंची साथ मिळाली तशी साथ भुतियाला मिळाली नाही म्हणून देशाला सामने जिंकून देण्यास तो कमी पडला. तसेच प्रेक्षक, मिडिया, पैसा यांनी सुद्धा भारतीय फुटबॉलकडे केलेले दुर्लक्ष हा सुद्धा मुख्य मुद्दा होताच.
भारताला देवानं दिलेलं भुतिया हे गिफ्ट वापरताच आलं नाही.
कितीही जरी झाले तरी भारताला फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर मात्र पोहचवण्याच श्रेय मात्र त्यालाच देता येईल. २००७, २००९ या दोन वर्षी नेहरू कप त्याने देशाला जिंकून दिला. पहिल्यांदाच भारत आशिया कपसाठी पात्र झाला. आंतरराष्ट्रीय स्टार झिदान, मायकल बलाक अशा खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्यासाठी त्याला बोलवण्यात आले.
सचिन जेव्हा रिटायर झाला तेव्हा देशभर मोठा इव्हेंट साजरा झाला. बायचुंग भुतियाच्याही निवृत्तीवेळी फुटबॉल जगताततून त्याच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यात आली.
खास भुतियाच्या रिटायरमेंटची मॅच खेळण्यासाठी युरोपमधील सर्वोत्तम टीमपैकी एक बायर्न म्युनिच भारतात आली. पण दुर्दैवाची गोष्ट भारतातल्या इतर स्पोर्ट्स फॅनना ही एवढी मोठी घटना खिजगणतीतही नव्हती.
रिटायर झाल्यावरही सचिनला मिळणारे जाहिरातीतले उत्पन्न कोटीच्या घरातले राहिले. आणि इकडे भुतिया झलक दिखला जा सारख्या इव्हेंट शो मध्ये नाचून आपल्या संसाराला हातभार लावत होता.
तेंडूलकर आणि भुतिया यांच्यात आणखी एका गोष्टीसाठी तुलना करता येईल ते म्हणजे राजकारण.
सचिन कधीच आपली राजकीय मते व्यक्त करत नाही किंवा त्यासाठी कधी तो आग्रही असलेला दिसत नाही. बायचुंग भुतियाने मात्र आपली राजकीय मते लपवली नाहीत. तिबेटच्या प्रश्नावर चीनमध्ये होणाऱ्या बीजिंग ऑलंपिकच्या मशाल दौडीत सहभागी होण्यास त्याने नकार दिला.
सचिनला त्याच्या लोकप्रियतेमुळे कायम पॉलिटिकली करेक्ट राहून ही देशाच्या संसदेवर सन्मानीय खासदार म्हणून निवण्यात आले. पण बायचुंग भुतियाला राजकारणातही हातपाय मारावे लागत आहे. २०१४ साली त्याने तृणमूल काँग्रेसकडून खासदारकी लढवली पण तो त्यात अपयशी ठरला. मग त्याने तृणमूल पक्ष सोडून स्वतःचा हमरो सिक्कीम पार्टी नावाचा पक्ष उभारला.
भुतिया रिटायर होऊन बरेच वर्ष झाले आजही भारतीय फुटबॉल मध्ये काही मोठा फरक पडलेला नाही आहे. त्याच्यानंतर विराट कोहली सारखा सुनील छेत्री एकखांबी किल्ला लढवतोय. भारतीय फुटबॉलचा भुतिया नंतरचा देव असं त्याला ओळखलं जातंय.
आज सचिन आणि भुतिया दोघेही भारतात खेळाच्या प्रमोशन साठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. फुटबॉल किंवा बाकी इतर खेळ क्रिकेटपेक्षा मागे पडले आहेत यात सचिन कोहली भुतिया छेत्री यांचा काही दोष नाही. दोष असलाच तर तुम्हा-आम्हा भारतीय फॅन्सचा आहे.
हे ही वाच भिडू.
- नेहरूंच्या हलगर्जीपणामुळे भारताचा संघ फुटबॉल विश्वचषक खेळू शकला नव्हता ?
- कोल्हापूरपेक्षाही छोटा देश फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरलाय!!!
- माझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी