२५ वर्षांपूर्वी शड्डू ठोकलेल्याची परतफेड करणारा खराखुरा पहिलवान

मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राष्ट्रवादीने चमत्कार घडवत ५४ आमदार निवडून आणले. या आमदारांपैकी एका आमदाराला पवारांनी खास बोलावून घेतलं, ते होते पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके. त्यांनी भाजपच्या सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता.

नानांना शरद पवारांनी विचारलं,

“भारत तू शिवाजी चौकात दंड थोपटले होतेस?”

भारत भालके म्हणाले,

“होय साहेब, याच सुधाकर परिचारक यांनी २५ वर्षांपूर्वी तुमच्या समोर राजा भाऊ पाटील यांचा पराभव केला म्हणून शड्डू ठोकला होता. तो गोष्ट आमच्या जिव्हारी लागली होती. त्याची परतफेड म्हणून मी ही दंड ठोकले.”

भारत भालके म्हणजे जळता निखारा होता. कधी एका ठिकाणी तो टिकलाच नाही. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे त्यांच्या रक्तात होतं.

पंढरपूर तालुक्यात सरकोली येथे त्यांचा जन्म झाला. गावातल्याच शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. पण पहिलवानकीचा नाद लागला. पुढचं शिक्षण आणि कुस्ती दोन्हीच्या नादाने कोल्हापूरला आले.

गंगावेस तालमीच्या लाल मातीत पहिलवानकी शिकले. शाहू महाराजांच्या कोल्हापुरात त्यांची यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या विचारांची ओळख झाली. त्यांच्या राजकारणाचा पगडा भारत भालकेंवरदेखील पडला.

कोल्हापुरातून परत आले ते थेट पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण यात उडी घेतली. या तरुणाची क्षमता त्यांचा आवाका लक्षात आल्यामुळे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर संचालक बनवलं.

याच कारखान्यात औदुंबरअण्णा पाटील यांच्या ते संपर्कात आले. त्यांना गुरू मानून आपल्या राजकारणाची वाटचाल सुरू केली.

याच औदुंबरअण्णा यांच्या मुलाने राजाभाऊ पाटील यांनी काँग्रेस विरुद्ध बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. औदुंबरअण्णापाटील हे तेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाविरुद्धच प्रचार केला होता. तेव्हा खरोखर राजाभाऊ पाटील यांचा पराभव झाला मात्र निवडून आलेल्या सुधाकर परिचारक यांनी पवारांना तुमचा उमेदवाराला पाडून आलोय अशी दंड ठोकून वलग्ना केली होती. वर उल्लेख आला ती हीच घटना.

भारत नाना भालके यांचा राजकीय कार्यकर्ता म्हणून घडत असतानाचा हा काळ. औदुंबरअण्णा यांच्या अपमानाचा बदला एक ना एक दिवस घ्यायचा याची गाठ त्यांनी मनाला बांधली होती.

औदुंबरअण्णा पाटील यांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसा भारत भालके यांनी समर्थपणे उचलला.

२००२ साली ते विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष बनले. पुढच्या दोनच वर्षात त्यांनी पहिल्यांदा विधानसभा लढवली. काँग्रेस राष्ट्रवादी कडून तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं पण ते डगमगले नाहीत. लोकांच्यात जाऊन काम करणं सुरूच ठेवल.

२००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्या विरुद्ध उभे होते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील. मोहिते पाटील म्हणजे राज्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ. पण त्यांना पराभूत करण्याचा चमत्कार भारत नाना भालके यांनी घडवून आणला. जायंट किलर म्हणून त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली.

या विजयानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना मुंबईला बोलवण्यासाठी थेट हेलिकॉप्टर पाठवून दिलं.

भारत नाना भालके काँग्रेस मध्ये आले. २०१४ साली काँग्रेसची पडझड सुरू असतानाही सुधाकर परिचारक यांचा गड समजला जात असलेल्या पंढरपुरात विजय मिळवत आपली पकड घट्ट केली.

२०१९ च्या निवडणुकी आधी काँग्रेसला रामराम ठोकला होता. राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले, त्यांची पहिल्यांदाच सुधाकर परिचारक यांच्याशी थेट लढत झाली आणि यावेळी त्यांनी पंचवीस वर्षांचा वचपा काढत दणदणीत हॅट्रिक केली आणि भर चौकात पहिलवानकी शड्डू ठोकून आपला बदला पूर्ण केला.

भारत भालके लोकनेते होते. त्यांची स्टाईल, त्यांची परखड भाषा, त्यांची भाषणे पंढरपुरात गाजायची. जनमानसाला आपलंसं कस करून घ्यायचं याची हातोटी त्यांना जमली होती. पक्षाच्या तिकिटासाठी कधी त्यांची गाडी अडखळली नाही, जाईल तिथे विजय मिळवत पक्षाच्या राजकारणापलीकडे आपले अस्तित्व दाखवून देत राहिले.

काल रात्री त्यांचे पुणे येथे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. पंढरपूरच्या राजकारणाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.