नशा करणाऱ्या हिप्पी तरुणांना स्वामी प्रभुपाद यांनी ‘हरे राम, हरे कृष्ण’ चं वेड लावलं होतं..

तुम्हाला बहुतेक वेळा काही विदेशी लोक भगवे वस्त्र परिधान करून ‘हरे कृष्णा हरे राम’चा देहभान विसरून जप करत नाचताना दिसतात हे लोक कोण आहेत त्यांचा देश, संस्कृती, धर्म सगळं काही वेगळं असताना लहानपणी ज्यांना कृष्ण, राम शिकवला गेला नाही तरीसुद्धा हे लोक अगदी तल्लीन होऊन भक्ती करताना दिसतात हा चमत्कार ज्यांनी केला ते म्हणजे स्वामी प्रभुपाद.

ब्रिटीश अमेरिकन किंवा युरोपियन देशांतील बहुतेक लोक स्वामी प्रभुपादांमुळे कृष्ण भक्तीकडे आकर्षित झाले होते. स्वामी प्रभुपाद म्हणजे अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद.

हे चर्चेत येण्याचं निमित्त म्हणजे…

इस्कॉनची स्थापना कारणारे स्वामी प्रभूपाद्जी यांची १२५ वी जयंती.

२०२१ मधेच त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्त १२५ रुपयांचे खास नाणे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले होते. प्रभूपाद्जी स्वामींनी १०० हून अधिक इस्कॉन मंदिरे उभारली असून जगाला भक्तीमार्गाचा परिचय करून दिला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १२५ रुपयाच्या या स्मृतीचिन्ह नाण्याला अतिशय आकर्षक रूप दिले गेले. एका बाजूला अशोक स्तंभ आणि १२५ रुपये हा आकडा आहे तर दुसऱ्या बाजूला स्वामी प्रभुपादजी यांची प्रतिमा कोरली गेली आहे.

‘स्वामी प्रभुपाद’ जगात दोन गोष्टींसाठी अजूनही प्रसिद्ध आहेत.

एक कृष्ण भक्तीसाठी आणि दुसरे कृष्ण भक्ती जगाच्या काना-कोपऱ्यात नेण्यासाठी. प्रभुपाद यांनी ‘इस्कॉन’ अर्थात ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ ही संस्था अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात १९६६ मध्ये सुरू केली होती.

विदेशात फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड हे देखील इस्कॉन शी संलग्न होते. जेव्हा पडत्या काळात ‘अँपल’चे संस्थापक स्टीव जॉब्स ला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असे तेव्हा इस्कॉन च्या ‘फुड फॉर लाइफ’ ने स्टीव्ह जॉब्स ची भूक शमवली होती. विदेशात इस्कॉन चा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
आज जगभरात ८५० पेक्षा जास्त भगवान कृष्णाचे भव्य मंदिरे आहेत.

कोण आहेत स्वामी प्रभुपाद ?

एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद त्यांचा जन्म १८९६ साली कलकत्ता या शहरात झाला. वडील कृष्ण भक्त असल्यामुळे घरात कृष्ण भक्तीचे वातावरण होतेच त्यामुळे भक्तीची आवड वाढत गेली व त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी आपल्या गुरु कडून दीक्षा घेतली. नंतर १९५९ साली संन्यास घेत पूर्णवेळ कृष्णभक्ती प्रसाराचे कार्य हाती घेतले.

इंग्रजीतून कृष्ण भक्तीचा प्रसार करावा या आपल्या गुरूंच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. १९६५ साली ते अमेरिकेला गेले तेथे कोणीही ओळखीचे नसताना फक्त दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी मोठा भक्त वृंद तयार केला.

इस्कॉनचा आणि १९७१ सालच्या ‘दम मारो दम’ गाण्याचा विवाद बराच मोठा आहे.

१९७१ साली प्रभुपादांचे विदेशात कृष्णभक्ती प्रसारकार्य जोरात सुरू होते. मोठा जनसमुदाय कृष्णभक्तीत आकृष्ट होत होता. त्याकाळी अमेरिकेत सदा सर्वकाळ नशेत झिंगलेले तरुण-तरुणी बघावयला मिळायचे. त्यांना तेथे ‘ हिप्पी ‘ म्हणत.

हे हिप्पी म्हणजे आपल्या मनाचे मालक असत. त्यांना जे करण्यासारखं वाटे ते ते करत असायचे. प्रभुपाद अमेरिकेत ज्या बागेत हरेकृष्ण चे नामसंकीर्तन करत असत त्याच बागेत तेथे हिप्पी देखील नशा करून पडलेले असायचे. सुरुवातीचे ३-४ दिवस प्रभुपाद तेथे जात नामसंकीर्तन करत परंतु त्यांना सुरुवातीला काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. हिप्पी आपल्या नशेत मश्गुल होऊन पडून राहत.

पण हळूहळू या हे हिप्पी तरुण आकर्षित होऊ लागले,

सगळी दुनियादारी विसरून आपण जे जप करत नाचतोय ते माहिती नसताना देखील ते याचा पुरेपूर आनंद लुटू लागले. त्यांना हे नामकरणाचं प्रकरण काहीतरी भन्नाट वाटू लागलं होतं. नंतर याच तरुण-तरुणींचा स्वामी प्रभुपाद यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला. वा या हिप्पी गटातून बाहेर येऊनच पुढे अनेक जण शुद्ध भक्त झाले. तर अनेक जण संन्यासी झाले. आणि जगात इस्कॉन चा प्रसार करण्यासाठी सक्रीय झाले.

त्यावेळी भारतात देखील त्याची चर्चा होऊ लागली होती. इथल्या बातमीपत्रात याबाबतीत बातम्या आणि बरेच लेख येऊ लागले. बरं  सारी समकालीन परिस्थिती बॉलीवूड च्या नजरेतून कशी सुटू शकली असती. यातूनच 1971 साली हरे कृष्ण हरे राम नावाचा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा हिप्पी लोकांच्या आयुष्यावर आधारित होता. स्वामी प्रभुपाद यांच्या भक्ती प्रसाराच्या कार्याच्या कुठे ना कुठे संबंधित होता.

या सिनेमा मध्ये एक गाणे रिलीज झाले होते.’दम मारो दम मिट जाये गम बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम’ हे गाणे त्यावेळी खूप हिट झाले होते व मोठ्या विवादाला कारणीभूत देखील ठरले. भारतातील अनेक धार्मिक संघटनांनी यावर आक्षेप घेतला. देशातील तरुणांना सगळं काही विसरून नशा करून हरीनाम जप करण्याचा संदेश जाईल व यातून येथील तरुण पिढी भरकटेल असा संस्कृती रक्षकांनी दावा केला.

इस्कॉनच्या व्यवस्थापनाला एक केस स्टडी म्हणून पाहिले जाते.

१९७७ पर्यंत उघडलेल्या १०८ जगभरातील मंदिरांपैकी एक, हे भारतातील वृंदावनमधील कृष्ण-बलराम यांना समर्पित होते. इस्कॉनची स्थापना झाल्यानंतर, सॅन फ्रान्सिस्को मंदिरातील काही भक्तांना लंडन, इंग्लंडला पाठवण्यात आले, जिथे ते ६० आणि ७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय रॉक बँड ‘द बीटल्स’च्या संपर्कात आले. बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनने इस्कॉनमध्ये सर्वाधिक रस दाखवला. त्याच्याबरोबर बराच वेळ घालवला आणि नंतर लंडन राधा कृष्ण मंदिराच्या सदस्यांसह एक विक्रम केला.

स्वामी प्रभुपाद यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृंदावन येथे निधन झाले. वा तेथे त्यांचे स्मारक देखील बनवण्यात आले आहे.

१९७७ सालीच प्रभुपाद गेले परंतु एवढ्या वर्षानंतर देखील संस्था उत्तरोत्तर वाढतच आहे. प्रचार कार्य अविरतपणे सुरूच आहे. कर्नाटकतील इस्कॉनचा ‘अक्षय पात्र’ फाउंडेशनचा ‘Food for life’ हा प्रकल्प जगप्रसिद्ध आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.