पंढरपूरच्या राजकारणात खुन्नस होती पण दिलदारपणा देखील तितकाच होता

पंढरपूर म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती विठुमऊली, आपली चंद्रभागा, वारकरी, आणि संतपरंपरा…

पण राजकारणाचा आणि तिथल्या नेत्यांचा विचारच मनात कधी येत नाही. कारण काय ? तर इथल्या राजकारणाच्या चर्चा वरच्या फडावर कधी येतच नाहीत ओ. म्हणजे वरवर बघायला गेलं तर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निवडणुकीपूरती खुन्नस असते. पातळी सोडून टीका ही केली जात नव्हती. त्यामुळं चर्चा पण कधी रंगल्या नाहीतच.

उलट विरोधक असूनही मान सन्मान जपणं ही पंढरपूर तालुक्याची परंपरा. त्याचाच हा किस्सा.

हल्ली हल्ली राज्यातल्या बाकीच्या राजकारण्यांनी पंढरपुरात येऊन पातळी सोडून टीका करण्याची चाल सुरू केली हा भाग वेगळा. पण पंढरपुरात विरोधकांचा मान, सन्मानही राखला जात असायचा. अगदी भाई राऊळ, बाबुराव जोशी, कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्यापासून ते सुधाकरपंत परिचारक यांच्यापर्यंत ही परंपरा पाळली गेली.

उदाहरण म्हणून आमदार असताना भारत भालके यांनी पंतांच्या वयाचा, त्यांच्या जेष्ठत्वाचा नेहमीच सन्मान राखला. आणि पंतांनी सुद्धा भालके यांच्यावर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही.

एवढेच नाही तर राजकीय विरोधक असूनही अनेकवेळा दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच मंचावर, खुर्चीला खुर्ची लावून बसल्याचे राज्याने पाहिलय. एवढे राजकीय सौहार्द महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यात अपवादानेच दिसून येईल.

२००९ सालची विधानसभा निवडणुक आणि त्यावेळी झालेला परिचारक गटाचा पराभव त्यावेळी नेत्यांच्या आणि परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात सलत होता. मात्र राजकीय जीवनातील एवढा मोठा पराभव पदरात घेऊनही अगदी चार – दोन महिन्यातच पंतांनी आपल्या मनाचा मोठेपणा, लोकप्रतिनिधी पदाचा सन्मान कसा राखावा हे दाखवून दिलं होतं.

विधानसभा निवडणुकीनंतर आमदार भारत भालके पहिल्यांदाच एका कार्यक्रमासाठी पंढरपूर नगरपालिकेत आले होते. तेंव्हा तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल नुसार भालके यांनाही आमंत्रित करावे लागणार होतं.

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या त्या कार्यक्रमात सत्कार करताना अगोदर सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यानंतर जेष्ठ नेते म्हणून सुधाकरपंत परिचारक यांचा सत्कार करण्यासाठी नाव पुकारण्यात आल. लगेचच पंतांनी निवेदकाला थांबवल आणि म्हंटले

अहो, भारत नानांचा अगोदर सत्कार करा, ते लोक प्रतिनिधी आहेत.

संयोजकांनी ही पंतांची सूचना ऐकली. पंतांनी आपला सत्कार मागे राखून अगोदर लोकप्रतिनिधी म्हणुन भालके यांचा सत्कार करण्यास भाग पाडलं. पंतांच्या या भूमिकेमुळे उपस्थित सर्वच चकित झाले. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणाचं पाणी अजूनही चंद्रभागेच्या पाण्याइतके निर्मळ असल्याची खात्री उपस्थितांना पटली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.