UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात

भालचंद्र नेमाडे यांची शेवटची कादंबरी आली होती १९७९ साली. त्यानंतर हिंदू येणार येणार म्हणून नुसत्या चर्चा झडत. पण हिंदू काही येत नव्हती. नेमाडेंचं नक्की काय चाललय ते पण कळत नव्हतं. माणसं म्हणायची खूप मोठ्ठा पट मांडणारायत. आम्हा पोरांना वाटायचं आत्ता नेमाडे खरच हडप्पा जावून मुक्काम ठोकून राहिले असतील, म्हणूनच हिंदूला वेळ होत असेल.

अखेर शेवटची कादंबरी प्रकाशित झाली त्यानंतर  तब्बल ३०-३२ वर्षानंतर हिंदू आली. म्हणून हिंदू लिहण्याचा कालावधी हा ३० इतक्या वर्षांचा असा आमचा समज अजूनही आहे. पण मध्यंतरी पॉप्युलरच्या प्रकाशकांनी एक लेख लिहला होता. त्यात ते म्हणले मी कंटाळून नेमाडेंना म्हणालो कधी देणार हिंदू. तर ते म्हणायचे लिहतोय विचार सुरूय याच्या ऐवजी घरगुती कारणं सांगायचं. शेवटी कंटाळून प्रकाशक नेमाडेंच्या बायकोला म्हणजे प्रतिभावहिनींना म्हणाले, 

प्रतिभावहिनी आता तुम्ही तरी त्यांना सांगा ना माझी लाज राखायला. 

तर वहिनी म्हणाल्या,

छे! छे! आत्ता शक्य नाही. आमच्या मुलाचं लग्न करायचय. 

त्यावर प्रकाशक म्हणाले होते,

अहो वधुपरिक्षा तुम्ही पण करू शकता पण कादंबरी तर फक्त तेच लिहू शकतात. 

आत्ता यावर त्या म्हणाल्या,

कादंबरी पुष्कळ लोक लिहीत असतात. पण लग्नाच मुलाच्या बापानेच पहायचं असतं. 

हिंदूला वेळ का लागला याचं खर कारण इथे सापडतं. आज भालचंद्र नेमाडे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या जन्म २७ मे १९३८ चा. सांगवी खान्देशातला. पुण्याचा फर्ग्युसन कॉलेजमधून बीए, डेक्कनमधून भाषाशास्त्रात एमए हे त्यांच शिक्षण. धुळे, नगर, गोवा, औरंगाबाद, मुंबई अशा ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांची नोकरी केली.

सुरवातीच्या काळात कोसला लिहलं, आणि वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी हिंदू लिहलं. या दोन्ही पुस्तकात पन्नास वर्षांच अंतर. या काळात त्यांनी एकाच कांदबरीचे चार भाग केले आणि दोन कवितासंग्रहाचा एक कविता संग्रह केला. टिकास्वयंवर नावाची समीक्षा लिहली. आणि आपल्या मुलाखती, सोळा भाषणे वगैरे वगैरे मधून समीक्षा करत गेले. 

पुस्तकांचा हिशोब लावायचा झाला तर जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच त्यांची पुस्तकं.

त्यातही कोसला वाचणारे पुष्कळ सापडतात. म्हणजे पुस्तक वाचणारी मुल बघितली की अफाट वाचण करणाऱ्यांचा एक गट सापडतो. दूसरा कोसला वाचून शांत बसणारे असतात आणि तिसरे कोसला नंतर चांगदेव चतुष्ठीत अडकेलेले सापडतात. या पलिकडे वाचणाऱ्यांचा वर्ग अजून मला तरी दिसला नाही. कोसला हे साधं पुस्तक आहे. बरेचजण तर म्हणतात प्रचंड बोर असणार पुस्तक दूसरं कुठलच नसेल. तरिही माणसं हे वाचत राहतात. यात बेफाम घोडे टापटाप करत चालू लागले अस लिहलेलं नाही की त्या रात्री मोगरा सुगंध दरवळत होता असही लिहलं नाही. कोसलातला नायक टेन्शनमध्ये डोसा खातो. बहिणी गेल्याचं दुख: तो, तो तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ. म्हणत मांडतो तेव्हा त्याची समीक्षा वगैरे टाईपच्या गोंधळाकडे कुठलाच वाचक लक्ष देत नाही. 

वयाच्या पंचवीशीत लिहली म्हणून कोसला मोठी होत नाही तर कोसलासारखा पट अजूनही मांडता आला नाही. प्रती पांडुरंग सांगवीकर अजूनही जन्माला आला नाही याच विशेष वाटतं. कोसलामध्ये इतकं काय आहे तर तो फक्त एक सामान्यिकरणाचा प्रवास आहे. म्हणजे कस तर आत्ताच्या काळात एखादा UPSC करायला पुण्यात येतो, हळुहळु तो राज्यसेवेकडे वळतो. आणि दोन तीन वर्षात तलाठ्याचे पेपर दिवू लागतो. नाहीच झालं काही तर एखाद्या खात्यात चतुर्थ श्रेणी म्हणून चिटकतो. आपण सगळेच असे असतो आणि अस असणाऱ्या सगळ्यांना कोसला आपली वाटते. 

पण मनापासून सांगायचं झालं तर नेमाडे हे लेखक कमी आणि कवी जास्त आहे. कवीचा सर्वात मोठ्ठा नियम म्हणजे ज्याला कमी कविता सुचतात तो कवी. इतक्या वर्षाच्या काळात त्यांच्या खूप कमी कविता आहे. आत्ता कविता पाडायला तरी किती वेळ लागतो पण “देखणी” सारखं पुस्तक आयुष्यभर पुरत…

बांधून झालेल्या भिंतीतून काय पहात असतो शोधून कुणास ठाऊक अस काहीतरी असतच ह्या जन्मी जे मिऴत नाही.

किंवा, 

की दूसऱ्याच कुणापासूनही त्यांना तितकीच लाडकी पोरं होतात

या ओळी आल्यानंतर नेमाडे माणूस भारी वाटतो. नेमाडेची चांगदेव चतुष्टी हे चार भागांची एक कादंबरी आहे. बिढार, हुल, झुल, झरीला यातला पहिली दूसरी तिसरी चौथी कोणती ते पटकन सांगता येणार नाही पण इथला चांगदेव खरा ब्राम्हणी पात्र वाटतो. पाडुरंग सांगवीकर कसा आहे ते स्वीकारत मान्य करत जातो पण चांगदेव जरा हूशार असतो. इथपण नेमाडे म्हणजेच हे चांगदेव हे गृहित धरलेलं असतं. त्यातलं कुठलं पात्र कुणाचं हे साहित्यिक अजून जुळवत असतात म्हणे, असो त्यातला नारायण हा खरा कम्युनिस्ट इतकच कळतं. 

हिंदूचा आवाका देखील तितकाच. हिंदूतला खंडेराव हा गोष्टी सांगत राहतो वर्तमान काळातून भूतकाळ आणि भूतकाळातून पुन्हा अपुर्ण वर्तमानकाळ अस काहीतरी घडत राहत. 

नेमाडे लिहीत राहतात. ते लिहतात त्याहून अधिक ते फटकळ बोलण्यामुळे चर्चेत असतात. म्हणजे साहित्य संमेलनाला ते नुसती उठाठेव म्हणतात. इंग्रजीचे प्राध्यापक असून ते इंग्रजी हटाव सेना काढा म्हणून सांगतात. किंवा मुलांना कॉन्वेन्टच्या शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कायदा काढावा असही ते सांगतात. अशा वेळी काय कळत नाय बाबा यांच इतकच उत्तर असतं. मग लोक देशीवादावरुन त्यांच्यावर टिका करतात पण कसही असो नेमाडे हातावर मोजण्याच्या बोटाएवढी पुस्तक लिहून एक नंबरलाच असतात. नेमाडेबाबांचा आज वाढदिवस.

या दिवसाचं देखील त्यांना कौतुक नसणार पण ते कुठतरी केक कापणारच असा हा माणूस. 

 

नेमाडेंच्या देखणीतील काही निवडक ओळी खास भिडू लोकांसाठी.

चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी

तुझी हार गोंदणारीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईल.

अहो माझिया पावलांच्या कपाळी व्यथा धुंडाळणारी वाट आली 

चुकली बोटे ओळख पोरी आत्ता माझे डोऴे सोड.

हे लांब लांब रस्ते कधी जुने होत नाहीत की संपत नाहीत आणि अंधाराच्या ढिगाऱ्यावरुन धावत जातात दिवस कायम 

खुणा ठेवुन संपत नाहीत चंन्द्रकोरी घराघरावर कललेल्या, की सावल्या सोडून जात नाहीत झाडांना जन्मभर 

की दूसऱ्याच कुणापासूनही त्यांना तितकीच लाडकी पोरं होतात

जे काही केल त्याचा तमाशा झाला आणि तमाशा केला तेव्हा लोक ओहो ओहो म्हणाले

आपण गेल्यानंतर आपल्या प्रिय गोष्टी इथेच राहतात हे ही काय कमी आहे.

 दुखाचा अंकूश असो सदा मनावर हालाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंन्द्र असो चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजारो बोटं असोत लक्षात नाहीत राहत बिचारी 

शेवटचे राजे असतात बुरजावरुन खिन्नपणे क्षितीज न्याहाळत

सगळे दिवस वाया गेले आधीचे नंतरचे नाहीतर नाहीतर ही कविता पुरे केली असती इथेच.

बांधून झालेल्या भिंतीतून काय पहात असतो शोधून कुणास ठाऊक अस काहीतरी असतच ह्या जन्मी जे मिऴत नाही.

पेशी ठेवुन घेतल्या आईकडच्या बापाकडच्या टाकायच्या तिथए टाकल्या सगळे नितीनियम पाळून

प्रियकराला तू अप्रिय करतेस प्रिये, बिलगणाऱ्याला विलग तू तशी होणार असलीस तर मिही तसा होवुदे 

तुला मी सगळ काही देवुन चुकलो तरी पाय दिले नव्हते ते एक बर झालं. 

तंबाघूच्या धूरात नाहीसा झालो संपलो निव्वळ डोऴे राहीले किनाऱ्यावर

पाहा पाहा कशा दुर्दैवाच्या पिसाट लाटा  एकामागून एक उसळून येत आहेत हे कृतघ्न माणसां तुझ्या डोक्यावरुन जाण्यासाठी तू कुठे किती होतास कुठे कसा आहेस कुठे कोण असशील काय असशील हा आहे सगळा कल्पनाविस्तार मानवतेचा चिरंतर आजार अव्याहत चाललेली ही समुद्रगाज केवळ तुझ्या आयुष्याचा सारांश समज एवढच तुला समजण्याची गरज आहे.

ह्यासाठी नव्हती केली घासाघीस शेवटची भेट हार व्हावी.

कुणी मारकनं न्हाय नाठाळ न्हाय वढाळ तर बिलकुल न्हाय आंड बडवलेल्या दिवसापस्नं

एकदा डोऴ्यातून आसवं गळून गेल्यावर राहतं काय मांसाशिवाय.

आपण एकमेकांना दयायच काहीच बाकी ठेवल नाहीय त्या एका जड थंड निरोपाशिवाय.

ही न मिळो ती मिळेल ती न मिळो जी मिळेल लाख पोरी आहेत मर्दा कोणी एक मिळेल

अर्धी जवानी लुळी झाली मर्दा सांस्कृतीत स्वप्न खाटेबाहेर बरी.

पूर्वी केव्हा बर होत दर नव्या ओठावर ओळखीच हसू होतं.

 

आणि सर्वात शेवटचं म्हणजे, मुक्त कोणी कोणास केले ? 

2 Comments
  1. Rahul Dhutraj says

    वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा
    नेमाडे मास्तर

  2. शिवाजी says

    अप्रतिम

Leave A Reply

Your email address will not be published.