लाॅकडाऊनच्या काळात गावातील पोरांनी एकत्र येवून गावचा ८०० वर्षांचा इतिहास शोधून काढलाय.
लाॅकडाऊनच्या काळात आपण काय केलं. काहींनी डालगोना काॅपी केली. काहीजणींनी नथीचा नखरा दाखवला. काही भिडू लोक ताणून नेटफ्लिक्सच्या सीरीज बघत बसले. तर काही महाभाग जग संपण्याची वाट पहात मस्त झोपून राहिले.
आत्ता लाॅकडाऊन संपत आला आणि लोकांना हळुहळु का होईना कामाला जावं लागलं. जिल्हाबंदी कायम असली तरी लोकं घराबाहेर पडून कामाला लागली आहेत.
कामाला लागल्यानंतर पहिला प्रश्न पडतो की लाॅकडाऊनमध्ये आपण काय केलं. दोस्तांना या लाॅकडाऊनमध्ये काय केलं म्हणून सांगायचं.
तेव्हा या भिडू लोकांची स्टोरी सांगण मस्ट आहे. कारण या सर्वांनी मिळून लाॅकडाऊनच्या काळात गावचा तब्बल ८०० वर्षांपूर्वीचा इतिहास शोधून काढला. नुसता शोधलाच नाही तर तो जतन केला आहे.
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव गावच्या कैलास देसाई आणि त्याच्या मित्रांची ही गोष्ट.
कैलास इंजनिरिंगचे शिक्षण घेतोय. लाॅकडाऊनमुळे तो मुंबईहून गावी परतला होता. या काळात काय करायचा हा प्रश्न त्यालाही पडलेला. शिक्षण जरी इंजिनीरिंगच घेत असला तरी या भिडूला मुळची आवड आहे ती इतिहासाची. इतिहासाची पुस्तके वाचण्यापासून ते विविध ठिकाणी होणारी तज्ञांची व्यांख्याने ऐकणे हा त्याचा छंद.
झालं अस की लाॅकडाऊनमध्ये गावी असणाऱ्या कैलासला सिंधुजन अकादमी या फेसबुक पेजवर १७ मे रोजी पुरातत्वशास्त्र व इतिहासाचे अभ्यासक “इतिहासाचे मुक साक्षीदार- वीरगळ आणि सतीशिळा” या पुस्तकाचे लेखक श्री. अनिल दुधाने लाईव्ह येणार असल्याची माहिती मिळाली. तो दुधाने सरांची माहिती ऐकू लागला. या माहितीत दुधाने सरांनी सांगितलं ते वीरगळ बाबत. त्यांनी या लाईव्ह मध्ये वीरगळचे चित्र दाखवले आणि कैलासच्या डोक्यात प्रकाश पडला.
कारण त्याच्या गावात देखील अशी खूपसारी दगडं होती ज्यावर काहीना काही कोरीलेलं होतं. त्याने लाईव्ह मध्ये सरांना ही माहिती दिली. सरांनी तात्काळ आपला नंबर कैलासला दिला आणि गावचा नवा इतिहास समोर येण्याचा प्रवास सुरू झाला.
भाटशिरगाव या गावात जूनं महादेवाचं मंदीर आहे. मंदिराचा इतिहास कित्येक शतकांचा आहे. बाहेरून लहान आणि बैठं वाटणारं मंदीर आतून प्रशस्त आहे. गावात मंदीराबद्दल असणारी दंतकथा म्हणजे हे मंदीर पांडवांनी एका रात्रीत घडवले. याच मंदीराच्या परिसरात अनेक शिळा वर्षांनुवर्षे पडून आहेत. कैलासने ही माहीती दुधाने सरांना दिली तेव्हा सरांनी या शिळांचे व्यवस्थित फोटो काढून पाठवण्यास सांगितलं.
ठरल्याप्रमाणे कैलास महादेवाच्या मंदिराकडे जावू लागला. मंदिराकडे जात असताना गावच्या हनुमान मंदिर व तालमीच्या बोळात त्याला दोन सचित्र दगड दिसले. विशेष म्हणजे हा बोळ सार्वजनिक मुतारीसाठी वापरला जात असे. कित्येक वर्षांपासून या सचित्र दगडांचा उपयोग मुत्रविसर्जन करण्यासाठी होत होता. अत्यंत घाणीत व दूर्गंधीत हे दोन्ही दगड पडलेले होते. त्याने त्या दोन्ही दगडांचे फोटो काढले. महादेवाच्या मंदिरात जावून तिथे असणाऱ्या सहा सात दगडांचे फोटो काढले व दुधाने सरांना पाठवले.
सरांनी त्याला सांगितलं की,
हे दगड म्हणजे फक्त कोरीवकाम असणारे साधे दगड नाहीत तर ती वीरगळ आहे. दुर्मिळ असा तो वारसा आहे. दगड व्यवस्थित स्वच्छ करून माती काढून फोटो काढा. यावरची चित्र व्यवस्थित पहाता आली तर आपणाला अजून अभ्यास करता येईल.
गावचा ऐतिहासीक ठेवा अशा प्रकारे पडून आहे हे समजताच गावातील सर्व तरूण एकत्र आले. सार्वजनिक मुतारीत असणारे ते दोन दगड बाहेर काढणं, स्वच्छ करणं हे महत्वाच काम होतं. मुलांनी मिळून हे दगड बाहेर काढले यातील एका दगडावर हत्तीवर बसलेला योद्धा होता. दगडावरील ते हत्तीचं कोरलेलं शिल्प मातीत रुतून बसलं होतं. त्या घाणीत हात घालून या मुलांनी दगड बाजूला काढले. पाणी टाकून स्वच्छ करण्यात आलेले वीरगळींचे हे फोटो पुन्हा दुधाने सरांना पाठवण्यात आले.
त्यांनी या वीरगळींचा विस्तृत अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासानुसार,
१) सदरचे वीरगळ शिलाहार (इ.स.८०० ते १०००) अथवा यादवकालीन ( इ.स. ८६० ते १३१७) असावेत. म्हणजे वीरगळ १२ व्या शतकातील असावेत व त्यांचे साधारण, सरासरी आयुर्मान आठशे ते नऊशे वर्षे असावे. याचा अर्थ असा की त्यापूर्वीच आपले भाटशिरगांव वसले होते.
२) आपल्या गावपांढरीस हजारो वर्षांचा, समरप्रसंगाचा, रणमैदान गाजविणा-या व मातीच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणाहूती देणा-या शूरवीरांचा, पराक्रमी योद्ध्यांचा इतिहास आहे.
३) एका वीरगळावर रेखाटलेली मोठी हत्तीदळाची लढाई महत्त्वाची आहे. असे वीरगळ दुर्मिळ असतात. या वीरगळामध्ये हत्तीवर स्वार झालेला सेनानी राजा अथवा सेनापती/ प्रधान असावा कारण हत्तीवर स्वार होणाराही तेवढा प्रमुख/ मातब्बर असतो. या हत्तीवर स्वार झालेल्या वीराकडून समोर लढणा-या आपल्या गावातील योद्ध्याचा मृत्यू झाला आहे. आता अशा प्रमुख राजा अथवा सेनानी विरूद्ध मामुली शिपाई न लढता समोर लढणाराही शत्रुपक्षातील प्रमुख सेनानी/ सरदार/ वतनदार असू शकतो. म्हणजेच आपल्या गावास प्रमुख हुद्देदार सेनानी/ सरदार/ वतनदारांचाही शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
४) बाकीच्या वीरगळांवर रेखाटलेली पायदळ व घोडदळांची लढाई तत्कालीन गावातील योद्ध्यांचे विविध क्षेत्रांतील युद्धनैपुण्य दर्शविते.
५) वीरगळांवर रेखाटलेले शिवलिंग त्या काळातील शैव-पंथाचा प्रभाव दर्शविते.
असे प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले.
वीरगळ हा एक निर्जीव दगड भासला तरी त्या दगडास स्वत:चा शेकडो वर्षांचा जिताजागता इतिहास आहे. युद्धभूमीवर, घनघोर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते असल्या वीरगळांमुळेच लोकांच्या स्मरणात राहिले.
हजारो वर्षांपूर्वीचे आढळणारे वीरगळ म्हणजे गतेतिहासाचे साक्षीदारच आहेत. वीरगळांवरील सचित्र लिपींनीच अशा अज्ञात इतिहासाची कवाडे खुली झाली. मात्र आज आपणांस ते फक्त दगड वाटतात. कोठे उघड्यावर तर कोठे घाणीत पडून आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्या इतिहासाचे, गावच्या मातीसाठी रक्तामांसाचा अभिषेक घातलेल्या शूरवीरांचे स्मरण ठेवणार आहोत का? स्मारकशिळा घडविणा-यांना त्यांची आजची अवस्था आणि लोकांचे गंभीर अज्ञान अभिप्रेत असेल काय? फक्त भाटशिरगांवच नाही तर प्रत्येक गावांत असे वीरगळ असू शकतात.
आपण सर्वांनी त्यांचा शोध घेऊन आपापल्या गावचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच वीरगळ या प्राथमिक व ऐतिहासिक साधनाचे गावोगावी सुयोग्य संवर्धन व्हायला हवे. आपले प्रत्येक गाव ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्रही होऊ शकेल. परंतु गरज आहे जागरूकतेची आणि आधिकच्या संशोधनाची,
अस कैलास सांगतो.
आपल्या गावाचा गौरवशाली इतिहास समोर आणल्याबद्दल कैलास देसाई आणि त्याच्या मित्रांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
तुम्हीही 8600063705 या नंबरवर फोन करून कैलासच्या या कामाच कौतुक करू शकता.
आपणही लाॅकडाऊनच्या काळात अस काहीतरी भन्नाट काम केलं असेल तर [email protected] वर आपला लेख पाठवा.
हे ही वाच भिडू
- मराठे लुटारू होते हा गैरसमज मोडून काढला एका बंगाली इतिहासकाराने
- खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने
- आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.