चंद्रकांत घाबरू नको, मेलास तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील

सध्या ऐतिहासिक सिनेमे बनवण्याचा ट्रेंड आलाय. पिक्चर हिट होत असले, तरी बजेटचं गणित जुळवणं, ऐतिहासिक सेट उभारणं अशा अनेक अडचणींची कसरत निर्माता-दिग्दर्शकाला करावी लागते. पण त्यातही महत्त्वाचा विषय असतो, ऐतिहासिक भूमिका कोण साकारतंय याचा ?

परंतु सिनेमाक्षेत्राच्या अगदी सुरुवातीला काळात मराठी सिनेमाला उत्तमोत्तम दर्जेदार ऐतिहासिक सिनेमे देण्याचं हे शिवधनुष्य दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी यशस्वीरित्या पेललं. 

3 मे 1897 ला कोल्हापुरामध्ये भालजी पेंढारकरांचा जन्म झाला. कोल्हापुरात जन्माला येणारे भालजी पुढे मराठी सिनेसृष्टीसाठी बहुमूल्य योगदान देतील याची कोणालाही कल्पना नव्हती.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भालजी ‘नेताजी पालकर’, ‘बहिर्जी नाईक’ अशा सिनेमांतुन शिवकाळातील ऐतिहासीक पात्रं लोकांसमोर आणत होते.

याच काळातील भालजींचा महत्वाचा सिनेमा म्हणजे ‘छत्रपती शिवाजी’.

संपुर्ण जगाचं प्रेरणास्थान आणि महाराष्ट्रातील लोकांचं आद्यदैवत असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं हे एक आव्हानात्मक काम होतं. सध्या सिनेनिर्मितीसाठी जी साधनं सहज उपलब्ध होतात उदा. सेट उभारणं, तांत्रिक गोष्टींची जमवाजमव अशा गोष्टींची जुळवणी करणं 1950 साली तसं कठीणच काम म्हणावं लागेल. परंतु भालजींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमा बनवण्याचा घाट घातला.

प्रमुख भुमिकेसाठी भालजींनी चंद्रकांत मांढरे या कलाकाराची निवड केली. चंद्रकांत मांढरे हा पिळदार शरीरयष्टीचा एक रांगडा कलाकार. ज्या देहबोलीची गरज शिवाजी महाराजांच्या भुमिकेसाठी होती त्यासाठी चंद्रकांत मांढरे यांची निवड योग्यच होती.

परंतु शिवाजी महाराजांसारखं फक्त दिसणं महत्वाचं नव्हतं. तर शिवाजी महाराज साकारण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व कलाकाराच्या अंगी भिनायला हवं, याची भालजींना जाण होती.

‘छत्रपती शिवाजी’ सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार होती. चंद्रकांत मांढरे हे भुमिकेसाठी मेकअप आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा पोशाख करत होते. ते थोड्याच वेळात पुर्ण तयार होऊन हातात तलवार धरत बाहेर आले. तेव्हा भालजींनी चंद्रकांत मांढरेंना लवुन मुजरा केला. भालजींना सर्व आदराने ‘बाबा’ म्हणत. बाबांनी केलेली हि कृती पाहताच चंद्रकांत अवाक झाले.

‘बाबा , हे काय करताय!’

असं चंद्रकांत यांनी भालजींना विचारताच ते म्हणाले,

‘आता इथुन पुढे मी बाबा नाही आणि तु चंद्रकांत नाहीस तर तु शिवाजी आहेस. यापुढे शिवाजी सारखंच तु राहायचं. इथुन पुढे जिजाऊंशिवाय कोणालाही तु नमस्कार करणार नाहीस’

दिग्दर्शक म्हणुन भालजींनी केलेली ही कृती तिथल्या सर्वांसाठी आश्चर्यजनक होती. तसेच शुटींग संपेपर्यंत कोणीही चंद्रकांत यांची मस्करी करणार नाही असा नियम त्यांनी स्वतःसकट सर्वांना लागू केला.

त्याचबरोबर सिनेमातील एका प्रसंगाचं चित्रण पन्हाळ्यावर सुरु होतं. घोडे दौडत येऊन कड्यावर थांबतात असा तो प्रसंग होता. चंद्रकांत शिवाजींच्या भुमिकेत घोड्यावर स्वार झाले. हा शाॅट दोन-तीन वेळा रिटेक झाला परंतु भालजींचं समाधान होत नव्हतं.

घोड्यावर बसण्याची सवय झाली तरी घोडे कड्यावर थांबलेच नाही तर मी घोड्यासह कड्यावरुन खाली कोसळेल, अशी धाकधुक चंद्रकांत मांढरेंच्या मनात होत होती. यावेळी भालजींनी चंद्रकांत यांच्या मनातली भिती ओळखली.

भालजी बसल्याच जागी ओरडले,

“चंद्रकांत घाबरु नकोस, मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणुन मरशील.”

यानंतर पुढच्याच टेकला शाॅट ओके झाला. कलाकार कोणती भुमिका साकारतोय याचं महत्व उपस्थित सर्वांना कसं पटवुन द्यावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे भालजींनी केलेली कृती. 1952 साली ‘छत्रपती शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित झाला.

चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी फक्त साकारलेच नाहीत तर ते जगले. या सिनेमातले लढाईचे प्रसंग, शिवाजी-अफजलखान भेट, बाजीप्रभुंनी पावनखिंडीत गनिमांशी केलेलं युद्ध, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदी सर्व प्रसंग भालजींनी स्वतःच्या दिग्दर्शनातुन जिवंत उभे केले आहेत.

एक ऐतिहासीक सिनेमा म्हणुन ‘छत्रपती शिवाजी’ हा मराठी सिनेसृष्टीतला मानबिंदू आहे.

– भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.